श्री महादेव म्हणाले,
‘‘पार्वती! रघुत्तम राम म्हणजे जगतात ज्या काही मंगलरूप, कल्याणरूप गोष्टी आहेत त्या सर्वांना मंगलत्व देणारी प्रत्यक्ष ब्रह्मानंदमूर्तिच होय. अशा त्या श्रीरामाने आपल्या चरित्राच्या आधारावर अनेक रामायणे होतील अशी उत्तम कीर्ती संपादन केली आहे. सीतात्यागानंतर तो राम आपल्या पूर्वजांनी व इतर राजर्षींनी आदरपूर्वक स्वीकारलेल्या आचारांच्या अनुरोधाने वागत असे. उदार मनाच्या लक्ष्मणाने विचारल्यावर प्राचीन काळी घडलेल्या कित्येक पुण्यकथा राम त्याला सांगत असे. एका प्रसंगी नकळत अपराध घडून शाप पावलेल्या नृग राजाला क्षुद्र प्राण्याचा, सरड्याचा जन्म कसा प्राप्त झाला ती कथा रामाने लक्ष्मणाला सांगितली. एकदा ज्याच्या पदकमलाची सेवा लक्ष्मी करीत असते असा तो प्रभु राम एकांतात बसला असता लक्ष्मण तेथे आला. नंतर त्याने भक्तिपूर्वक रामाला नमस्कार केला आणि जिज्ञासूप्रमाणे योग्य अशा शुद्ध भावाने नम्रतापूर्वक विचारले, ‘‘महामते रामा! तू निर्मल ज्ञानस्वरूप आहेस. तू सर्वांचा अंतर्यामी आत्मा आहेस. तू स्वतः निराकार असून सर्वांचा नियंता आहेस. ज्ञानाच्या दिव्य दृष्टिला तू प्रतीत होणारा आहेस. कमलाच्या ठायी रुंजी घालणाऱ्या भ्रमराप्रमाणे ज्यांची अंतःकरणे तुझ्या चरणी आसक्त होतात, त्यांनाच ही दिव्य दृष्टि प्राप्त होते. प्रभो! संसाराची निवृत्ती करणारे, योगिजनांनी ध्याईलेले असे जे तुझे पदकमल, त्याला मी शरण आलो आहे. जेणेकरून अज्ञानरूप समुद्र मी सुखाने लवकर तरून जाईल, असा काही उपदेश मला कर.’’
श्रीरामाचे ब्रीद म्हणजे शरणागतांची दुःखे हरण करणे हे असे. लक्ष्मणाचे संपूर्ण भाषण ऐकून त्या राजशिरोमणि रामाला परम संतोष झाला, लोकांच्या अज्ञानतमाचा नाश जेणेकरून होईल असे वेदांनाही संमत जे आत्मतत्त्वज्ञान ते त्याने लक्ष्मणाला सांगितले. राम म्हणाला, ‘‘सर्वप्रथम मनुष्याने स्ववर्णाश्रमानुसार नित्यनैमित्तिक कर्मे करावी. त्यायोगे अंतःकरणशुद्धि होईल. पुढे त्या अंतःकरणशुद्धिमुळे शमदमादि साधने प्राप्त झाली असता कर्माचरण सोडून द्यावे व आत्मज्ञानासाठी सद्गुरुचा आश्रय करावा. ह्या शरीराच्या जन्माला कारण म्हटले म्हणजे पूर्वजन्मी प्राण्याने आदरपूर्वक केलेली कर्मे हेच होय. ह्या जन्मातही तो विषयावर प्रेम करू लागला म्हणजे त्याच्या हातून धर्म व अधर्म घडतात व ते धर्माधर्म त्याला सुखदुःखजनक असे होतात. पुढे ते कर्मच मूळ होऊन प्राण्याला पुनः जन्म घ्यावा लागतो. त्या जन्मातही तो पुनः कर्म करतो. अशारितीने कर्मापासून जन्म व जन्मातून कर्म, हे संसारचक्र सारखे चालत असते असे म्हणतात. ह्या संसाराचे मूळ कारण म्हणजे अज्ञानच होय आणि त्याला दूर करणे हे प्राण्याचे अवश्य कर्तव्य होय. अज्ञानाचा नाश करण्यास समर्थ म्हणजे एकच