श्री महादेव म्हणाले,
‘‘वाल्मीकीने उपदेश केला असता कुशाची भ्रांती तत्काळ दूर झाली. तेव्हापासून तो बाह्यतः सर्व व्यवहार करीत होता, तरी अंतर्यामी योगीच झाला होता. वाल्मीकीनेही त्या महाबुद्धिमान सीतेच्या पुत्रांना सांगितले की, ‘‘नगरामध्ये सर्वत्र रस्त्यारस्त्यातून रामायणाचे गायन करीत फिरा. रामाने तुमचे गायन ऐकण्याची इच्छा प्रदर्शित केल्यास त्याच्या समोर सुद्धा तुम्ही गावे. जर तो तुम्हाला काही देईल तर तुम्ही ते घेऊ नये.’’ अशी मुनीने प्रेरणा दिल्यानुसार ती मुले कुश व लव गायन करीत फिरू लागली. ऋषीने पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सर्वत्र गायन सुरू केले. आपले पूर्वचरित्र सर्वत्र गाईले जात आहे, म्हणण्याची पद्धती अपूर्व आहे आणि गायन सुद्धा मधुर आहे, असे श्रीरामाच्या कानी आले. हे गायन करणारी दोन लहान मुले आहेत हे ऐकून रामाला मोठे कौतुक वाटले. मग यज्ञकर्माच्या मधल्या विश्रांतीच्या वेळी रामाने मोठमोठ्या मुनींना बोलावले तसेच त्या नरश्रेष्ठाने अनेक राजे, पंडित, वैदिक, पौराणिक, वृद्ध द्विजाति ह्या सर्वांनाही बोलावून त्या गायन करणाऱ्या मुलांना बोलावले. त्या सर्व राजांना आणि ब्राह्मणादिकांना ती मुले पाहून त्या सर्वांची अनिमेष दृष्टी त्यावर जडली. त्या जमलेल्या सर्वांना मोठा विस्मय वाटला. ते आपसात बोलू लागले, ‘हे दोघे कुमार अगदी रामासारखे दिसत आहेत. जणू काय ही बिंबाची प्रतिबिंबेच पडली आहेत. ह्यांच्या मस्तकी जर जटा नसत्या व अंगावर वल्कले नसती तर रामामध्ये आणि ह्यांच्यामध्ये काहीच फरक आम्हाला दिसला नसता.’ विस्मयपूर्वक आपसात ते असे बोलत आहेत इतक्यात त्या दोघा मुनिकुमारांनी गाण्यास सुरुवात केली. मनुष्यलोकी कधीही ऐकू येणार नाही असे ते गायन सुरू झाले. ते मधुर गाणे ऐकल्यानंतर तिसऱ्या प्रहरी रघुश्रेष्ठ राम भरताला म्हणाला, ‘‘ह्यांना दहा सहस्त्र द्रव्य द्यावे.’’ त्याप्रमाणे भरत त्यांना द्रव्य देऊ लागला, परंतु ते त्यांनी घेतले नाही. ते म्हणाले, ‘‘राजा! ह्या सुवर्णाचा आम्हाला काय उपयोग? अरण्यातील फळेमुळे खाऊन आमचा उदरनिर्वाह होतो.’’ अशा रितीने ते दिलेले द्रव्य तेथेच ठेवून ते कुमार वाल्मीकी मुनीजवळ गेले. त्या मुलांनी गाईलेले स्वतःचे चरित्र ऐकून रामाला फार आश्चर्य वाटले. त्याने ते सीतेचे पुत्र आहेत हे ओळखले आणि शत्रुघ्न, हनुमान, सुषेण, बिभीषण आणि अंगद ह्यांना सांगितले, ‘‘त्या महोदार, मुनिश्रेष्ठ, देवसदृश भगवान वाल्मीकी मुनींना सीतेसह घेऊन या. लोकांचा विश्वास बसावा म्हणून ह्या सभेमध्ये जानकीने शपथ घ्यावी. सर्व लोकांना सीता निष्पाप असल्याचे कळून यावे.’’ ते भाषण ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले.
