श्री महादेव म्हणाले,
‘‘लक्ष्मणाचा त्याग केल्यानंतर रामाला फार दुःख झाले. तो आपले मंत्री आणि वसिष्ठ ऋषी ह्यांना म्हणाला, ‘‘महाबुद्धिमान भरताला राज्याभिषेक करून लक्ष्मणाच्या मागे जावे अशी आता मला इच्छा झाली आहे.’’ असे त्या रघुश्रेष्ठाने सांगितले असता नगरवासी आणि देशवासी अशा सर्व लोकांनी दुःखी होऊन, मुळे तुटून पडलेल्या वृक्षाप्रमाणे जमिनीवर लोळण घेतली. रामाच्या तोंडून निघालेले शब्द ऐकून भरताला सुद्धा मूर्च्छा आली. त्याने राज्याचा तिरस्कार केला. तो रामाजवळ येऊन म्हणाला, ‘‘हे प्रभो! रघुश्रेष्ठा! मी तुझ्या पायांची शपथ घेऊन सत्यपूर्वक सांगतो की तुझ्यावाचून पृथ्वीवरील राज्याची किंवा स्वर्गीय राज्याची मला अजिबात इच्छा नाही. राजा राघवा! ह्या कुशलवांना राज्याभिषेक कर. ह्या कुशवीराला कोसलदेशी अभिषेक कर तसेच लवाला उत्तरेचे राज्य दे व शत्रुघ्नला आणण्यासाठी शीघ्र दूत पाठव. आमचे स्वर्गवासाला जाणे त्याला कळू द्या.’’
भरताचे हे भाषण ऐकून रामाच्या वियोगाच्या कल्पनेने सर्व प्रजानन अत्यंत भयभीत झाले. त्यांनी त्याच्या मुखाकडे पाहिले आणि जमिनीवर देह टाकले. भगवान वसिष्ठांना ते पाहून करुणा आली आणि ते रामाला म्हणाले, ‘‘रामा! हे सर्व प्रजानन जमिनीवर पडून राहिले आहेत. त्यावरून त्यांच्या मनात तुझ्याबद्दल किती आदर वसत आहे ते पहा. रामा! त्यांच्या भावनांनुसार तू त्यांच्यावर अनुग्रह करावास हेच योग्य आहे.’’ वसिष्ठांचे भाषण ऐकून रामाने त्या लोकांना उठविले, त्यांचा गौरव केला आणि प्रेमाने म्हटले, ‘‘मी तुमच्यासाठी काय करू?’’ त्यावर त्या सर्व प्रजाजनांनी हात जोडले आणि भक्तिपूर्वक रघुश्रेष्ठाला म्हटले, ‘‘रामा! जेथे तू जाण्याची इच्छा करीत असशील तेथे तुझ्यामागून आम्ही सर्व येणार. रामा! तुझ्यामागून येण्याचा आमचा मनापासून दृढसंकल्प झाला आहे व हाच आम्हाला मोठा धर्म वाटत आहे. मुले, बायका ह्या सर्वांना घेऊन आम्ही आज तुझ्यामागून येणार हे नक्की आहे. रघुनंदना! मग ते तुझे जाणे स्वर्गलोकी असो किंवा तपोवनात असो किंवा दुसऱ्या एखाद्या नगराला असो.’’ त्यांचा दृढनिश्चय, त्याचप्रमाणे कालाचे भाषण ह्यांचा विचार करून त्या भक्तिभावाने ओतप्रोत झालेल्या पौरजनांना ‘ठीक आहे’ असे राम म्हणाला आणि त्याच दिवशी तो निश्चय रामाने अमलात आणला.