ज्ञान, आत्मतत्त्वज्ञानच होय. अज्ञानोत्पन्न कर्मापासून त्याच्या अज्ञानाचा नाश होणे शक्य नाही. कारण जे सविरोध असते तेच नाशक होते असे म्हटले आहे. कर्माच्या योगे अज्ञानाचाही नाश होत नाही आणि विषयासक्तिही क्षय पावत नाही. त्यापासून सदोष असे नवे कर्म मात्र उत्पन्न होते. त्यापासून पुनः संसार मागे लागतो. त्या संसाराला टाळता येणे शक्य नाही. म्हणून सुज्ञ मनुष्याने नेहमी आत्मज्ञानाचा विचार करावा. ह्यावर असा आक्षेप आहे की वेदाने आपल्या मुखाने ज्ञान हे जसे पुरुषार्थाचे साधन म्हणून सांगितले आहे तसेच कर्मे, नित्यनैमित्तिक कर्मे प्राण्याने अवश्य केली पाहिजेत असेही सांगितले आहे. कर्म हे ज्ञानाला पुष्ट करणारे आहे. कर्म न केले असता दोष लागतो असेही श्रुतीने सांगितले आहे. म्हणून मुमुक्षूने कर्म अवश्य केले पाहिजे. ह्या आक्षेपावर असे म्हणणे आहे की ‘ज्ञान हे स्वतंत्रपणे निश्चित कार्य करणारे मोक्ष मिळवून देणारे आहे. ते कोणाचे साहाय्य घेण्याचे मनातही आणत नाही.’ यावर आक्षेपक म्हणतात की असे नाही. यज्ञाचे फल सत्यपणे मिळायचे असले तरीही त्याला सिद्धीकरिता इतर अंगांची अर्थात साधनांची अपेक्षा करावी लागते. त्याचप्रमाणे ज्ञानास शास्त्रविहित कर्माची जोड मिळाल्यासच ते ज्ञान मोक्ष देण्यास समर्थ होईल. कित्येक वितर्कवाद्यांचे असे जे म्हणणे आहे ते ही सत्यास सोडून आहे. कारण कर्म आणि ज्ञान यांचा उघड उघड विरोध आहे. देहाभिमान ठेवल्याने प्राण्यांच्या ठिकाणी क्रिया वाढत जाईल, तो देहाभिमान जाईल तेव्हाच त्याला ज्ञान प्राप्त होईल. परम निर्मल आत्मज्ञान करून देणाऱ्या वेदांत वाक्यांच्या आलोचनाने जी शेवटी अंतःकरणाची ब्रह्माकार वृत्ति होते तिलाच विज्ञान, तत्त्वज्ञान असे विद्वान लोक म्हणतात. सकल कारकांच्या अंगांच्या योगे कर्म उदयाला येते. उलट ज्ञान सर्व कारकांचा, कर्तृत्त्वादि बुद्धिचा नाश करते. म्हणून मुमुक्षू पुरुषाने कर्माचा पूर्णपणे त्याग करावा. कारण कर्माचा ज्ञानाशी विरोध आहे म्हणून कर्म आणि ज्ञान ह्या दोघांचा समुच्चय, एकत्र राहणे शक्य नाही. यासाठी सर्व इंद्रियांच्या वृत्तीचे विषय नित्य सोडून द्यावे आणि आत्मानुसंधानपरायण होऊन रहावे. जोपर्यंत प्राणी शरीरादि जड वस्तूंवर अज्ञानाने अहंभाव ‘मी म्हणजे शरीर’ ही बुद्धि ठेवतो तोपर्यंत वेदांतील कर्मबोधक विधि त्याला पाळावे लागतात. परंतु ‘नेति नेति’ ‘हे असे नव्हे’, ह्या वचनांनी सर्व जगत् मिथ्या आहे असे पक्के समजून आले आणि परमात्मा त्या जगाहून वेगळा अर्थात सत्य आहे हे ज्ञान झाले म्हणजे सर्व कर्मे मुमुक्षुंनी सोडावी. जेव्हा आत्मा आणि परमात्मा हा भेद दूर करणारे प्रकाशमय आत्मज्ञान अंतःकरणात उत्पन्न होते, तेव्हा माया आपल्या कारकांसह कारणांसह तत्काळ लयाला जाते. जीवाला