रामाच्या सेवकांनी रामाने सांगितल्याप्रमाणे वाल्मीकींकडे जाऊन त्यांना सर्व निवेदन केले. रामाचे सर्व मनोगत जाणून वाल्मीकी म्हणाले, ‘‘उद्या सर्व लोकांसमक्ष सीता शपथ घेणार आहे. स्त्रियांचे परमदैवत म्हटले म्हणजे पतीच होय, ह्यात संशय नाही.’’ ते ऐकून ते सर्व दूत तसेच गेले आणि त्यांनी मुनीचे म्हणणे रामाला सांगितले. ते मुनीचे भाषण ऐकून राम देखील म्हणाला, ‘‘सकल राजे आणि मुनीहो, ऐका. उद्या येथे सीता शपथ घेणार आहे. आपण त्यानुसार खऱ्या खोट्याचा निर्णय करावा.’’ रामाने सांगितल्यावर ते सर्व लोक सीतेला पाहण्याच्या इच्छेने दुसऱ्या दिवशी तेथे आले. त्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, मोठमोठे ऋषी आणि वानर मोठ्या कौतुकाने तेथे जमले होते. नंतर मुनिश्रेष्ठ वाल्मीकी सीतेला बरोबर घेऊन तेथे आले. सीता वाल्मीकीच्या मागून किंचित मान खाली घालून आली. तिने हात जोडले होते. तिचा कंठ बाष्पांनी दाटून आला होता. अशा स्थितीत ती त्या यज्ञमंडपात आली. ब्रह्मदेवाच्या मागून जशी लक्ष्मी चालत यावी त्याप्रमाणे ती सीता वाल्मीकी मुनीच्या मागून येताना पाहून सर्वत्र साधुवाद, सीतेबद्दल गौरवोद्गार निघू लागले. मग ते मुनिश्रेष्ठ वाल्मीकी सीतेसह सभास्थानी आले आणि रामाला म्हणाले, ‘‘दाशरथे रामा! ही सीता परम पतिव्रता आहे. ती धर्मचारिणी, धर्मानुसार वागणारी आहे. ती निष्पाप आहे. तरीही लोकापवादाला भिऊन, हे रामा, तिला तू मोठ्या वनात माझ्या आश्रमाजवळ बरेच दिवसांपूर्वी आणून सोडलेस. आपल्या पातिव्रत्याविषयी लोकांचा विश्वास वाटावा म्हणून ती काही प्रत्यय दाखविणार आहे. तरी तिला परवानगी दे. हे दोघे कुश-लव सीतेचे पुत्र असून जुळे जन्मलेले आहेत. हे तुझे पुत्र असून दुर्घर्ष, अजिंक्य असे आहेत. हे रघुकुलश्रेष्ठा! मी प्रचेतसाचा दहावा पुत्र आहे. मी कधी असत्य बोलल्याचे मला आठवत नाही. सत्य आहे तेच मी सांगतो की हे तुझे पुत्र आहेत. अनेक वर्षे मी उत्तम तपश्चर्या केली आहे. जर सीतेच्या हातून दुराचरण घडले असेल तर त्या माझ्या सर्व तपश्चर्येचे फळ मला मिळू नये.’’ वाल्मीकीने असे सांगितल्यावर राम म्हणाला, ‘‘हे सुव्रता! आपण महाज्ञानी आहात. आपण म्हणता ते सर्व सत्य आहे. आपल्या पवित्र शब्दांनीच मला सीतेविषयी प्रत्यय आला आहे. लंकेमध्येही जानकीने देवांसमक्ष शपथपूर्वक खात्री करवून दिल्यामुळे मी तिला मंदिरात घेतले. ब्रह्मन्! सीता ही अपाप असताना लोकभयासाठी मी हिचा त्याग केला, ह्याबद्दल आपण मला क्षमा करावी. हे दोघे पुत्र कुश-लव माझ्यापासूनच झाले आहेत, हे मी जाणतो. सीतेच्या शुद्धतेबद्दल जगात सर्वत्र प्रसिद्धी आहेच, तरी तिच्यावर माझे प्रेम असो.’’ सर्व देवांना रामाचा अभिप्राय कळला असल्यामुळेच सहस्त्रशः देव ब्रह्मदेवाला आपला पुढारी करून मोठ्या उत्सुकतेने तेथे आले. सर्व प्रजानन आनंदित होऊन त्या स्थळी प्राप्त झाले.
