श्री महादेव म्हणाले,
‘‘एकदा रावण लोकात फिरत असता, ब्रह्मलोकातून नारदमुनी येत आहे असे त्याला दिसले. त्याने मुनीला नमस्कार करून म्हटले, ‘‘भगवन्! त्रिभुवनातील सर्व काही आपल्याला माहीत आहे. तरी युद्ध करण्यास्तव असे अतिबलाढ्य वीर कोठे आहेत ते मला सांगा. बलिष्ठांशी युद्ध करावे अशी माझी इच्छा आहे.’’ मुनीने बराच वेळ विचार केला आणि म्हणाले, ‘‘महामते रावणा! श्वेतद्विपात राहणारे लोक अत्यंत बलवान असून शरीरानेही धिप्पाड आहेत. तू तेथे जा. पूर्वी विष्णुपूजनात नेहमी रममाण असणारे किंवा विष्णुच्या हाताने वध झालेले असेच तेथे जन्मले असून ते सुरासुरांना देखील अजिंक्य आहेत.’’ ते ऐकून तो रावण मंत्र्यांसह पुष्पक विमानात बसला व लगेचच त्या विष्णुभक्तांशी युद्ध करण्याची इच्छा धरून श्वेतद्विपाजवळ आला. त्या ठिकाणच्या प्रभेने पुष्पक विमानाचे तेज नष्ट होऊन ते पुढे जाईनासे झाले. त्यामुळे मंत्र्यांना आणि विमानाला तेथेच सोडून देऊन रावण पुढे निघाला. त्या द्विपात त्याने प्रवेश केला तोच एका स्त्रीने त्याला हाती धरले आणि विचारले, ‘‘तू कोठून आलास? तू कोण आहेस? तुला कोणी पाठविले आहे? बोल.’’ असे अनेक स्त्रियांनी त्याला विचारले आणि पुन्हा पुन्हा हसून त्याची चेष्टा केली. त्या स्त्रियांच्या हातून तो दशानन रावण मोठ्या कष्टाने सुटला. त्याला पराकाष्ठेचे आश्चर्य वाटले. मग त्या दुष्टाने मनात ठरविले, ‘विष्णुच्या हाती मृत्यु प्राप्त करून मी वैकुंठाला जावे’ आणि तसा त्याने दृढ निश्चयही केला. जेणेकरून माझ्यावर विष्णु कोपेल असे काही तरी काम केले पाहिजे, असा निश्चय त्या असुराने केला आणि जानकीला अरण्यातून हरण करून नेले. तू परमात्मा आहेस हे जाणूनच त्याने भूमिसुतेचे, जानकीचे हरण केले. तुझ्या हातून आपला वध व्हावा हीच फक्त त्याची इच्छा होती. त्याने जानकीचे मातृवत् पालन केले. रामा! तू परमेश्वर आहेस. तू सर्व जाणतोस. तू विज्ञानदृष्टी असल्यामुळे भूत, भविष्य, वर्तमान ह्या तिन्ही काळी होणाऱ्या गोष्टींचा तू साक्षी आहेस. तू सर्व विकल्पांपासून दूर आहेस. भक्तांच्या अनुरंजनासाठी मनुष्यरूप धारण करून तू अनेक कर्मे करतोस. सकल लोक ज्याची पूजा करतात तो तू मुनीचे, माझे भाषण ऐकत आहेस. त्यामुळे तू विशेषच शोभून दिसत आहेस.’’