रामचंद्राने लागलीच कुश आणि लव ह्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवले. त्याने प्रत्येकाबरोबर आठ हजार रथ, एक हजार हत्ती आणि साठ हजार घोडे इतके सैन्य दिले. त्याशिवाय पुष्कळ रत्ने, भरपूर धन आणि आनंदी व सामर्थ्यवान असे अनेक सेवकही बरोबर दिले. त्या कुशलवांनी रामाला वंदन केले आणि मोठ्या कष्टाने तेथून त्यांनी प्रयाण केले. नंतर श्रीरामाने शत्रुघ्नाला आणण्यासाठी दूत पाठविले. त्याप्रमाणे त्या दूतांनी सत्वर जाऊन शत्रुघ्नाला कालमुनिचे आगमन, अत्रिपुत्र दुर्वासाची कृती, लक्ष्मणाचे निर्वाण, रामाची प्रतिज्ञा, पुत्रांचे कुशलवांचे राज्याभिषेक आणि रामाचे सर्व उद्देश कळविले. ती कुलनाशाची कथा शत्रुघ्नाने दूताच्या तोंडून ऐकल्यावर त्याला फार वाईट वाटले. तरी त्या महाबलवान शत्रुघ्नाने धैर्य धरून आपल्या पुत्रांना जवळ बोलाविले आणि मथुरेत सुबाहुला राज्याभिषेक केला. नंतर त्या शत्रूनाशनाने, शत्रुघ्नाने विदिशानगरीत युपकेतूला अभिषेक केला.
नंतर रामाला भेटण्याच्या इच्छेने तो स्वतः त्वरित अयोध्येला गेला. तेजाने अग्नीसारख्या शोभणाऱ्या महात्मा रामाची त्याने भेट घेतली. रामाने दोन रेशमी वस्त्रे परिधान केली होती. त्याच्या सभोवताली अनेक चिरंजीवी ऋषी बसले होते. त्या रघुश्रेष्ठ लक्ष्मीपती रामाला महामति शत्रुघ्नाने प्रणाम केला व हात जोडून धर्मयुक्त भाषण केले. तो म्हणाला, ‘‘कमलनयन रामा! तिकडे राज्यांवर पुत्रांची स्थापना करून तुझ्याबरोबर येण्याचा दृढनिश्चय करून मी आलो आहे हे समजून घे. वीरा! माझा, विशेषतः तुझ्या भक्ताचा त्याग करणे तुला योग्य नाही.’’ शत्रुघ्नाची दृढभक्ती लक्षात घेऊन रघुनंदन राम त्याला म्हणाला, ‘‘मध्याह्नीच्या समयी तू सिद्ध होऊन रहा.’’
नंतर ऋषि आणि देव ह्यांचे अंश असे हजारो ऋक्ष, वानर आणि गोपुच्छ तेथे आले. राम जाणार हे वर्तमान ऐकल्यावर ते सर्व जण रघुश्रेष्ठ रामाला म्हणाले, ‘‘प्रभो! तुझ्यामागून येण्याचा आम्ही दृढनिश्चय केला आहे.’’ इतक्यात राक्षसराज बिभीषणासह महाबलवान सुग्रीव सुद्धा रामाकडे आला आणि त्याने गौरवपूर्वक त्या भक्तवत्सल रामाला वंदन केले. तो म्हणाला, ‘‘महाबलवान अंगदाला राज्याभिषेक करून मी आलो आहे. रामा! तुझ्या मागोमाग येण्याचा माझा दृढनिश्चय आहे, हे जाणून घे.’’ त्यांची निश्चयपूर्वक भाषणे ऐकून रामाने बिभीषणाला आदरपूर्वक मृदु शब्दांत सांगितले, ‘‘बिभीषणा! जोपर्यंत पृथ्वी ह्या भूतमात्राला आपल्या पाठीवर धारण करील तोपर्यंत तू राक्षसांचे राज्य चालवावे, असे माझे तुला शपथपूर्वक सांगणे आहे. आता मी केलेल्या ह्या व्यवस्थेसंबंधी तू काहीही प्रत्युत्तर देता कामा नये.’’ असे बिभीषणाला सांगितल्यावर राम हनुमंताला म्हणाला, ‘‘मारुते, तू चिरंजीव होऊन रहा. माझी आज्ञा व्यर्थ करू नको.’’ नंतर राम जांबवंताला म्हणाला, ‘‘तूही भूतलावर रहा. पुढे द्वापार युगामध्ये काही कारणास्तव तुझे माझ्याशी युद्ध होणार आहे.’’