सीतेने रेशमी वस्त्र परिधान केले होते. उत्तरेकडे तोंड करून व भूमीकडे दृष्टी लावून ती उभी होती. हात जोडून ती म्हणाली, ‘‘रामाशिवाय अन्य कोणाही पुरुषाचे मी अंतःकरणात चिंतन केले नसेल तर पृथ्वीदेवी आपल्या पोटात मला स्थान देवो.’’ सीतेने अशी शपथ घेताच पृथ्वीतलातून एक अत्यंत विस्मयावह, अतिदिव्य असे सिंहासन प्रगट झाले. ते सूर्यासारखे तेजस्वी असून दिव्यदेही अशा मोठमोठ्या नागांनी उचलून धरले होते. भूदेवीने आपल्या दोन्ही बाहूंनी जानकीला प्रेमपूर्वक आलिंगन दिले आणि तिचे स्वागत करून तिला त्या सिंहासनावर बसविले. सिंहासनावर बसून ती जानकी भूगर्भात प्रवेश करू लागली तेव्हा तिच्यावर सारखी दिव्य पुष्पवृष्टि झाली. देवांच्या मुखातून ‘शाबास, शाबास’ असे अद्भुत स्तुतीवाद निघू लागले. आकाशातील देव, अंतरिक्ष आणि पृथ्वीतलावरील सर्व स्थावरजंगम भूतात तसेच मोठमोठ्या धिप्पाड शरीराच्या वानरात, सीतेच्या शपथेसंबंधी अनेक उद्गार निघू लागले. कोणाला तिच्याबद्दल चिंता वाटू लागली तर कोणी सीतेच्या मूर्तीचे ध्यान करू लागले. कोणी रामाकडे दृष्टी लावून तर कोणी सीतेसंबंधी विचार मनात आणून दिङ्मूढ झाले. काही काळपर्यंत ती सर्व जागा अगदी अचेतन, शांत होऊन गेली. सीता पृथ्वीच्या उदरात प्रविष्ट झाली हे पाहून सर्व जगाला मोठा मोह पडला. रामाला हे माहीत होतेच. तरी सुद्धा पुढील कार्याचे महत्त्व जाणून तो अज्ञानी व्यक्तीप्रमाणे दुःखाने सीतेबद्दल शोक करू लागला. ब्रह्मदेवाने आणि अनेक ऋषींनी त्या रघुनंदन रामाला उपदेश केला. तेव्हा स्वप्नातून जागा झाल्याप्रमाणे राम देहभानावर आला आणि त्याने बाकीची सर्व यज्ञकर्मे पूर्ण केली. आलेल्या सर्व ऋषींची आणि ऋत्विजांची त्यांना भरपूर धन, रत्ने इ. देऊन रवानगी केली आणि त्या दोन मुलांना घेऊन प्रभु रामचंद्र अयोध्येला आले.
