श्री महादेव म्हणाले,
‘‘परमात्मा रामाने युद्धात वालीचा वध केला असता सर्व वानर भयभीत होऊन किष्किन्धेला पळून गेले आणि तारेला म्हणाले, ‘‘महाभागे! वालीचा रणांगणात वध झाला. आता अंगदाचे रक्षण कर. नगररक्षणासाठी मंत्र्यांना प्रेरणा दे. चारही दरवाजांची कवाडे बंद करून आम्ही नगरीचे रक्षण करतो. बाई! अंगदाला वानरांचा राजा कर.’’ वालीनिधनाचे वृत्त ऐकून तारा शोकाकूल होऊन मूर्च्छित झाली. आपल्या हातांनी ती मस्तक आणि ऊर बडवून घेऊ लागली. ती म्हणाली, ‘‘मला अंगदाशी, राज्याशी, नगराशी आणि धनराशीचे काय करावयाचे आहे. मी आताच पतिसह सहगमन करणार आहे.’’ असे म्हणून अत्यंत शोकाकूल होऊन, केस मोकळे सोडून रडतरडत ती त्वरेने मृत पतिजवळ गेली. रक्ताने आणि धुळीने व्याप्त होऊन पडलेल्या वालीला पाहून तारा ‘हा नाथा, हा नाथा’ असा आक्रोश करीत त्याच्या पायांवर पडली. करुणस्वराने ती रडत होती. तिला श्रीराम दिसले. ती रामाला म्हणाली, ‘‘रामा! ज्या बाणाने तू वालीला मारले, त्याच बाणाने मला मारून टाक. मी पतिलोकास जाईन. पति माझी वाट पहात आहे. रघुनंदना! स्वर्गात देखील माझ्याशिवाय त्यांना सुख होणार नाही. हे निष्पापा! पत्नीवियोगाचे दुःख कसे असते याचा अनुभव तू घेतोच आहेस. तरी मला शीघ्र वालीला भेटवून दे. त्यामुळे तुला पत्नीदानाचे पुण्य मिळेल. सुग्रीवा! वालीचा घात करून रामाने तुला राज्य मिळवून दिले आहे. आता तुला कोणीच शत्रू नाही, तेव्हा तू पत्नी रुमेसह राज्यभोग घे.’’ अशाप्रकारे शोक करणाऱ्या तारेला त्या मोठ्या मनाच्या रामाने दयेने तत्त्वज्ञानाचा उपदेश केला आणि तिचे सांत्त्वन केले. तो म्हणाला, ‘‘हे भिन्ने स्त्रिये! व्यर्थ शोक का बरे करीत आहेस? पति हा शोकाचा विषयच नाही. हा देह तुझा पति किंवा जीव तुझा पति, ते मला खरे सांग. जड देह पंचभूतांनी बनलेला असून त्वचा, मांस, रक्त आणि अस्थि यांनी युक्त आहे. काल, कर्मे, गुण यांच्या साहाय्याने त्याची उत्पत्ती झाली. तो तर तुझ्या पुढेच आहे. आता जीव हा आपला पति मानशील तर जीव हा निर्विकार आहे. तो जन्मत नाही, मरत नाही, राहात नाही की जातही नाही. तो जीव स्त्री नाही, पुरुष नाही किंवा तो नपुंसकही नाही. तर तो सर्वव्यापी, अव्यय, एक, अद्वितीय आहे. तो आकाशाप्रमाणे सर्वत्र व्यापून राहून सुद्धा निःसंग आहे. तो नित्य, ज्ञानमय आणि शुद्ध आहे. त्याबद्दल शोक करणे कसे काय योग्य आहे?’’ तारा म्हणाली, ‘‘रामा! देह हा काष्ठाप्रमाणे जड आहे आणि आत्मा हा नित्य व चैतन्यरूपी आहे. मग रामा! सुखदुःखादि संबंध कोणाला आहेत ते मला सांग.’’ श्रीराम म्हणाले, ‘‘जोपर्यंत देह, इंद्रिये याबद्दलचा अहंकारादि संबंध वाटत असतो तोपर्यंतच अविचारी जीवाला संसार लागलेला असतो. हा संसार मिथ्या आरोपिलेला आहे. तरी तो आपोआप नष्ट होणार नाही. ह्याला दृष्टांत म्हणजे विषयाचे सतत चिंतन करणाऱ्या स्वप्नातील मनुष्याचा होय. त्याला स्वप्नात अनेक पदार्थ दिसतात. तरी पण स्वप्न संपेपर्यंत ते खोटे वाटतच नाही. अनादि, अविद्येच्या योगाने आणि त्याच अज्ञानाचे कार्य जो अहंकार त्यापासून संसार होतो. हा संसार निरर्थक असून राग, प्रेम, द्वेष इत्यादिकांनी व्याप्त झालेला असतो. हे कल्याणी! मन हेच संसार व मन हेच बंधन होय. आत्मा मनाशी ऐक्य पावून मनावरील बंधनांना भोगणारा होतो. ज्याप्रमाणे अगदी स्वच्छ असा स्फटिकमणि अळता इ. पदार्थांच्या जवळ असला म्हणजे त्या त्या पदार्थांच्या रंगांनी युक्त दिसतो. वास्तविक त्याला रंग असा काही नाही. तसेच बुद्धि, इंद्रिये यांच्या संबंधाने बळेच संसाराचे बंधन आत्म्याच्या अंगी लागत असते. मीच मन हा भाव धरून त्या मनापासून उत्पन्न होणाऱ्या उपभोगांचे सेवन करीत आत्मा राहतो आणि रागद्वेषादि गुणांनी बद्ध होऊन पराधीन होऊन संसारात पडतो. पहिले मन रागद्वेषादि गुणांना उत्पन्न करून नंतर अनेक प्रकारची कर्मे उत्पन्न करते. ही कर्मे शुक्ल-उत्तम, लोहित-मध्यम आणि कृष्ण-अधम अशी तीन प्रकारची असून त्यांच्या गति सुद्धा त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे उत्तम, मध्यम आणि अधम असतात. अशा तर्हेने कर्मबंधानुसार जीव हा प्रलयकालपर्यंत भ्रमण करीत असतो. प्रलयकाळात सर्वांचा संहार होतो. म्हणून मीच मन असे मानून वासना आणि स्वकर्मे यांसह अनादि अविद्येच्या ठिकाणी जीव लीन होतो. नंतर पुन्हा सृष्टिकाल आला म्हणजे तो जीव पूर्वीच्या वासना आणि मनाने केलेली कर्मे यांच्यासह जन्माला येतो. अशाप्रकारे रहाटगाडग्याप्रमाणे पराधीनतेने त्याला जन्ममरणेही भोगावीच लागतात. जेव्हा कुठे काही सुकृत, पुण्य उदयास येऊन अत्यंत शांत आणि माझ्या भक्तीत रममाण होणारे अशा सत्पुरुषांची संगति लाभते तेव्हा त्याच्या मनात माझ्यासंबंधी प्रेम निर्माण होते. पुढे माझ्या कथा श्रवण करण्याची आवड सुरुवातीला नसते. नंतर ती आवड वाढू लागते. त्यानंतर सहजपणे स्वरूपज्ञान प्राप्त होते. सद्गुरुंच्या प्रसादाने महावाक्यार्थाचे ज्ञान होऊन क्षणात आत्मा हा देह, इंद्रिये, मन, प्राण, अहंकार याहून वेगळा आहे, तो शाश्वत, आनंदस्वरूप, द्वैतरहित आहे असे अनुभवज्ञान प्राप्त होते. हे ज्ञान झाले असता तत्काळ मुक्ति मिळते. तारे! मी तुला हे सर्व सांगितले तेच सत्य आहे. जो कोणी ह्या माझ्या बोलण्याचा रात्रंदिवस विचार करील त्याला संसारासंबंधी दुःखे कधीही स्पर्श करणार नाहीत. तू देखील मी जे सांगितले याचा नीट विचार कर. त्यामुळे तुझी बुद्धि शुद्ध होऊन दुःखसमूहाचा तुला कधीही स्पर्श होणार नाही. तू कर्मबंधनातून मुक्त होशील. हे सुंदरी! तू पूर्वजन्मामध्ये माझी उत्तम भक्ति केली आहेस म्हणूनच हे शुभलक्षणे! तुला मोक्ष मिळावा यासाठी मी दर्शन दिले. माझ्या रुपाचे ध्यान आणि माझ्या उपदेशाचा विचार सतत करीत रहा. म्हणजे मग प्राप्त होतील ती ती कर्मे करूनही तू निर्लेप राहशील.’’