अशी अगस्त्यमुनीने रामाची स्तुती केल्यानंतर रामाने त्याची पूजा केली. नंतर आनंदित अंतःकरणाने मुनींसह वर्तमान तो आपल्या आश्रमाला गेला. इकडे तो रमानाथ राम, सीता, बंधु आणि मंत्रीगण यांसह एखाद्या संसारी पुरुषाप्रमाणे आपल्या गृहामध्ये आनंद करीत राहिला. विषयांवर अनासक्त असूनही तो प्रियेसह विषयांचा भोग घेत असे. हनुमंत वगैरे श्रेष्ठ वानर त्याच्या सदैव सभोवती असत. एकदा पुष्पक विमान प्रभु रामचंद्राकडे येऊन त्याला म्हणाले, ‘‘देवा! कुबेराने मी तेथे गेल्यावर तेथून परत मला तुझ्याकडे पाठविले आहे. त्याने सांगितले की, ‘तुला प्रथमतः माझ्याकडून रावणाने जिंकले नंतर रामाने त्याच्याकडून जिंकून तुला घेतले. म्हणून राम पृथ्वीवर असेल तोपर्यंत त्यालाच तू वहा. त्याच्या सेवेत रहा. जेव्हा रघुश्रेष्ठ वैकुंठाला जाईल तेव्हा तू माझ्याकडे परत ये.’’ ते ऐकून सूर्यासारख्या त्या पुष्पकाला राम म्हणाला, ‘‘तुझे कल्याण असो. जेव्हा मी तुझे स्मरण करीन तेव्हा तू माझ्याकडे यावेस. तू सर्वत्र गुप्त होऊन राहावे. आता जा. अशी माझी तुला आज्ञा आहे.’’
नंतर तो राम आपले बंधु आणि मंत्री ह्यांच्या साहाय्याने सर्व पौरकार्ये यथान्याय करू लागला. लोकनाथ रमापति राम पृथ्वीतलावर राज्य करीत असता पृथ्वी सर्व प्रकारच्या धान्यांनी संपन्न होती. वृक्ष फळांनी लगडलेले असत. सर्व लोक नित्य स्वधर्मतत्पर असत. स्त्रिया पतिसेवेत दक्ष असत. श्रीराम राजा असताना कोणीही पुत्रमरण पाहिले नाही. त्या श्रेष्ठ विमानात आरुढ होऊन प्रभु राम सीता आणि बंधु यांना बरोबर घेऊन पृथ्वीवर संचार करीत असे. त्या श्रीरामाने पृथ्वीवर अनेक अमानुष कार्ये केली. एकदा एका ब्राह्मणाचा मुलगा अकाली मृत झाल्याचे व ब्राह्मण, त्याचा पिता शोक करीत असल्याचे त्याला दिसले. त्यावरून त्या महाबुद्धिमान रामाने कोणी शूद्र वनात तप करीत असल्याचे जाणून त्या शूद्राचा वध केला आणि त्या ब्राह्मण बालकाला जिवंत केले व त्या शूद्रालाही उत्तमोत्तम स्वर्गप्राप्ति करून दिली. लोकांना उपदेश करण्यासाठी, सन्मार्ग दाखविण्यासाठी त्या परमात्मा रघुत्तमाने सर्वत्र कोट्यावधि शिवलिंगांची स्थापना केली. सर्व प्रकारच्या दिव्य भोगांनी तो सीतेला रमवीत असे. त्या परम धर्मज्ञ रामाने धर्माला अनुसरून राज्य केले आणि सर्व लोकांची पापे दूर होतील अशी पवित्र कथा, कीर्ती चिरस्थायी करून ठेवली. ज्याच्या चरणकमलाला त्रैलोक्य वंदन करते, अशा त्या मायामानुषदेहधारी रामचंद्राने दहा