तेव्हापासून राम सर्व प्रकारच्या उपभोगाविषयी निरिच्छ होऊन सदैव आत्मचिंतनात निमग्न होऊन एकांतात राहू लागला. कोणे एके वेळी राम एकांतात आत्मध्याननिमग्न होऊन बसला होता. मधुरभाषिणी कौसल्या ‘राम म्हणजे प्रत्यक्ष नारायण होय’, असे समजत होती म्हणून ती एकदा भक्तिपूर्वक रामाजवळ आली आणि नम्रतापूर्वक नमस्कार करून मोठ्या आनंदाने त्या प्रसन्नमुख रामाला म्हणाली, ‘‘हे रामा! तू सर्व जगताचा जनक आहेस. तू आदिमध्यान्तरहित आहेस. तू परमात्मा, सच्चिदानंदस्वरूप, पूर्ण, सर्वांतर्यामी असणारा असा ईश्वर आहेस. तरी तू माझ्या गर्भगृही जन्म घेतलास, हे माझ्या पुण्याचेच फळ आहे. हे रघुत्तमा! माझ्या वृद्धावस्थेत का होईना, पण आज तुला प्रश्न विचारण्यास वेळ मिळाला आहे. हे अज्ञानापासून उत्पन्न झालेले संसारबंधन अजून समूळ नाहीसे होत नाही. हे विभो! जेणेकरून संसारबंधन नष्ट होईल, असा उपदेश सध्याच्या स्थितीतही मला कर.’’ विषयोपभोगासंबंधी वैराग्य धारण करून त्या मातेने असा प्रश्न केला असता त्या मातृवत्सल, दयाळू व धर्मशील रामाने त्या जरेने जीर्ण झालेल्या आपल्या सुचरित मातेला म्हटले, ‘‘पूर्वी मोक्ष प्राप्त करून देणारे असे तीन मार्ग मी सांगितले. ते कर्मयोग, ज्ञानयोग आणि अखंड भक्तियोग हे आहेत. माते! त्रिगुणभेदांनी भक्तीचेही तीन प्रकार झाले आहेत. ज्या ज्या स्वभावाचा मनुष्य असेल त्या त्या प्रमाणे त्याची भक्ती भिन्न असते. जो मनुष्य हिंसा, दंभ, ढोंग किंवा मात्सर्य हे सर्व साधण्याच्या हेतूने भेददृष्टी ठेवून त्या आग्रहाने माझी भक्ती करतो त्याला तामस म्हणतात. जो कोणी काही विशिष्ट फलप्राप्तिसाठी, भोगसुखाकरिता धन किंवा कीर्ती ह्यासाठी ‘मी पूजक वेगळा व पूज्य ईश्वर वेगळा’ अशा भेदबुद्धिने मूर्ती इत्यादिकांच्या ठिकाणी माझे पूजन करतो तो राजस होय. आचरण केलेले कर्म पापनाशासाठी जो ईश्वराला, मला समर्पण करतो किंवा कर्तव्य असे मानून ते कर्म भेदबुद्धिने का होईना पण करतो, तो भक्त सात्त्विक होय. गंगेचे पाणी समुद्राला मिळाले असता ते जसे एकरुप होते त्याप्रमाणेच अनंत गुणांचा आधार असा जो मी, त्या माझ्या गुणांचाच आश्रय करून अविच्छिन्न अंतःकरणवृत्ती माझ्या स्वरूपी लावणे हेच निर्गुण भक्तियोगाचे लक्षण होय. फलेच्छा सोडून माझी अखंड भक्ती मनात उत्पन्न झाली की ती भक्ताला सालोक्य, सामीप्य, स्वरूपता किंवा सायुज्य यापैकी हवी ती मुक्ती देते. परंतु माझे भक्तजन माझ्या सेवेशिवाय इतर कशाचाही स्वीकार करीत नाहीत आणि हे स्त्रिये! अत्युत्तम भक्तियोग म्हटला म्हणजे सालोक्यादि मुक्तींचा त्याग हाच होय. ह्याच्या योगाने मनुष्य त्रिगुणांचे उल्लंघन करून मत्स्वरूपी प्राप्त होतो. आता कर्मयोगाचा विचार सांगतात. कोणतीही फलेच्छा मनात न धरता स्वधर्माचे आचरण करावे, ज्यात हिंसा नाही अशा प्रकारची शास्त्रांनी सांगितलेली कर्मे करावी. माझे दर्शन घ्यावे. माझी स्तुती करावी. माझ्या महापूजा कराव्या, माझे स्मरण व वंदन करावे. सर्व