श्रीराम म्हणाला, ‘‘मुने! वाली आणि सुग्रीव ह्यांचा जन्मवृत्तांत यथार्थ ऐकण्याची माझी इच्छा आहे. सूर्य आणि इंद्र हे वानरांचा आकार धारण करून जन्माला आले, हे आम्ही ऐकले आहे. तो वृत्तांत सांगावा.’’ अगस्त्य म्हणाले, ‘‘सुवर्णमय मेरु पर्वताचे रत्नांनी दैदीप्यमान असे एक मध्यशिखर आहे. त्यावर शंभर योजने विस्तीर्ण अशी ब्रह्मदेवाची सभा आहे. त्या सभेमध्ये एके वेळी साक्षात् ब्रह्मदेव ध्याननिष्ठ होऊन बसला होता. तेव्हा त्याच्या नेत्रातून बरेचसे दिव्य आनंदाश्रू पडले. ते हातात घेऊन त्याने काही विचार केला व मग ते उदक त्याने खाली टाकले. भूमीवर ते उदक पडले त्यापासून एक मोठा कपि उत्पन्न झाला. त्याला ब्रह्मदेव म्हणाला, ‘‘काही काळ माझ्या समीप रहा. हे स्थळ सर्व प्रकारच्या शोभेने भरलेले आहे. असे केल्याने तुझे कल्याण होईल.’’ असे ब्रह्मदेवाने सांगितले असता तो वानरश्रेष्ठ तेथे राहिला. तेथे बराच काळ लोटल्यावर तो परम बुद्धिमान ऋक्ष वानरश्रेष्ठ कोणे एके वेळी फलमुळांकरिता यत्नपूर्वक पर्वतावर फिरत असता एक सुंदर पाण्याची विहीर त्याला दिसली. ती रत्नशिलांनी बांधलेली होती. तेथे तो पाणी पिण्यासाठी आला, तो पाण्यात त्याला त्याचे प्रतिबिंब त्याला दिसले. तो दुसरा कोणी वानर आहे असे समजून त्याने पाण्यात उडी घेतली. त्या ठिकाणी कपि नाही असे समजताच पुन्हा उडी मारून तो बाहेर आला. तो आपण स्वतः सुंदर स्त्रीरुपात परिवर्तीत झाल्याचे त्याला दिसून आले. ते पाहून त्याला आश्चर्य वाटले. पुढे सुरराज इंद्र त्या देवश्रेष्ठ ब्रह्मदेवाचे मध्याह्नसमयी पूजन करून जात असता ती मनोरम स्त्री त्याला दिसली. तिला पाहून इंद्र कामशरपीडित झाला. स्त्रीसमागम न होता सुद्धा त्याचे उत्तम वीर्य तिच्या केशप्रदेशाला लागून खाली जमिनीवर पडले. त्यापासून तेथे वाली उत्पन्न झाला. त्याचा पराक्रम इंद्रासारखाच होता. त्या सुरेशाने त्या मुलाला एक सुवर्णमाला दिली आणि तो स्वर्गाला गेला. तेवढ्यात सूर्यही तेथे आला. त्या स्त्रीला पाहून तो ही कामवश झाला. त्याने आपले महाबीज तिच्या मानेवर टाकले. त्यापासून तिच्या पोटी एक धिप्पाड वानर जन्माला आला. त्याच्या साहाय्यासाठी मारुतीला देऊन सूर्य तेथून निघून गेला. त्या दोघा पुत्रांना घेऊन ती स्त्री कोठे तरी एके ठिकाणी जाऊन निद्रिस्त झाली. तो प्रभातसमयी आपला मूळचा वानरदेह पूर्ववत झाल्याचे तिला आढळून आले. पुढे तो महाबुद्धिमान ऋक्षराज कपि फळेमुळे आणि आपले दोन पुत्र ह्यांसह ब्रह्मदेवाकडे आला व त्याला नमस्कार करून त्याच्यापुढे उभा राहिला. तेव्हा ब्रह्मदेवाने त्या कपिश्रेष्ठाचे अनेक प्रकारे आश्वासन केले आणि तेथे असलेल्या एका देवसदृश देवदूताला बोलावून त्याला तो ब्रह्मदेव म्हणाला, ‘‘दूता! माझ्या आज्ञेने ह्या वानरश्रेष्ठाला घेऊन विश्वकर्म्याने निर्माण केलेली ही दिव्य नगरी किष्किन्धा, तेथे जा. ती नगरी सर्व ऐश्वर्यसंपन्न असून देवांनासुद्धा ती दुष्प्राप्य आहे. ह्या वीर राजाला तेथील सिंहासनावर बसवून राज्याभिषेक करवून घे. सप्तद्विपांमध्ये जे जे दुर्जय वानर आहेत ते ते सर्व ह्या ऋक्षराजाला वश होऊन त्याचे सेवक होतील. जेव्हा साक्षात सनातन नारायण राम होऊन पृथ्वीला भारभूत झालेल्या राक्षसांच्या नाशासाठी भूतलावर येईल तेव्हा त्याच्या साहाय्यासाठी सर्व वानरांनी जावे.’’ असे ब्रह्मदेवाने सांगितल्यावर तो महामति देवदूत निघाला आणि ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे त्याने त्या वानरश्रेष्ठाची व्यवस्था लावली आणि पुन्हा येऊन झालेले सर्व वर्तमान त्याने ब्रह्मदेवाला सांगितले. तेव्हापासून ती किष्किन्धा नगरी वानरांची राजधानी झाली. रामा! तूच सर्वेश्वर आहेस. आता ब्रह्मदेवाने तुझी प्रार्थना केली आहे म्हणून तू लीलेने मनुष्यदेह धारण करून पृथ्वीचा सर्व भार हरण केला आहेस. जो सर्व भूतांच्या हृदयात वास करतो, जो नित्यमुक्त आहे. जो ज्ञानस्वरूप आहे आणि जो अखंड आनंदरूप आहे त्या तुला हा एवढासा पराक्रम काय होय? अर्थात काहीच नाही. तरी सुद्धा सर्व लोकांची पापे नष्ट व्हावी आणि त्यांना सुख मिळावे एवढ्यासाठीच तू लीलेने धारण केलेल्या मनुष्यदेहाचे साधुपुरूष वर्णन करतात. वाली, सुग्रीव यांनी तुझाच आश्रय घेतल्यामुळे जो कोणी ह्यांच्या महाजन्मकथेचे कीर्तन करील, तो सर्व पातकापासून मुक्त होईल.
रामा! आता आणखी एक तुझीच कथा सांगतो की जेणेकरून दुष्ट अंतःकरणाच्या रावणाने सीतेचे हरण का केले ते समजून येईल. रामा! पूर्वी कृतयुगामध्ये ब्रह्मदेवाचा मानसपुत्र परमसमर्थ सनत्कुमार एकांतात बसला असता रावणाने नम्रतापूर्वक त्याला वंदन केले आणि म्हटले, ‘‘ज्याचा आश्रय करून देव युद्धात शत्रूला जिंकतात, असा बलवान श्रेष्ठ देव ह्या लोकात कोण आहे? ब्राह्मण सर्वदा कोणाची आराधना करतात? योगीजन कोणाचे ध्यान करतात? भगवन्! प्रश्नवेत्त्यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात म्हणून ह्या प्रश्नाचे उत्तर आपण मला सांगा.’’ त्या योगदृष्टि मुनी सनत्कुमाराने त्याच्या मनातील आशय संपूर्ण जाणून दशाननाला म्हटले, ‘‘पुत्रा! सांगतो, ऐक. जो जगाचे नित्य पोषण करतो, ज्याला जन्मादिक संबंध येत नाहीत, जो निर्विकार आहे त्याला ‘हरि’, ‘नारायण’ ही नावे आहेत. त्याची देवदैत्य नेहमी स्तुती करतात. त्याने हे सर्व स्थावरजंगमात्मक जगत् निर्माण केले, सृष्टीकर्त्यांचा पिता ब्रह्मदेव याच्याच नाभिकमलापासून झाला आहे. त्याचा आश्रय करून देव युद्धात शत्रूला जिंकतात आणि त्याचेच योगीजन ध्यानयोगाने चिंतन करीत असतात.’’ त्या महर्षिचे भाषण ऐकून दशानन रावण म्हणाला, ‘‘हे मुनिश्रेष्ठा! दैत्य, दानव आणि राक्षस ह्यांचा विष्णुच्या हातून वध झाला असता परलोकी ते कोणत्या गतीला जातात?’’ तेव्हा त्या मुनिश्रेष्ठाने राक्षसाधिपती रावणाला सांगितले, ‘‘इतर देवतांकडून नित्य मारले गेलेले ते अत्युत्तम स्वर्गाला जातात. परंतु भोगक्षयकाली तेथून भ्रष्ट होऊन पुन्हा पृथ्वीवर जन्माला येतात व पूर्वार्जित पुण्यपापांच्या योगाने मरण पावतात व पुन्हा जन्माला येतात. परंतु विष्णुच्या हातून जे मारले जातात ते विष्णुच्या पदाला पोचतात.’’ मुनिंच्या तोंडून हे सर्व ऐकून रावणाच्या मनाला हर्ष वाटला आणि तो ‘मी विष्णुबरोबर युद्ध करणार’ असे मनाशी ठरवून त्यासंबंधी उपाय शोधू लागला. त्या महामुनिने रावणाच्या मनात काय चालले आहे, हे ओळखून त्याला सांगितले, ‘‘वत्सा, तुझ्या इच्छेनुसार सर्व घडून येईल यात संशय नाही. दशानना! काही काळ वाट पहा. तू सुखी होशील.’’