संसारात पडण्याचे कारण म्हणजे ही मायाच आहे. श्रुतिप्रमाणोत्पन्न ज्ञानाच्या योगे ही माया एकदा नष्ट केली म्हणजे मग ती पुनः आपले कार्य कसे बरे करणार? निर्मळ व द्वैतरहित आत्मतत्त्वज्ञानाने ती नष्ट झाली असता पुनः उत्पन्नच होणार नाही. असे झाले म्हणजे ‘मी कर्ता’ हा अभिमान तरी कसा उत्पन्न होईल. म्हणून ज्ञान हेच एकटे स्वतंत्र असे मोक्षाचे साधन असून त्याला दुसऱ्या कोणाच्याही साहाय्याची अपेक्षा नाही. त्या तैत्तिरीय उपनिषदात आदरपूर्वक स्पष्ट सांगितले आहे की वेदांत अर्थवादवाक्यांनी कर्माची प्रशंसा केली असली तरी ती सर्व कर्मे सोडून द्यावी. वाजसेनीय शाखेच्या ‘एतावत्’ ह्या श्रुतीनेही हेच सांगितले आहे की ज्ञान हे मोक्षाचे साधन आहे. कर्म साधन नाही. हे समुच्चयवाद्या! यज्ञ ज्ञानासारखा आहे हे तू दाखविलेस, परंतु त्याला योग्य असा दृष्टांत सांगितला नाही. यज्ञांची फळे वेगवेगळी असल्यामुळे त्यांच्या सिद्धतेसाठी भरपूर साधने लागतात. ज्ञान मात्र ह्या उलट आहे. ‘कर्मत्यागाने मी दोषी होईन’ हा जडधर्माचा आरोप अज्ञानी, तत्त्वज्ञानी नसलेल्यांच्या ठिकाणी दिसून येतो. परंतु जे तत्त्वज्ञानी आहेत त्यांना मात्र तसे वाटत नसते. म्हणून सुज्ञ पुरूषांनी शास्त्रातील विहित कर्मे देखील सोडून द्यावीत. श्रद्धायुक्त होऊन आणि मन निर्मळ करून गुरुकृपेने ‘तत्त्वमसि’ इत्यादी वाक्यांनी परात्मा आणि जीवात्मा ह्यांचे एकरुपत्व जाणावे आणि मेरूप्रमाणे निश्चल सुखरूप होऊन रहावे. लक्ष्मणा! वाक्याचा बरोबर भ्रमरहित अर्थ समजण्यासाठी पहिल्यांदा त्यातील पदांचा अर्थ नीट समजून घेणे आवश्यक असते. महावाक्यातील ‘तत्त्वमसि’ ह्यातील ‘तत्’ आणि ‘त्वं’ ह्या दोन पदांचे अर्थ ‘परमात्मा’ आणि ‘जीव’ हे आहेत. ‘असि’ हे पद उभयतांचे ऐक्य प्रगट करते. आता परमात्मा सर्वज्ञ आहे आणि जीव किंचिज्ञ आहे, त्यामुळे दोघांचे ऐक्य होणे विरुद्ध होय. ह्या आशंकेला उत्तर असे की, जीवाच्या ठिकाणी अहंबुद्धिवेद्यत्व आहे. ईश्वराच्या ठिकाणी ते नाही. अर्थात, अंतःकरणातील अहंभावनेनेच समजून येणारा जीव आणि अहंभाव नष्ट झाल्यानंतर समजून येणारे ईशस्वरूप ह्यामधील प्रत्यक्षत्व परोक्षत्वाचा विरोध काढून टाकावा आणि लक्षणेने विचार करून ते दोघेही चैतन्यरूपाने एक आहेत हे जाणावे. मग आपण जीव आपला आत्मा तसाच चैतन्यमय आहे हे समजून तद्रूप व्हावे. जीवात्मा व परमात्मा ह्यांचे स्वरूप एकच असल्यामुळे येथे ‘तत्त्वमसि’ चा अर्थ करताना ‘जहत्स्वार्थलक्षणा’ किंवा ‘भागलक्षणा’ मूळचा अर्थ सोडून धोरणाने दुसरा अर्थ स्वीकारणे संभवत नाही. तसेच ‘अजहत्स्वार्थलक्षणा’ मूळचा अर्थ न सोडता धोरणाने दुसरा अर्थ भरीला घालणे हे सुद्धा संभवत नाही. कारण तेथे ह्या दोघांचा विरोध आहे. आता राहिलेली ‘जहत्जहत्स्वार्थलक्षणा’ किंवा ‘भागलक्षणा’ मूळचा अर्थ काही सोडणे व काही न सोडणे, ती येथे जुळते कारण ‘सोऽयं’ ‘तो हा’ ह्या पदांप्रमाणे ‘तत् त्वम्’ ‘ते तू’ ह्या पदातील अनुक्रमे सर्वज्ञत्व व अल्पज्ञत्व सोडून दोघांचे चिदात्मकत्व ब्रह्मरूपत्व घ्यायचे आहे. अशारितीने ‘तत्वं’ ह्या पदांचा अविरोधाने अर्थ लावावा. हे शरीर पृथ्व्यादि एकवटलेल्या पंचभूतांच्या योगे उत्पन्न झालेले असून सुखदुःखादि प्राप्त करून देणाऱ्या कर्माचे भोगस्थान आहे. ह्याला उत्पत्ति व नाशही आहेत. हे पूर्वजन्मार्जित कर्मापासून उत्पन्न झालेले आहे. हे परंपरेने मायेचे कार्य आहे. असे हे शरीर म्हणजे जीवाचा स्थूल उपाधि होय. विद्वान लोक मन, बुद्धि, दहा इंद्रिये आणि पंचप्राण ह्यांनी युक्त असे दुसरे एक सूक्ष्म शरीर जीवाचा उपाधि आहे असे मानतात. ह्याची उत्पत्ति अपंचीकृत, मिश्र न झालेल्या पाच भूतांपासून होते. भोक्त्याला सुखदुःखादि भोग मिळण्याचे साधन म्हणजे हेच होय. आता ईश्वराचा उपाधि कोणता ते सांगतो. अनादि, अनिर्वचनीय, सकल जगताच्या उत्पत्तीचे कारण अशी माया म्हणजे ईश्वराचे परम प्रधान शरीर आहे. मूळ आत्मा एक आहे. तरी ह्या उपाधिभेदामुळे तो जीव आणि ईश्वर असा वेगळा होऊन राहिला आहे म्हणून श्रवण, मनन, निदिध्यासन ह्या क्रमाने जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य आहे असे समजावे. हा आत्मा शरीरामध्ये असणाऱ्या अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाच कोशांच्या संबंधांमुळे त्या त्या आकाराने भासू लागतो. स्ङ्गटिकाच्या खड्याच्या संगतीने जशी वस्तु असेल तसा त्या स्ङ्गटिकाला रंग येतो. हे उदाहरण आहे. महावाक्याचा सम्यक् रितीने विचार केला असता हा आत्मा असंग, अज, अद्वितीय आहे अशी प्रतीति येते. ह्या आत्म्याच्या ठिकाणी स्वप्न, जागृति आणि सुषुप्ति अशा तीन प्रकारच्या अवस्था भासतात. त्या रज, सत्त्व आणि तम ह्या त्रिगुणात्मक बुद्धिचे धर्म होत. आत्म्याचे नव्हे. आत्मा नित्य, तिन्ही गुणांपेक्षा वेगळा, व्यापक, असंग आणि आनंदरूप आहे. अशा आत्म्यावर हे अनित्य, मिथ्या अवस्थात्रय आरोपिले जातात. बुद्धिच्या अध्यासामुळे तसा भास होतो. ह्या तीन अवस्थांपैकी एक अनुभवित असता दुसऱ्या दोन हातातून निघून जातात. म्हणून ह्या तीन अवस्था क्षणिक म्हणून अनित्य आहेत. देह, इंद्रिये, प्राण आणि मन ह्यापैकी प्रत्येकाचा आत्म्यावर अध्यास झाल्यामुळे बुद्धिचा तमोमूल आणि अज्ञानजन्य प्रवाह सर्वदा चालू राहतो आणि जोपर्यंत हा प्रवाह वाहत राहील तोपर्यंत संसाराचे रहाटगाडगे चालू असणारच. ‘नेति नेति’ ह्या प्रमाणावरून दृश्य हे सारे खोटे आहे असे समजले की मग सत्त्वगुणप्रधान हृदयात ज्ञानमय सुखाचा अनुभव आला म्हणजे कोवळ्या नारळातील मधुररस पिऊन ती कवची जशी फेकून दिली जाते