नंतर त्या सर्व ऋक्ष, राक्षस आणि वानरांना दयावंत होऊन श्रीराम म्हणाला, ‘‘माझ्याबरोबर चला.’’ नंतर पहाटेच्या वेळेस त्या विशालवक्ष आणि श्वेतकमलनयन रामाने आपले उपाध्याय असलेले जे वसिष्ठ ऋषी, त्यांना म्हटले, ‘‘गुरो! माझी अग्निहोत्रे घेऊन पुढे चला.’’ वसिष्ठमुनीनेही महाप्रस्थानकाळाला योग्य असे सर्व महत्त्वाचे कर्म यथाशास्त्र केले. रामाने रेशमी वस्त्र परिधान केले, हातात पवित्र दर्भ धारण केले आणि महाप्रयाणाविषयी निश्चित बुद्धि करून तो नगरातून बाहेर पडला. त्याची अंगकांति कोट्यावधि चंद्रांसारखी दिसत होती. शुभ्र मेघमंडळातून चंद्र बाहेर पडावा तसा राम नगरातून बाहेर पडला. रामाच्या डाव्या बाजूला हातात पांढरे कमळ घेऊन लक्ष्मीरूपात सीता तेथे आली. तिचे डोळे कमळासारखे विशाल होते. त्याच्या दुसऱ्या बाजूला हातात तांबडे कमळ धारण करून तेजस्वी श्यामवर्ण पृथ्वी चालत होती. शास्त्रे, शस्त्रे, धनुष्येबाण ही सर्व देहधारी होऊन रामापुढे चालत होती. सर्व वेद शरीरे धारण करून आणि सर्व दिव्य मुनीही रामाबरोबर निघाले. श्रुतींची, वेदांची साध्वी माता प्रणवाला आणि व्याहृतींना सोबत घेऊन रामाबरोबर जाण्यास निघाली.
राम जात असता सर्व प्रजाजन पुत्र, स्त्रिया, बंधुवर्ग ह्या सर्वांना बरोबर घेऊन त्याच्या मागून निघाले. तसेच सांप्रत मोक्षाचे द्वार उघडले असून राम तिकडेच चालला आहे असे त्यांना वाटत होते. भरत आपल्या अंतःपुरवासी स्त्रिया, सेवक, भार्या आणि शत्रुघ्न यांसह निघाला. श्रीराम लक्ष्मीसह चालला आहे असे पाहून लहानापासून थोरांपर्यंत समस्त पौरजन, तसेच सर्व अमात्य, मंत्री, मोठेमोठे ब्राह्मण रामाच्या मागून निघाले. क्षत्रियप्रभृति, जाति-क्षत्रिय, वैश्य, शूद्र व दुसऱ्याही संतुष्ट मनाने रामामागून जाण्यास निघाल्या. स्नाने करून शुद्ध झालेले सुग्रीव वगैरे मोठमोठे वानर मंगल शब्दांचा उच्चार करीत निघाले. संसारदुःखाने पीडलेला, दीन किंवा बाह्य सुखाच्या ठिकाणी आसक्त झालेला असा एकही माणूस त्यात नव्हता. सर्व लोक विरक्त होऊन पशूंचे कळप आणि सेवकांचे समुदाय, ह्यासह आनंदरूप रामाच्या मागून निघाले. तेथील अदृश्य जीव आणि स्थावरजंगमात्मक प्राणी विरक्त होऊन त्या साक्षात अनंतशक्ति, अद्वितीय, परमसमर्थ, परमात्म्याच्या मागून निघाले. अयोध्येत असा एकही प्राणी नव्हता की जो रामाच्या ठिकाणी मन ठेवून त्याच्यामागून निघाला नाही. रामचंद्र निघून गेले असता ते सर्व नगर शून्य होऊन गेले.
