श्री महादेव म्हणाले,
‘‘श्रीराम लक्ष्मणासह पर्जन्यकाळ संपेपर्यंत तेथील रत्नांच्या गुहेत पिकलेली मूळे आणि फळे भक्षण करून आनंदात राहिला. वायुप्रेरित होऊन आकाशात सर्वत्र संचार करणारे पाण्याने भरलेले मेघ आणि मधूनमधून गर्जना करून चमकणाऱ्या वीजा ह्यांच्यामुळे सुवर्णझूल घालून सजलेले हत्तींचे कळपच आपण पाहतो की काय? असा भास रामाला सतत होत होता. म्हणून त्याला खूप आश्चर्य वाटले. कोवळे गवत खाऊन धष्टपुष्ट झालेले पशू, पक्षी रामाला पाहून डोळे ताठ उघडून त्याच्या भोवताली धावून येत असत. ध्याननिष्ठ मुनिश्रेष्ठ निश्चल असतात त्याप्रमाणे ते पशूपक्षी तेथे स्थिर होऊन रहात असत. त्यावरून हे कोणी मूळचे सिद्धसमुदाय असून, राम म्हणजे प्रत्यक्ष परमात्माच मनुष्यरूपाने पर्वतावरील अरण्यप्रदेशातून संचार करीत आहे हे जाणून पशूपक्ष्यांची रुपे घेऊन त्याची सेवा करीत आहेत की काय असे वाटत होते. एके वेळी समाधि उतरून राम एकांतात ध्यानतत्पर बसला असता लक्ष्मण भक्तिप्रेमपुरस्सर नम्रपणे त्याला म्हणाला, ‘‘देवा, पूर्वी आपण मला केलेल्या उपदेशाने अज्ञानबीजमूलक माझ्या मनातील संशय दूर झाला आहे. सांप्रत लोकांमध्ये योगीजन ज्या उपासना पद्धतीने तुझी आराधना करीत असतात ती ऐकण्याविषयी हे राघवा! माझी इच्छा आहे. अनेक योगी त्याचप्रमाणे नारद, व्यास आणि ब्रह्मदेव ह्यांनीही हेच तुझे पूजाराधन मोक्षसाधन असल्याचे सांगितले आहे. राजेंद्रा! ब्राह्मण, क्षत्रिय इ. वर्णांना आणि ब्रह्मचर्यादि आश्रमांना मोक्ष देणारे, तसेच स्त्रीशूद्रादिकांना सुलभ असे मुक्तिसाधन म्हणजे तुझे पूजाराधन होय. तुझी भक्ति करणारा मी तुझा भाऊ आहे तरी लोकोपकारक असा हा उपासना मार्ग तू मला सांगावा.’’
श्रीराम म्हणाले, ‘‘हे रघुनंदना लक्ष्मणा! माझ्या उपासनेच्या प्रकारांना मिति नाही. तरी सुद्धा शास्त्रानुसार क्रमाने ते मी तुला थोडक्यात सांगतो. आपापल्या गृह्यसूत्रानुसार ब्राह्मणत्व प्राप्त झाले असता मनुष्याने भक्तिपूर्वक सद्गुरुपासून मंत्रोपदेश घ्यावा. मग त्याने दाखविलेल्या विधीप्रमाणे अंतःकरणपूर्वक माझीच आराधना करावी. ही माझी आराधना हृदय, अग्नी, एखादी मूर्ती वगैरे अथवा सूर्यनारायण ह्यांच्या ठिकाणी करावी. अथवा शालीग्राम शिला घेऊन सुद्धा निरलसपणे माझे पूजन करावे. प्रथम देहशुद्धीसाठी प्रातःस्नान करावे. वेदांमध्ये आणि तंत्रांमध्ये सांगितले त्या मंत्रांनी मृत्तिका लावणे इ. विधि आचरून संध्यादिक नित्याची कर्मे समजून घेऊन ती शहाण्याने यथाविधि करावी. आरंभी कर्माच्या सिद्धिसाठी शहाण्या मनुष्याने संकल्प करावा. नंतर त्या माझ्या पूजकाने मद्बुद्धिनेच आपल्या गुरुंची भक्तिपूर्वक पूजा करावी. पाषाणप्रतिमा असल्यास तिला स्नान घालावे. मृत्तिकादिकांच्या मूर्ती असल्यास त्यावर मार्जन करावे. नंतर शास्त्राने मानलेल्या गंधपुष्पादिकांनी माझे पूजन करावे. त्यामुळे सिद्धि प्राप्त होते. दंभवृत्ति सोडून देऊन, नित्यनेम साधून विधिपूर्वक माझी पूजा करावी. कुलनंदना, प्रतिमेवर अलंकार घातले असता मला संतोष होतो. अग्निमध्ये हविर्द्रव्ये टाकून होम करावा. प्रत्यक्ष सूर्याची अगर जमिनीवर सूर्यचित्र काढून त्याची पूजा करावी. भक्ताने श्रद्धापुरस्सर अर्पण केलेल्या केवळ उदकानेसुद्धा माझा संतोष होतो. मग