त्याप्रमाणे निखिल जगताचा त्याग करावा. उदासीन राहावे. हा आत्मा कधी मृत होत नाही, उत्पन्न होत नाही, क्षीण होत नाही, वाढत नाही किंवा नवा होत नाही. त्याने देहेंद्रियादि सर्वांचे महत्त्व नाहीसे केले आहे. हा सुखरूप, स्वयंप्रभ, सर्वव्यापी व द्वैतविहीन आहे. (यावरील शंका) अशा प्रकारचा ज्ञानस्वरूप आणि सुखमय आत्मा आहे. तर त्यावर दुःखात्मक संसार कसा बरे प्रत्ययाला, अनुभवाला येतो? (यावर उत्तर) अज्ञानामुळे आत्म्यावर देहेंद्रियांचा अध्यास केल्याने हा संसार अनुभवास येतो. परंतु एकदा स्वरूपज्ञान झाले की, तो क्षणात नाश पावतो, कारण अज्ञान आणि ज्ञान यांचा विरोध आहे. पदार्थ वेगळाच असून त्यावर भलत्याच पदार्थाचा भ्रमामुळे आरोप केला जातो, ह्याला विद्वान लोक ‘अध्यास’ असे म्हणतात. उदाहरणार्थ, वस्तुतः सर्प नव्हे, अशा दोरी वगैरे पदार्थावर अध्यासाने सर्पाचा आरोप करतात. त्याचप्रमाणे ईश्वरावर जगाचा अध्यास केला जातो. ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी विकल्पांचे कारण जी माया ती नाही. आत्मा हा सर्वांचे कारण, दुःखरहित, सर्वव्यापी, सर्वविकारशून्य, दिसणाऱ्या सृष्टीहून वेगळा असा आहे. त्याच्यावर प्रथमतः अहंकार कल्पिला गेला. हाच अध्यास होय. इच्छा, उपेक्षा, प्रीति, द्वेष, सुखदुःख हे ज्यांचे गुणधर्म ती संसाराची कारणे परमेश्वरावर आरोपिली जातात. वस्तुतः ती बुद्धिवर राहणारी आहेत. झोपेमध्ये ह्या भावनांचा लोप होत असतो म्हणून सुखस्वरूप आत्मप्रत्यय येत असतो. अनादि अविद्येपासून जी बुद्धि उत्पन्न होते, तिच्यामध्ये चैतन्याच्या प्रकाशाचे प्रतिबिंब पडले असते तेव्हा त्या प्रतिबिंबाला ‘जीव’ असे म्हणतात. तेथे आत्मा बुद्धिचा साक्षी होऊन वेगळा रहात असतो. बुद्धिला त्याचा परिच्छेद करता येत नाही. तो व्यापक आहे. लोखंड अग्नीत घालून तप्त केले असता एकत्र सहवासामुळे त्याला अग्नी हे नाव प्राप्त होते व लोखंडाचाही गुणधर्म अग्नीवर दिसतो. त्याप्रमाणे चैतन्याचे प्रतिबिंब जीव आणि इंद्रियांसहित मन, ह्यांच्या सान्निध्याने परस्पर अध्यास होऊन आत्म्याचा धर्म चेतनत्व, मनावर व मनाचा धर्म जडत्व, आत्म्यावर होतो. म्हणून गुरुपासून किंवा वेदवचनांकडून ज्ञानरूप आत्मानुभव प्राप्त करून घ्यावा. त्याचे नीट चिंतन करावे आणि आपला आत्मा उपाधिवर्जित असून हृदयात रहात असतो हे जाणून आत्म्यावर दृश्य होणाऱ्या सर्व जड देहेंद्रियादिकांस टाकून द्यावे. त्याबाबत उदासीन असावे. मी प्रकाशरूप आहे. मी अज आहे. मी अद्वय आहे. मी नित्य प्रतीत आहे. मी अत्यंत निर्मल आहे. मी शुद्धज्ञानाने ओतप्रोत भरून आहे. मी दुःखरहित, व्यापक व आनंदमय आहे. मी अक्रिय आहे. मी नित्यमुक्त आहे. माझ्या शक्तीला पार नाही. अतीन्द्रियज्ञान हे माझे रूप आहे. मी परिणामहीन आहे. मी