नगराच्या बाहेर बरेच लांब गेल्यावर विष्णुच्या नेत्रापासून उगम पावलेली सरयू नदी रामाच्या दृष्टीस पडली. तिला पाहून रामाला आनंद झाला. तेथे त्याला आपल्या पवित्र विराटस्वरूपाचे स्मरण होऊन आपल्या हृदयातच सर्व जगत् आहे, अशी भावना त्याच्या अंतःकरणात उत्पन्न झाली. इतक्यात त्या ठिकाणी श्रेष्ठ पितामह ब्रह्मदेव, सर्व देव, ऋषि आणि सिद्ध प्राप्त झाले. आकाश एवढे अपरंपार, तरी तेही देव बसले आहेत अशा कोट्यावधि विमानांनी गच्च भरून गेले होते. विमानांच्या सूर्यासारख्या तेजामुळे आकाश प्रकाशमय होऊन गेले होते. मोठमोठ्या स्वयंप्रकाशी व अत्यंत पुण्यवान अशा लोकांनी आकाशात एकच गर्दी केली. सुगंधयुक्त वारे वाहू लागले. पुष्पावलींची वृष्टि होत होती. देवांच्या मृदंगांचे ध्वनि सुरू होते. विद्याधर-किन्नर ह्यांची गायने सुरू झाली. सर्वशक्तिमान रामाने एकदा पायांनी सरयूच्या उदकाला स्पर्श केला आणि नंतर त्या उदकावरून तो चालू लागला.
ब्रह्मदेवाने हात जोडले आणि रामाला म्हटले, ‘‘हे परमात्मन्! तू परमेश्वर आहेस. तू सदा आनंदमय असा पूर्ण, सर्वत्र व्यापून राहणारा विष्णु आहेस. स्वतःचे अद्वितीय ईश्वरी तत्त्व तूच जाणतोस. तथापि हे अखिलेशा! मज दासाचे इच्छित कार्य तू पूर्णत्वाला नेलेस. हे ज्ञानरूपा! तू भक्तवत्सल आहेस. तू बंधुंसह आपल्या आद्य व अद्वितीय विष्णुस्वरूपात प्रवेश कर व देवांचे रक्षण कर किंवा दुसऱ्या एखाद्या देहाचा अंगीकार करावा अशी तुझी इच्छा असल्यास त्या देहात प्रवेश करून आमचे पालन कर. तूच देवाधिपति विष्णु आहेस. माझ्यावाचून दुसऱ्या कोणालाही तुझ्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान नाही. देवेशा! तुला सहस्त्र वेळा नमस्कार करतो. प्रसन्न हो.’’
ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून महाप्रकाशमान रामचंद्राने सर्व देव पहात असता, चतुर्भुज रूप धारण केले. त्याच्या हातात चक्र, शंख इत्यादी आयुधे होती. त्याच्या तेजाने सर्व देवांचे डोळे दिपून गेले. लक्ष्मण अत्यद्भुत सर्पदेह धारण करून विष्णुचा शय्यारूपी शेष झाला. कैकेयीपुत्र भरत आणि लवणांतक शत्रुघ्न हे दोघेही विष्णुची चक्र आणि शंख आयुधे झाले. सीता ही पूर्वीच लक्ष्मी झाली होती. अशाप्रकारे रामाचे पुराणपुरूष असे विष्णुरूप प्रकट झाले. कनिष्ठ बंधुंसह आपले पूर्वरूप, विष्णुरूप धारण करून राम तेजोमय दिव्यदेही असा शोभू लागला. ह्यावेळी इंद्रादिक देव, सिद्ध, मुनि, यक्ष, ब्रह्मदेवादिकांसह विष्णुकडे आले आणि त्यांनी त्या ईश्वराची सर्वत्र स्तोत्रे गाऊन स्तुति केली व पूजा केली. त्यांची चित्ते आनंदपूर्ण होऊन त्यांचे मनोरथही सफल झाले.