रामाचे भाषण ऐकून तारेला आश्चर्यच वाटले. तिने देहाभिमानापासून होणारा शोक करण्याचे सोडून दिले आणि त्या रघुत्तमाला नमन केले. अशा तर्हेने परमात्मा रामाच्या क्षणमात्र समागमाने ती तारा आत्मस्वरुपानंदाला प्राप्त होऊन जीवन्मुक्त झाली. अनादि अविद्याविषयक बंधनाला तोडून ती निष्पाप झाली, मुक्तिला प्राप्त करती झाली. रामाच्या तोंडून निघालेली वचने ऐकून सुग्रीवाचेही अज्ञान नष्ट झाले. त्याचे चित्त तत्काळ स्वस्थ झाले. नंतर त्या वानरश्रेष्ठ सुग्रीवाला राम म्हणाला, ‘‘सुग्रीवा! ज्येष्ठ बंधुचा अंत्यविधि सर्व संस्कारांसह यथान्याय पुत्राकडून तू करवून घे. अशी माझी तुला आज्ञा आहे.’’ ‘‘होय, तसेच करतो’’ असे म्हणून सुग्रीवाने बलवान व मुख्य वानरांना बोलावून सर्व राजोपचार वालीच्या अंगावर घातले आणि त्याला रथामध्ये ठेवले. सभोवताली भेरि, नगारे, दुंदुभि, नौबती वाजू लागल्या. अशारितीने ब्राह्मणमंडळी, मंत्रिगण, मुख्य वानरवीर, सर्व नागरिक, तारा आणि अंगद ह्यांसह जाऊन सुग्रीवाने ते सर्व और्ध्वदेहिक प्रयत्नपूर्वक यथाशास्त्र केले. नंतर स्नान करून मंत्रिगणांसह तो रामाकडे गेला. नंतर संतुष्ट अंतःकरणाने रामचरणी वंदन करून सुग्रीव म्हणाला, ‘‘राजेंद्रा! हे सर्व समृद्धींनी युक्त असे वानरांचे राज्य आपण चालवावे. आपला दास होऊन लक्ष्मणाप्रमाणे आपल्या पदकमलांची मी नित्य सेवा करीन.’’
हे ऐकून राम हसून सुग्रीवाला म्हणाला, ‘‘सुग्रीवा! तूच तो मी, ह्यात काही संशय नाही. माझ्या आज्ञेने लवकर जा आणि किष्किन्धा नगरीचा राज्याभिषेक स्वतःला करवून घे. मित्रा! चौदा वर्षेपर्यंत मी नगरात प्रवेश करणार नाही. तुझ्या राजधानीत माझा बंधु लक्ष्मण येईल. अंगदाला आदरपूर्वक यौवराज्याभिषेक कर. मी कनिष्ठ बंधुसह जवळच्या पर्वतशिखरावर पर्जन्यकाळ संपेपर्यंत राहीन. तोपर्यंत काही काळ नगरात राहून नंतर सीतेच्या शोधकार्याचे प्रयत्न कर.’’
रामचरणी साष्टांग प्रणिपात करून सुग्रीव म्हणाला, ‘‘देवा, जशी आपली आज्ञा आहे तसेच मी करतो.’’ रामाने सांगितल्याप्रमाणे त्याने सर्व गोष्टी केल्या. त्यावेळी सुग्रीवाने लक्ष्मणाची यथाविधि पूजा केली. नंतर लक्ष्मणासह राम प्रवर्षण नामक उंच व अति विस्तीर्ण शिखरावर गेला. तेथे एक स्फटिकनिर्मित सुंदर व अत्यंत तेजस्वी गुहा त्याच्या दृष्टीस पडली. तेथे पाऊस, वारा आणि उन सुद्धा सहन करण्यासारखी असून त्या पर्वतावर दिव्य मूळे, फळे आणि फुले यांची विपुलता असून मोत्याप्रमाणे स्वच्छ जलाने भरगच्च भरलेली अशी अनेक सरोवरे होती. तसेच चित्र-विचित्र पशूपक्ष्यांनी त्या स्थळाला शोभा आली होती. ती जागा पसंत करून लक्ष्मणासह आपण येथे राहावे असे रामाने ठरवले. अशा त्या पर्वतावर आपले निवासस्थान बनवून तो रघुकुलश्रेष्ठ श्रीराम तेथे राहिला.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्किन्धाकाण्डे तृतीयः सर्गः।