अनंत अपार आहे. वेदवेत्ते विद्वान लोक अंतःकरणात अहर्निश माझे चिंतन करीत पुरूषचित्ताला विषयांकडे न जाऊ देता स्वरूप विचार करीत राहातील तर त्यांची अंतःकरणवृत्ति ब्रह्माकारा होऊन जाईल आणि मग त्यायोगे अविद्या सर्व कारकांसह देहान्तराला कारण अशा कर्मांसह तत्काल लयाला जाईल. रसायन घेतले असता रोगाचा तत्क्षणी नाश होतोच, त्याप्रमाणे ह्या वृत्तीने अज्ञानाचा नाश होतो. पुरूषाने विजनस्थानी आसनावर बसावे. इंद्रिये ताब्यात ठेवावी. प्राणायामादि साधनांनी मन जिंकावे. चित्त शुद्ध करावे. आत्मज्ञानाशिवाय मोक्षाचे अन्य कोणतेच साधन नाही, हा निश्चय करावा. आत्मज्ञानाकडेच दृष्टी लावावी आणि मग असंग होऊन आत्मस्वरूपी लीन व्हावे. ह्या सर्व जगताला प्रकाशित करणारा परमात्मा हा जगाचे सर्व कारण, उपादानकारण आहे. तरी अशा आत्मरूपी सर्व जगताचा लय करावा असा पुरूष पूर्ण चिदानंदमय होऊन राहतो तेव्हा त्याला बाह्य किंवा आंतर विषयाचे ज्ञानच रहात नाही. त्याने समाधीच्या पूर्वी सर्व स्थावरजंगमात्मक जगत् ओंकारमात्र आहे असे समजावे. जग हे प्रणवाचे, ओंकाराचे वाच्य आहे व प्रणव हा जगताचा वाचक आहे, हे प्रसिद्ध आहे. जगत् ओंकाररूप पाहाणे हा सुद्धा अज्ञानाचा प्रकार आहे. ज्ञान झाले असता ही वृत्ति रहात नाही. ‘ओम्’ हा शब्द अ, उ, म् अशी तीन अक्षरे मिळून झाला आहे. जागृतावस्थेचा साक्षी जो ‘विश्व’ त्याचीच ‘अ’ ही संज्ञा आहे. क्रमाने दुसरा वर्ण ‘उ’ हा स्वप्नावस्थेचा साक्षी असून त्याला ‘तैजस’ असे म्हणतात आणि तिसरा ‘म्’ हा सुषुप्त्यवस्थेचा साक्षी असून त्याला ‘प्राज्ञ’ असे सर्व लोक म्हणतात. हा विचार समाधीपूर्वीचा होय. तत्त्वज्ञान झाल्यावर हा विचारच रहात नाही. जागृतावस्थेचा अभिमानी असलेला ‘विश्व’ पुरूष व वाचक ‘अ’ वर्ण ह्यांना उकारामध्ये विलीन करावे, नंतर स्वप्नावस्थेचा अभिमानी ‘तैजस’ आणि त्याचा वाचक ‘उ’ ह्यांना प्रणवाच्या शेवटच्या ‘म्’ वर्णात विलीन करावे. नंतर त्या ‘म’काराला आणि त्याचा वाच्य आणि कारणाभिमानी प्राज्ञ पुरूष ह्यांना चिदात्मरूपावर विलीन करावे आणि मग विज्ञानदृष्टी होऊन, ‘ते नित्यमुक्त परब्रह्म मी आहे’ अशी भावना करावी. अशाप्रकारे परमात्मरूपी ऐक्यस्थिति झाली म्हणजे तो सर्व पुत्रगेहादि विसरून जातो आणि स्वरूपानंदानेच तुष्ट होतो. नित्य आत्मसुखाचा प्रकाश हेच त्याचे रूप होय. असा तो पूर्ण निर्मुक्त जीवन्मुक्त पुरूष निश्चल उदकाने भरलेल्या समुद्रासारखा स्थिर असतो. अशारितीने जो सर्वदा समाधीयोगाचा अभ्यास करतो, सर्व इंद्रियविषयांपासून दूर राहतो, सर्व कामक्रोधादिक रिपूंना जिंकतो, षड्गुणसंपन्न आत्म्याला स्वाधीन करून घेतो, त्यालाच माझे दर्शन होते. मुनीने अशाप्रकारे अहर्निश आत्मस्वरूपी आपले ध्यान लावावे आणि सर्व बंधनातून मुक्त