हजार वर्षेपर्यंत यथान्याय राज्य केले. राजर्षि रामाने एकपत्नी व्रत धारण करून त्याचे आचरण अत्यंत शुद्ध होते. गृहस्थाश्रमातील सर्व धर्म तो स्वतः आचरण करीत असून लोकांनाही उत्तम शिक्षण देत असे. सीता आपल्या ठिकाणच्या प्रेमाने, सेवेने, नम्रतेने, इंद्रियनिग्रहाने, लज्जेने आणि भीतीने पतीचे मन हरण करीत असे. ती पतीचा अभिप्राय चटकन ओळखत असे. एकदा सर्व उपभोगसाहित्यांनी संपन्न अशा क्रीडोद्यानातील दिव्य मंदिरात एकांतस्थानी सुखासनी राम बसला होता. त्याची अंगकांति नीलवर्ण माणिक्याप्रमाणे होती. अंगावर दिव्य अलंकार शोभत होते. त्याचे मुख प्रसन्न असून मूर्ती शांत दिसत होती. विद्युत्पुंजच की काय असे तेजःपुंज वस्त्र, पितांबर त्याने परिधान केले होते. सीतेने सर्व अलंकार शरीरावर धारण केले होते. ती रामाचे चरणयुगल हातांनी चुरत असता म्हणाली, ‘‘रामा! तू देवाधिदेव आहेस. तू जगताचा नाथ आहेस, सनातन परमात्मा आहेस, ज्ञानानंदरूप आहेस. तू आदिमध्यान्तरहित आहेस. तू सर्व जगताचे कारण आहेस. इंद्रादिक देवश्रेष्ठ मला एकांती भेटून त्यांनी अनेक प्रकारे विनंती करून मला असे सांगितले आहे की, आपण दोघांनी वैकुंठाला यावे. ‘‘देवि! तू चिच्छक्ति असून तुझ्यासह राम आम्हाला आणि सनातन निवासस्थान जे वैकुंठ त्याला सोडून भूतलावर राहिला आहे. हे जगन्माते! तुझ्यामुळेच कमलनयन श्रीराम येथे राहात आहे. तू पुढे वैकुंठाला चल, की मग रघुत्तम राम वैकुंठाला येऊन आम्हाला सनाथ करील.’’ अशी त्यांनी माझी प्रार्थना केली व मी ते त्यांचे म्हणणे विज्ञापनापूर्वक आपल्याला सांगितले आहे. आता आपणाला जे योग्य वाटत असेल ते आपण करावे. प्रभो! मी आपणाला आज्ञा करते असे आपण समजू नये.’’ सीतेचे ते भाषण ऐकल्यानंतर रामाने क्षणभर विचार केला आणि म्हटले, ‘‘देवि! मला सर्व माहीत आहे. ह्याविषयी मी तुला उपायही सांगतो. देवि! तुझ्यासंबंधी काही लोकापवाद उत्पन्न झाला आहे. त्या लोकापवादाच्या भीतीने एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणे मी तुला वनात नेऊन सोडतो. तेथे वाल्मीकी मुनीच्या आश्रमात तुला दोन मुलगे होतील. सांप्रत तू गर्भवती असल्याचे दिसून येत आहे. पुढे तू पुन्हा माझ्याजवळ येशील आणि लोकांना विश्वास वाटावा म्हणून तू आदरपूर्वक शपथ घेशील. नंतर भूमीच्या उदरात प्रवेश करून वैकुंठाला लवकर जाशील. तुझ्या पाठीमागून मी ही येईन. हाच माझा पक्का निश्चय होय.’’ असे बोलून त्या ज्ञानैकरूप रामाने सीतेला पाठवून दिले.