मग त्या महोदार विष्णुने ब्रह्मदेवाला म्हटले, ‘‘हे माझे भक्त माझ्यावर अतिशय प्रेम करणारे आहेत. मी स्वर्गाला येण्यासाठी निघालो असता हे सर्व माझ्या मागून आले आहेत. हे जरी क्षुद्र योनीत जन्माला आले आहेत तरी ते आपल्या कृतीने पुण्यवंत झाले आहेत. त्यांना वैकुंठासमान लोक प्राप्त व्हावा, हे योग्य आहे. तरी माझ्या आज्ञेने त्यांना वैकुंठलोकाला घेऊन जा.’’ विष्णुचे हे भाषण ऐकून ब्रह्मदेव म्हणाला, ‘‘नाना प्रकारचे सुखोपभोग प्राप्त करून देणारे असे सांतानिक नावाचे दिव्य लोक आहेत, ते लोक माझ्या ब्रह्मलोकापेक्षाही श्रेष्ठ आहेत. तुझ्या ठिकाणी निष्ठा ठेवून ज्यांनी मोठे पुण्य मिळविले आहे अशा तुझ्या भक्तांना त्या लोकांची प्राप्ती होईल. त्याचप्रमाणे हे रामा! जे कोणी मर्त्य तुझे पवित्र नाम अंतःकाळी उच्चारतील त्यांनाही हे लोक प्राप्त होतील. अज्ञानाने का होईना जे कोणी तुला भजतील त्यांनाही योगांनीच केवळ साध्य असे हे लोक साध्य होतील.’’ हे ऐकून अत्यंत आनंदित झालेल्या वानरांनी आणि राक्षसादिकांनी सरयूच्या जलाला स्पर्श करताच त्या ऋक्ष आणि मोठमोठ्या वानरांनी आपले देह टाकले आणि पूर्वी ज्या देवतांचे ते अंश होते त्या देवतांची रूपे त्यांनी धारण केली. वानरश्रेष्ठ सुग्रीव सूर्याच्या वीर्यामुळे झाला असल्यामुळे तो सूर्यरूपात मिळाला. उर्वरित लोकांनी त्या सरयूच्या जलात प्रवेश केला आणि स्नान केले तोच त्यांचे मनुष्यदेह नाहीसे होऊन त्यांना दिव्य देह प्राप्त झाले. दिव्याभरणांनी मंडित होऊन ते विमानात बसले आणि त्या सांतानिक लोकी प्राप्त झाले. श्रीरामाचे दर्शन झालेले, तिर्यक् योनीत जन्माला आलेले जीव देखील सरयू नदीत स्नान करताच देवलोकी गेले. रामदर्शनाच्या इच्छेने जे लोक आले होते त्यांना रामदर्शन होताच विरक्ति उत्पन्न झाली. नंतर त्यांनी त्या लोकगुरु परमेश रामाचे स्मरण करून सरयूला स्पर्श करताच त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती झाली.
अशा रितीने श्रीशंकरांनी श्रीरामाच्या उत्तरकथेचा एवढा भाग पार्वतीला सांगितला. जो मनुष्य ह्या ग्रंथाचा एक पाद, चौथा भाग पठण करील तो सहस्त्रजन्मीच्या पातकांपासून मुक्त होईल. मनुष्य प्रतिदिनी कितीही मोठी पापे करणारा असो, तो जर भक्तिपूर्वक एक श्लोक पठण करील तर त्याच्या त्या सर्व पापराशी नष्ट होऊन इतर साधनांनी अप्राप्य अशा रामलोकी तो जाईल.
पूर्वी श्रीरामाने प्रेरणा केल्यामुळे श्रीशंकरांनी रघुनायकाचे भविष्यकाळच्या गोष्टींनी भरलेले हे आख्यान रचले. ह्याच्या श्रवणाने श्रीरामाला मोठा संतोष होत असतो. रामायण नावाचे हे अत्यंत पुण्यकारक काव्य शंकरांनी पार्वतीला सांगितले. त्याचे जो पठण करील किंवा श्रवण करील तो शेकडो जन्मीच्या पापांपासून मुक्त होईल. जो कोणी अध्यात्म रामायणाचे भक्तिभावाने पठण करील किंवा लेखन करील त्यावर राम प्रसन्न होऊन त्याच्याजवळ सीतेसह नित्य राहील आणि त्याची संपत्ती वाढवील. हे रामायण नावाचे आदिकाव्य सकल जनांचे मन रमविणारे आहे. ब्रह्मदेवादि मोठमोठ्या देवांनी देखील ह्याची प्रशंसा केली आहे. जो श्रद्धापूर्वक ह्याचे नित्य पठण किंवा श्रवण करील, तो विशुद्धदेह होऊन विष्णुलोकाला प्राप्त होईल.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे नवमः सर्गः।
॥श्रीराम समर्थ॥