‘‘महाबाहो रामा! असे सांगून तो सनत्कुमार मुनी त्याला पुन्हा म्हणाला, ‘‘तो वस्तुतः रूपविहीन आहे, तरीही तो मायेच्या योगाने रूप धारण करीत असतो. त्याचे स्वरूप मी तुला सांगतो. तो सर्व स्थावर पदार्थांमध्ये, नद्यांमध्ये, नदांमध्ये व्यापून राहिला आहे. तोच ओंकार, तोच सत्य, तोच गायत्री आणि तोच पृथ्वी आहे. समस्त जगताचा आधार अशा शेष सर्पाच्या रूपाने तोच राहिला आहे. सर्व देव, समुद्र, काल, सूर्य, चंद्र, सूर्योदय, दिवसरात्री, यम, अनिल, अग्नी, इंद्र, मृत्यु, पर्जन्य, वसु, ब्रह्मा, रुद्रादिक आणि इतर देव तसेच दैत्य हे सर्व तोच एकटा आहे. तोच प्रकाशतो, पेटतो, रक्षण करतो, खातो, तो निर्विकार सनातन विष्णु हे सर्व व्यवहार क्रीडेप्रमाणे करतो. त्याने हे सर्व स्थावरजंगमात्मक विश्व व्यापले आहे. नीलकमलदलाप्रमाणे त्याची अंगकांति श्यामवर्णाची आहे. तो विद्युद्वर्णासमान वस्त्र धारण करत असतो. त्याच्या डाव्या मांडीवर शुद्ध सुवर्णासारखी तेजस्वी, नित्य निश्चल अशी लक्ष्मी बसली आहे. तिला आलिंगन देऊन तो तिच्याकडे पहात असतो. हा देव, दानव, सर्प इत्यादी कोणाच्याही दृष्टीस पडणे शक्य नाही. ज्याच्यावर तो कृपा करतो त्यालाच त्याचे केवळ दर्शन होते. त्याचे दर्शन यज्ञ किंवा तप याच्या साहाय्याने होत नाही. तसेच दान किंवा अध्ययनादिकांनी होत नाही. दुसऱ्या कोणत्याही उपायांनी होणे शक्य नाही. परंतु जे त्याचे भक्त आहेत, ज्यांनी आपले प्राण आणि चित्तवृत्ती त्याच्या ठिकाणी स्थिर करून आपली पापे नाहीशी केली आहेत, त्यांना वेदान्तरूप निर्मल दृष्टी प्राप्त होऊन भगवंतांचे दर्शन शक्य होत असते किंवा ह्या परमेश्वराचे दर्शन व्हावे अशी तुझी इच्छा असल्यास ऐक. त्रेतायुगामध्ये तो देवेश राजशरीर धारण करून अवतार घेणार आहे. देव आणि मनुष्यांच्या कल्याणासाठी श्रीहरि ईक्ष्वाकुवंशामध्ये महाबलाढ्य व अत्यंत पराक्रमी असा दाशरथी राम होणार आहे. पित्याच्या आज्ञेने तो धर्मात्मा, बंधु आणि जगन्माता व ईश्वरमाया अशी जी सीता भार्या तिच्यासह दंडकारण्यात फिरेल. रावणा! मी तुला सर्व सांगितले आहे. तर मग भक्तिभावाने सीतेसह रामाची भक्ती कर.’’
हे ऐकून त्या राक्षसराजाने काही चिंतन केले. नंतर ‘तुझ्याबरोबर विरोधच करावयाचा’ असा निश्चय करून त्या पराक्रमी रावणाला परमानंद झाला. तुझ्याशी युद्ध करण्याची इच्छा मनात ठेवून तो सर्वत्र फिरला. महाराजा रामा! तुझ्या हातून वध व्हावा हाच उद्देश म्हणून त्या अति बुद्धिमान रावणाने जानकीदेवीचे हरण केले.’’
इति श्रीमद्ध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे तृतीयः सर्गः।