भूतांच्या ठिकाणी मद्भाव ठेवावा, कोठेही आसक्ति ठेवू नये. असत्याचा त्याग करावा. मोठ्यांना भरपूर मान द्यावा. दुःखितांवर दया करावी. समान योग्यतेच्या मनुष्यांशी मैत्री धरावी. यमनियमादि पाळावे. वेदांतवाक्यांचे श्रवण करावे. माझे नामकीर्तन करावे. सत्संगती धरावी. सर्वांशी सरळपणाने वागावे. अहंकाराचा त्याग करावा. माझ्या धर्मावर आदरपूर्वक निष्ठा धरावी. असे वर्तन ठेवल्याने मनुष्याचे चित्त शुद्ध होते. ज्याप्रमाणे वायुवशेकरून गंध आश्रयभूत पदार्थांवरून नाकात शिरतो त्याचप्रमाणे असा मनुष्य माझ्या गुणश्रवणाच्या योगाने माझ्या स्वरूपी तत्काल प्राप्त होतो. ह्या रितीने योगाभ्यासात चित्त आसक्त झाले म्हणजे ते आत्मस्वरूपात प्रवेश करते. माते! मी सर्व प्राणिमात्रांमध्ये आत्मरूपाने राहात आहे, हे न ओळखता बाहेरून मूर्ख लोक मोठ्या श्रमांनी मिळविलेल्या अनेक प्रकारच्या गंध, पुष्पादि द्रव्यांनी, पदार्थांनी माझे पूजन करतील, त्यापासून मला संतोष होणार नाही. जो भूतांचा, प्राण्यांचा अपमान करतो अशा मनुष्याने माझी पूजा केली तरी ती न केल्याप्रमाणेच होय. जोपर्यंत मी सर्वभूतस्थित आहे अशी प्रतीति अंतःकरणात येत नाही तोपर्यंत मनुष्याने कर्मानुष्ठाने करून प्रतिमादिकांच्या ठिकाणी माझी पूजा करावी. जीवात्मा आणि परमात्मा हे भिन्न आहेत अशी भावना ज्या अंतःकरणात रहात असते अशा भिन्नदृष्टी मनुष्याला मृत्यु भय घालणार यात संशय नाही. म्हणून वेगवेगळ्या सर्व भूतांमध्ये मी वास करीत असतो अशी भावना ठेवून, भेदबुद्धि टाकून देऊन ज्ञानाने, प्रेमाने आणि गौरवाने माझी एकट्याची आराधना करावी. बुद्धिमान पुरूषाने मी चैतन्यरूप शुद्ध आत्मा जीवरूपाने सर्व भूतांच्या ठिकाणी रहात असतो अशी भावना ठेवून सर्व प्राण्यांना अंतःकरणपूर्वक नित्य वंदन करावे, म्हणून ईश्वर आणि जीव हे निराळे आहेत अशी भेदबुद्धि कधीही मनात आणू नये. माते, मी तुला भक्तियोग आणि ज्ञानयोग सांगितला. ह्यापैकी कोणत्याही एका मार्गाचा स्वीकार केल्याने मनुष्याला शांती प्राप्त होते. म्हणून माते! ‘सर्वांच्या अंतर्यामी राहणारा’ अशा भक्तियोगाने किंवा ‘मी तुझा पुत्र आहे’ अशा भावनेने नित्य माझे स्मरण करीत राहा. अशा योगाने तुला शांति प्राप्त होईल.’’
रामाचे हे भाषण ऐकून कौसल्येला परम आनंद झाला. अंतःकरणात सदैव रामाचे ध्यान करीत राहिल्याने तिची सर्व संसारबंधने तुटून गेली आणि तिनही सात्त्विक, राजस आणि तामस ह्या गतींना उल्लंघून ती परम पदाला प्राप्त झाली. कैकेयीला रामाने पूर्वीच योगाचा उपदेश केला होता. त्यामुळे रामाच्या वचनावर तिची श्रद्धा व भक्ती होती. शांतचित्ताने रघुवीरतिलकाचे ती चिंतन करीत असे. शेवटी मृत्यु आल्यावर स्वर्गलोकी जाऊन दशरथासह तीही आनंदात राहिली. तेथे तिला दिव्य कांती प्राप्त झाली तसेच लक्ष्मणाची माता सुमित्रा निर्मलमती पावून पतीच्या सन्निध पोचली.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे सप्तमः सर्गः।