पुढे एकदा प्रधान, गूढमंत्रज्ञ आणि सेनापती यांसह राम सभेत बसला असता अनेक मित्र त्याचे रंजन करीत होते. कोणी विनोदाच्या गोष्टी तर कोणी प्रौढ कथा सांगण्यात कुशल होते. आपल्या विनोदादि कथांनी त्या रामरूप हरिला हसवित होते. बोलता बोलता विजय नामक एका दूताला रामाने विचारले, ‘‘नगरवासी किंवा देशवासी लोक माझ्यासंबंधी बरे-वाईट काय बरे बोलत असतात? तसेच सीता, माता कौसल्या, माझे बंधु किंवा कैकेयी यांच्याविषयी ते काय म्हणतात? तुला घाबरण्याचे काही कारण नाही. तुला माझी शपथ आहे. सांग काय म्हणतात ते.’’ असे रामाने सांगितले असता, विजय म्हणाला, ‘‘देवा! ते सर्व असे म्हणतात की, आत्मज्ञानसंपन्न रामाने फार दुष्कर कर्म हाती घेऊन ते सर्व समाप्तीला नेले. परंतु दशग्रीव रावणाचा वध केल्यावर रामाने सीतेला घेऊन आणि क्रोधाकडे पाठ फिरवून काही एक संशय न घेता तिला घरात आणले. अशा सीतेच्या समागमापासून त्याच्या मनाला कसले सुख मिळणार? दुष्ट रावणाने कोणाचीही जाग नाही अशा अरण्यात तिला चोरून नेले आणि राम तिला खुशाल घरात घेतो. आता आमच्या बायकांनी काही दुष्कर्म केल्यास आम्हाला देखील ते सहन करावे लागेल. जसा राजा असेल तशीच प्रजा होते.’’ ते भाषण ऐकून रामाने आपल्या आप्तजनांकडे त्यासंबंधी चौकशी केली असता त्यांनी प्रमाणपूर्वक राजाला सांगितले की, ‘‘असेच लोकांचे म्हणणे आहे. ह्यात काही संशय नाही.’’ नंतर सचिवांना, त्या विजयाला आणि आप्तजनांना निरोप देऊन रामाने लक्ष्मणाला बोलावले आणि सांगितले, ‘‘लक्ष्मणा, सीतेच्या संबंधाने माझ्यावर मोठाच लोकापवाद आला आहे. तरी पहाटेस वाल्मीकीच्या आश्रमाजवळ सीतेला घेऊन जा आणि तेथे तिला सोडून पुन्हा सत्वर परत ये. ह्याबद्दल मला काही बोललास तर ते माझे तुझ्या हाती मरण होईल, असे समज.’’ ते ऐकून लक्ष्मण घाबरला. तो पहाटेच उठला आणि सुमंत्राच्या साहाय्याने जानकीला रथात बसवून सरळ अरण्यात गेला. वाल्मीकीच्या आश्रमाजवळ सीतेला सोडून तो तिला म्हणाला, ‘‘राघवाने लोकापवादाच्या भीतीने तुला वनात सोडले आहे. माते! यात माझा कोणताही दोष नाही. आता तू मुनींच्या आश्रमाच्या ठिकाणी जा.’’ असे बोलून लक्ष्मण ताबडतोब तेथून निघाला आणि रामाकडे आला.
सीता देखील अत्यंत दुःखाने संतप्त होऊन वेड्यासारखी रडू लागली. वाल्मीकीने शिष्यांच्या तोंडून तिचा वृत्तांत ऐकताच दिव्य दृष्टीने ती स्त्री सीता आहे असे जाणून अर्घ्यादिक उपचारांनी त्याने जानकीचे पूजन केले आणि तिला आश्वासन दिले. पुढे काय होणार हे सर्व त्याला समजले होते. म्हणून त्याने तिला मुनीपत्न्यांच्या स्वाधीन केले. मुनींच्या सांगण्यानुसार त्या स्त्रिया प्रत्येक दिवशी भक्तिपूर्वक तिची पूजा करीत असत. सीता म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याची लक्ष्मीच होय, असे जाणून त्या मोठ्या आदराने आणि नम्रतादि गुणांनी तिची सेवा करीत असत. राम म्हणजे केवळ आदिदेव होय. मुनी त्याच्या चरणांची सेवा करतात असा तो परमात्मा विज्ञानदृष्टि श्रीराम सीतावियोग प्राप्त होताच सर्व उपभोगांचा त्याग करून वैराग्यवृत्तीने मुनीव्रत धारण करून राहू लागला.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे चतुर्थः सर्गः।