भक्ष्यभोज्यादि पदार्थ आणि गंधपुष्पाक्षता इत्यादिकांनी मी संतुष्ट होतो, हे कशाला वेगळे सांगायचे? सर्व पूजाद्रव्ये मिळवून पूजा आरंभावी. वस्त्र, चर्म आणि दर्भ यांच्या साहाय्याने उत्तम आसन सिद्ध करून त्यावर देवाकडे तोंड करून निर्मल अंतःकरणाने बसावे. नंतर अकारादि वर्ण आणि केशवादि नामानुसार बाह्य आणि आभ्यंतर न्यास आणि त्यानंतर तत्वन्यास करावे. माझ्या मूर्तीवर महान्यास करावा. नंतर मंत्रातील अक्षरांचा स्वतःच्याही आणि मूर्तीच्याही शरीरावर निरलसपणे न्यास करावा. आपल्यापुढे डाव्या बाजुला उदक कलश ठेवावा. पुष्पे इ. उजवीकडे ठेवावी. अर्घ्यपाद्य देण्यासाठी मधुपर्काकरिता आणि आचमन करण्यासाठी चार पात्रे ठेवावी. नंतर सूर्यासमान तेजस्वी अशा हृदयकमलात ‘जीव’ नावाच्या माझ्या चित्कलेचे ध्यान करावे. हे अरिदमना लक्ष्मणा! सगळे आपले शरीर त्या जीवकलेने व्याप्त आहे, असे मनात ठरवावे आणि त्याच माझ्या कलेचे मूर्ती वगैरे ठिकाणी नित्य आवाहन करावे. पाद्य, अर्घ्य, आचमनीय इत्यादिकांनी तसेच स्नान, वस्त्र, अलंकार वगैरे शक्य त्या उपचारांनी निष्कपटपणे माझे पूजन करावे. ऐश्वर्याची अनुकूलता असल्यास कापूर, केशर, कृष्णागरू, चंदन आणि उत्तम सुवासिक पुष्पे यांच्या साहाय्याने मंत्रांनुसार माझे नित्य अर्चन करावे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे दशावतरणपूजा करावी. अनेक निरांजने, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. हे सर्व श्रद्धेने नेहमी मला अर्पण करावे. कारण मी ईश्वरभावभोक्ता आहे. मंत्रशास्त्रात निपुण असलेल्या मनुष्याने शास्त्राज्ञेला अनुसरून प्रयत्नपूर्वक होम करावा. आगमात निष्णात असलेल्या मनुष्याने अगस्त्यमुनींनी सांगितल्याप्रमाणे कुंड तयार करून त्यामध्ये मूलमंत्र किंवा पुरुषसूक्त म्हणून होम करावा अथवा त्या पूजन केलेल्या अग्नित चरूची आहूति देऊन हवन करावे. शहाण्या मनुष्याने होमकाळी तापलेल्या सोन्याप्रमाणे दीप्तिमान व दिव्यालंकारांनी सुशोभित मूर्ती अग्नीच्या मध्यभागी उभी आहे असे समजून तिचे ध्यान करावे. नंतर पार्षदगणांना ती बलिदाने देऊन बाकी होमकार्याची परिपूर्णता करावी. मौन धारण करून माझे ध्यान व स्मरण करीत मंत्राचा जप करावा. मुखवासासाठी प्रेमाने तांबूल अर्पण करावा. माझ्याकरिता नृत्यगायनादि तसेच स्तुतिपाठ इ. प्रकार करवावे. हृदयात माझी मूर्ती ठेवून भूमीवर साष्टांग नमस्कार घालावे. मीच प्रसाद दिला आहे अशी कल्पना करून तो मस्तकावर धारण करावा. हातांनी माझे पाय धारण करून ते भक्तिपुरस्सर मस्तकावर ठेवावे. नंतर त्या बुद्धिमान पुरुषाने ‘घोर संसारापासून माझे रक्षण कर’ असे म्हणून नमस्कार करावा. शेवटी स्वतःच्या हृदयातील तेजात त्या प्रतिमेतील जीवकलेचे स्मरण करून विसर्जन करावे. अशाप्रकारे मी सांगितलेल्या रितीने जो कोणी विधियुक्त पूजन करील तर त्याला माझ्या अनुग्रहामुळे ह्या लोकी किंवा परलोकी उत्तम सिद्धि प्राप्त होईल. माझा भक्त ह्याप्रकारे प्रत्येक दिवशी माझे पूजन करील तर त्याला माझे सारूप्य प्राप्त होईल, ह्यात शंका नाही. परमगुह्य आणि अत्यंत पवित्र असा हा पारंपरिक चालत आलेला पूजनविधी मी तुला प्रत्यक्ष सांगितला. जो ह्याचे नित्य पठण किंवा श्रवण करील त्याला सर्व पूजाफल निःसंशय मिळेल.’’