होऊन रहावे. प्रारब्ध कर्मे करून जे प्राप्त होईल ते अभिमान सोडून भोगावे म्हणजे तो माझ्याच स्वरूपी लय पावेल. हा संसार म्हणजे प्रारंभी, मध्ये व अंतीही भय आणि शोक ह्यांचे कारण आहे, हे जाणून विधिवाक्यांनी सांगितलेली सर्व कर्मे सोडून द्यावी. सर्वांतरी असणारा आत्मा परमेश्वर जो मी, त्या माझीच भक्ती करावी. माझ्या स्वरूपी जीव अभेदाने आहे असे चिंतन करीत जो राहतो तो माझ्याशी ऐक्य पावतो. समुद्राला पाणी जाऊन मिळाले की ते समुद्ररूप होते. दुधात दूध मिळाले की एकरूप होते. घट फुटला असता त्यातील आकाश मोठ्या आकाशात मिसळते, बाहेरील वातावरणात भात्यातील वायु जसा एकवटून जातो त्याप्रमाणे जीवात्मा परमात्म्याशी तद्रूप होतो. अशारितीने लौकिक व्यवहार करीत असतानाही मुनि ‘जग खोटेच आहे’ असा सतत विचार करीत असल्यास त्याला ऐक्यज्ञान होईल आणि त्याची जगतावरील सत्याची भ्रांती दूर होईल. कारण श्रुति आणि युक्ति ह्या दोन्ही प्रमाणांनी दृश्य जगत् हे सारे खोटे ठरवून त्याचा निरास केला आहे. ज्याप्रमाणे मनुष्याला कधी एका चंद्राचे दोन चंद्र दिसतात किंवा दिशाभूल होते. परंतु सत्यज्ञान झाले म्हणजे हे भ्रम दूर होतात. त्याचप्रमाणे आत्मतत्त्वज्ञान झाले म्हणजे सर्व जगत् मद्रूप आहे असे दिसून येते. जोपर्यंत हे सर्व जगत् मद्रूप आहे, ही गोष्ट दृष्टिला समजून येत नाही तोपर्यंत मनुष्याने माझे आराधन करण्यात तत्पर रहावे. ज्या श्रद्धाळू पुरूषाच्या हृदयात मजविषयी अत्यंत भक्ति असल्याचे दिसून येते त्याच्याच हृदयात मी दृश्य होतो. हे प्रिय लक्ष्मणा! सर्व वेदांचा सारसंग्रह म्हणून निश्चित केलेला असा जो अत्यंत गुप्त तत्त्वविचार तो मी तुला सांगितला. जो बुद्धिमान पुरूष ह्याचा नीट विचार करील तो क्षणात पातकांच्या राशींपासून मुक्त होईल. बंधो! हे जे सर्व जगत् दिसत आहे ती सर्व मायाच आहे, असे समज आणि अंतःकरणातून तिचा त्याग कर. नंतर माझ्या चिंतनाने तुझे मन शुद्ध होईल आणि तू आनंदमय, निरामय आणि सुखी होशील. मी सत्त्वादि गुणांनी रहित आहे. मी गुणातीत, त्रिगुणात्मक मायेच्या पलीकडे आहे. मी कधीकाळी गुणयुक्त असे सगुण रूपही धारण करतो. माझी निर्मल अंतःकरणाने जो सेवा करतो तो मद्रूप होऊन जातो. जसा सूर्य आपल्या किरणांनी जगत्रयाला पवित्र करतो त्याप्रमाणे तो भक्तही आपल्या चरणधुलीच्या स्पर्शाने त्रैलोक्याला शुद्ध पवित्र करतो. वेदान्तरहस्य समजल्यानेच ज्याच्या चरित्राचे यथार्थ आकलन होऊ शकते तो मी आहे. संपूर्ण श्रुतींमध्ये जणू काय एकच सार असे हे विज्ञान, तत्त्वज्ञान मी तुला सांगितले. त्याचे जो श्रद्धेने, भक्तिपूर्वक पठण करील, माझ्या वचनावर भक्ति ठेवेल त्याला माझ्या स्वरूपी गति मिळेल.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे पञ्चमः सर्गः।