श्री महादेव म्हणाले,
‘‘गृध्रराज संपाती आकाशमार्गाने निघून गेल्यावर सीतेला पाहण्यासाठी उत्कंठित अशा त्या वानरवीरांना अत्यंत आनंद झाला. जो सुसरींच्या समुदायांनी भयंकर दिसत आहे, ज्याच्या लाटा सारख्या उसळत आहेत, ज्याला स्पर्श करणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखे कठीण, अशा त्या समुद्राला पाहून ते परस्परांशीच म्हणाले, ‘हा समुद्र आम्ही कसा बरे तरून जाऊ?’ त्यावर अंगद म्हणाला, ‘‘वानरवीरहो, ऐका! तुम्ही अत्यंत बलवान आणि शूर आहात. तुम्ही अनेक पराक्रम गाजविले आहेत. तुमच्यामध्ये असा कोण आहे, जो समुद्र उल्लंघून जाईल, राजकार्य करील? तो ह्या सर्व वानरांचा प्राणदाता होईल यात संशय नाही. म्हणून जो कोणी असा बलवान तुमच्यात असेल त्याने शीघ्र माझ्यासमोर यावे. तो सर्व वानरांचा तसेच राम-सुग्रीवाचाही पालक होईल, हे निश्चित आहे.’’ युवराज अंगदाने असे म्हटल्यावर ते सर्व वानरयोद्धे एकमेकांकडे पहात स्वस्थ राहिले. कुणीच काही बोलेना. त्यावर अंगद म्हणाला, ‘‘तुमच्यापैकी प्रत्येकाने ह्या राजकार्यसिद्ध्यर्थ आपापली शक्ती किती आहे हे सांगावे. नंतर हे कार्य कोणाकडून पूर्ण होईल ते आपल्याला लक्षात येईल.’’ अंगदाचे भाषण ऐकून त्या वीरांनी पृथक् पृथक् आपापले बल सांगण्यास सुरुवात केली. त्यांनी दहापासून आरंभ करून एकाने दहा, दुसऱ्याने वीस, तिसऱ्याने तीस योजने उडेन, अशाप्रकारे एकाहून दहा, दुसऱ्याची अधिक ह्या क्रमाने आपापली शक्ती सांगितली. त्या वनचर मंडळीत जांबवान होता. त्याने नव्वद योजने संख्या सांगितली. तो म्हणाला, ‘‘पूर्वी वामनावतारी देवाचे पाऊल पृथ्वीच्या लांबीरुंदीइतके होते. त्या पावलाभोवती प्रदक्षिणेसारखा एकवीस वेळा मी वाटोळा फिरलो. परंतु सांप्रत वार्धक्याने मी ग्रस्त असल्यामुळे समुद्र उल्लंघून जाण्याची शक्ती माझ्यात नाही.’’ नंतर अंगदही म्हणाला, ‘‘मी महासागर ओलांडून जाईन परंतु परत येणे होईल की नाही हे कळत नाही.’’ त्यावर जांबवान वीर त्याला म्हणाला, ‘‘तू शूर आहेस. तू आमचा राजा असून आमचा नियंता आहेस. तरी ह्या कामी तुझी योजना करणे मला योग्य वाटत नाही.’’ अंगद म्हणाला, ‘‘असे जर आहे तर आपण सर्व पूर्वीप्रमाणे दर्भासनावर प्राणत्यागाकरिता बसू या. कोणीच जर काम करणार नाही तर जिवंत राहणे शक्य नाही.’’ त्याला जांबवान वीर म्हणाला, ‘‘वत्सा! ज्याकडून आपली कार्यसिद्धि लवकर होईल असा वीर मी तुला दाखवतो.’’ असे बोलून तेथे असलेल्या मारुतीला जांबवान म्हणाला, ‘‘मारुते, ह्या महत्त्वाच्या कार्यप्रसंगी तू असा अज्ञान्यासारखा एकांतात स्वस्थ कसा बरे बसला आहेस? महाबलिष्ठा, आज तुझे सामर्थ्य दाखव. तू साक्षात् वायुपुत्र असून पराक्रमाने सुद्धा वायुसारखाच आहेस. रामकार्यासाठीच तुझा जन्म झाला आहे. बालपणी तू जन्मला तोच उगवणारा सूर्य तुला दिसला. महापराक्रमी तुला असे वाटले की ते पक्व फल आहे, ते आपण घ्यावे, असा विचार करून तू बाललीलेने पाचशे योजने वर उंच उडी मारली होती. आणि नंतर तेथून तू खाली पडलास. म्हणून मी म्हणतो, तुझ्या बलाचे माहात्म्य कोण वर्णन करू शकेल? म्हणून हे सुव्रता, मारुते! उठ. रामाचे कार्य कर आणि आम्हा सर्वांचे रक्षण कर.’’
जांबवंताचे भाषण ऐकून मारुतीला अतिशय आनंद झाला. त्याने सिंहनाद केला. त्यामुळे हा ब्रह्मांडगोलाचा जणू काय स्ङ्गोट करीत आहे की काय असे सर्वांना वाटू लागले. तो पर्वताकार बनला. ते स्वरूप पाहून हा दुसरा त्रिविक्रमच आहे असा भास झाला. तो म्हणाला, ‘‘समुद्र उल्लंघून लंका जाळू का? रावणाचा सहकुटुंब वध करून जानकीला आणू का? किंवा रावणाच्या गळ्यात दोरी बांधून डाव्या हाताने पर्वतासह लंका नगरी उचलून ती रामापुढे आणून टाकू? किंवा त्या सुलक्षणी जानकीला केवळ पाहून येऊ?’’ हनुमंताचे भाषण ऐकून जांबवंत बोलला की, ‘‘ती शुभलक्षणा जानकी जिवंत आहे एवढेच फक्त पाहून ये. तुझे कल्याण असो. पुढे रामाच्या बरोबर जाऊन आपला पराक्रम दाखव. मित्रा! आकाशमार्गाने जाताना तुझे कल्याण होवो. रामकार्यासाठी जात असता वायु तुझ्या मागून येवो.’’
जांबवंताचे असे आशीर्वाद मिळाल्यावर त्या वानरवीरांनी मारुतीला निरोप दिला. नंतर मारुती महेंद्रपर्वताच्या शिखरावर गेला. तेथे त्याचे ते अद्भुत स्वरूप पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. त्यावेळी महापर्वतासारख्या देहाचा, सुवर्णासमान अंगकांतीचा व सुंदर मुखाचा, मोठ्या नागराजासमान दीर्घ बाहुंचा असा तो पवनतनय महात्मा मारुती सर्व प्राणीमात्रांना दिसला.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्किन्धाकाण्डे नवमः सर्गः।