अशाप्रकारे शेषांश लक्ष्मणाने प्रश्न केला म्हणून तो आपला भक्त आहे हे समजून परमात्मा रामाने त्या महात्म्याला अत्युत्तम असा पूजाविधी सांगितला. पुन्हा मायेचा आश्रय घेऊन प्राकृत मनुष्याप्रमाणे तो दुःख करू लागला. ‘हा सीते’, ‘हा सीते’ म्हणून आक्रोश करू लागला. त्याला काही केल्या झोप आली नाही. इकडे किष्किन्धा नगरीत अत्यंत बुद्धिमान हनुमंत वानरराज सुग्रीवाला एकांतात म्हणाला, ‘‘राजा सुग्रीवा! ऐका, मी आपल्या हिताची गोष्ट सांगत आहे. रामाने आपल्यावर अति उत्तम उपकार केला आहे. कृतघ्नासारखा आपण तो विसरलेला आहात असे मला वाटते. आपल्याचसाठी त्रैलोक्यात सुप्रसिद्ध वीर जो वाली त्याचा रामाने वध केला. आपल्याला त्याने राज्य मिळवून दिले. दुर्लभ अशा तारेचीही आपल्याला प्राप्ती झाली. तो महाबुद्धिमान राम बंधुसह वर्तमान पर्वताच्या शिखरावर राहून आपले मोठे कार्य हा सुग्रीव करील ह्या आशेने आपली वाट पहात आहे. परंतु आपण मात्र वानरस्वभानुसार आणि स्त्रीसक्त होऊन राहिल्यामुळे त्याची आपल्याला जाणीव नाही. ‘सीतेचा शोध लावतो’ अशी प्रतिज्ञा करून आपण तसे केले नाही. आपण कृतघ्न आहात. त्याअर्थी आपणही लवकरच वालीप्रमाणे मृत्यु पावाल.’’ हनुमंताचे असे भाषण ऐकून सुग्रीव भयभीत झाला. तो मारुतीला म्हणाला, ‘‘तू म्हटलेस ते बरोबरच आहे. मी आज्ञा करतो त्याप्रमाणे तू कर. अत्यंत वेगवान गतीचे दहा हजार वानर दहा दिशांना ताबडतोब पाठव. सातही द्विपांमध्ये राहणाऱ्या सर्व वानरांना त्यांनी घेऊन यावे. सर्व वानरश्रेष्ठांनी पंधरा दिवसात येथे यावे. पंधरा दिवसांनंतर जे गावात राहतील त्यांचा माझ्याकडून वध होईल, हे नक्की आहे.’’ अशी हनुमंताला आज्ञा देऊन सुग्रीव गृहकार्यात आसक्त झाला. त्या मंत्रीश्रेष्ठ बुद्धिमान हनुमंताने सुग्रीवाची आज्ञा वंद्य मानून दाही दिशांकडे तत्काळ दूत पाठविले. रामकार्य करण्यासाठी अत्यंत उत्सुक अशा त्या हनुमंताने अनंत गुणांचे व अपार सामर्थ्याचे वायुगतीने प्रचार करणारे, पर्वतासमान आकाराचे असे जे जे मुख्य वनचर, वानर होते त्यांना बोलावण्यासाठी दूत पाठविले.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्किन्धाकाण्डे चतुर्थः सर्गः।