श्री महादेव म्हणाले,
‘‘अशारितीने रामराज्य करीत असता काही काळ गेल्यानंतर एकदा महापराक्रमी भरताला त्याच्या युधाजित मामाकडून बोलावणे आले. म्हणून तो सैन्यासह तिकडे गेला. रामाच्या आज्ञेने तेथे जाऊन तीन कोटी गंधर्वनायकांचा त्या रघुनंदन भरताने वध केला आणि तेथे दोन नगरे वसविली. पुष्करावतीमध्ये पुष्कराला व तक्षशिलानामक नगरात तक्षाला अभिषेक करून व तेथे त्या राजपुत्रांस द्रव्य, धान्य, मित्र ह्यांची जोड मिळवून देऊन भरत परत आला आणि तत्परतेने रामसेवा करू लागला. तेव्हा रघुश्रेष्ठ रामाला अत्यंत आनंद झाला आणि तो आदरपूर्वक लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘लक्ष्मणा! तू आपल्या दोन्ही पुत्रांना घेऊन पश्चिम दिशेकडे जा आणि तेथे सर्वांना अपकार करणाऱ्या दुष्ट भिल्लांना जिंकून घे. अंगद आणि चित्रकेतू हे दोघेही मोठे बुद्धिमान तसेच पराक्रमीही आहेत. त्या दोघांच्या नावे दोन नगरे वसवून, त्यात त्यांस हत्ती, घोडे, द्रव्य आणि रत्ने ह्यांचा पुरवठा करून देऊन त्या ठिकाणी त्यांना राज्याभिषेक कर आणि पुन्हा लवकर माझ्याकडे ये.’’ रामाची आज्ञा मान्य करून, तेथे आपल्या दोन मुलांची राज्यावर स्थापना करून तो लक्ष्मण पूर्ववत रामसेवेत तत्पर राहिला.
त्यानंतर बराच काळ निघून गेल्यावर एकदा त्या सतत धर्ममार्गाने चालणाऱ्या रामरूपी हरिला भेटण्यासाठी म्हणून ऋषीरूप धारण करून काल आला आणि तो लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘हे बुद्धिमंता लक्ष्मणा! मी अतिबलनामक ऋषीचा दूत असून पुरूषोत्तम रामाला भेटण्याची माझी इच्छा आहे. त्या श्रेष्ठ महर्षीला बरेच दिवसांपासून रामाला काही विज्ञापना करावयाची आहे. तरी ही गोष्ट रामाला कळव.’’ हे त्याचे भाषण ऐकून लक्ष्मण सत्वर रामाकडे गेला आणि त्याने कोणी तपस्वी आल्याचे रामाला सांगितले. लक्ष्मणाच्या तोंडचे हे शब्द ऐकून राम त्याला म्हणाला, ‘‘हे लक्ष्मणा! सत्कारपूर्वक मुनीला सत्वर घेऊन ये.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून लक्ष्मणाने त्या तपस्व्याला आत आणले. घृताने प्रज्वलित झालेल्या अग्नीप्रमाणे त्याची अंगकांति दिसत होती. स्वतःच्या तेजाने प्रकाशमान अशा त्या मुनिने रघुश्रेष्ठ रामाजवळ जाऊन गोड शब्दांनी ‘तुझा उत्कर्ष होवो’ असा त्याला आशीर्वाद दिला. त्या मुनिची रामाने यथाविधी पूजा केली. रामाने स्वस्थ मनाने त्याला कुशल प्रश्न केले व मुनिने रामाला खुशाली विचारली. दिव्यासनी अधिष्ठित झालेल्या रामाने त्या ऋषीला म्हटले, ‘‘ज्याकरिता आपण येथे आला आहात, ते मला आता आपण सांगावे.’’ असे बोलून रामाने प्रेरणा दिली असता तो मुनी म्हणाला, ‘‘आपण दोघांनीच येथे असावे. ते भाषण दुसऱ्या कोणाला कळता कामा नये. मी जे सांगणार आहे ती गोष्ट दुसऱ्या कोणी ऐकू नये किंवा दुसऱ्या कोणाला सांगूही नये. कोणी ही गोष्ट ऐकेल किंवा बोलत असता पाहील, तर हे प्रभो! तू त्याचा वध करावा.’’ ‘ठीक आहे’ असे प्रतिज्ञापूर्वक म्हणून रामाने लक्ष्मणाला सांगितले, ‘‘लक्ष्मणा! तू द्वारावर उभा रहा. कोणीही मनुष्याने आमच्या एकांतात येऊ नये. जर कोणी येईल तर मी त्याचा वध करीन, ह्यात काही संशय नाही.’’ नंतर तो मुनि रामाला म्हणाला, ‘‘रामा! मी तुला सर्व इत्थंभूत सांगतो. सर्वसमर्थ ईश्वरा! ब्रह्मदेवाने आपल्या कार्याकरिता मला तुझ्याकडे पाठविले आहे. हे परंतपा, शत्रूमर्दना, देवा! मी प्रारंभीचा तुझा पुत्र आहे. हे वीरा! तू मायेचा समागम केला म्हणून मी जन्माला आलो. माझे नाव काल असून मी सकलांचा ‘संहार करणारा’ अशी माझी ख्याती आहे. सर्व देवर्षींना पूज्य अशा भगवान ब्रह्मदेवाने तुला सांगितले आहे की, हे महामते! स्वर्गलोकाचे रक्षण करण्यासाठी म्हणून परत येण्याची तुझी वेळ आली आहे. पूर्वी मायेच्या योगाने सर्वांचा संहार करून तू एकटाच राहिला होतास. पत्नीचा स्वीकार केल्यावर तू ज्या प्रथम पुत्राला जन्म दिलास तो पुत्र मीच होय. तसाच एक मोठ्या शरीराचा, उदकात शयन करणारा, अनंत नावाचा नाग तू निर्माण केलास. तू त्याच मायेच्या योगाने महापराक्रमी व अत्यंत बलवान असे मधूकैटभ नावाचे दोन दैत्य उत्पन्न केलेस. हे पुरुषश्रेष्ठा! पुढे त्यांना मारून त्यांच्या मेदाच्या, चरबीच्या व हाडांच्या राशीपासून तू ही पर्वतवेष्टित पृथ्वी निर्माण केलीस. ह्यापुढे तू आपल्या नाभीमध्ये दिव्य सूर्यासारखे तेजस्वी असे कमळ निर्माण करून त्यामध्ये मला उत्पन्न केलेस. तू मला प्रजाध्यक्ष करून सर्व अधिकार दिलेस. हे जगत्पते! तेव्हापासून सर्व भार अंगावर घेऊन मी तुझी प्रार्थना केली की, ‘माझ्या वीर्याचा अपहार करणारे, माझ्या प्रजांना दुःख देणारे जे कोणी असतील त्यापासून भूतांचे रक्षण कर.’ नंतर तू विष्णुने कश्यपऋषीच्या पोटी वामनावतार धारण केलास. हे पृथ्वीधारका! सर्व प्रजांना पीडा होऊ लागली असता राक्षस समुदायांचा नाश करून तू पृथ्वीवर अकरा सहस्त्र वर्षे राहाण्याचे देवांजवळ प्रतिज्ञापूर्वक ठरवून मृत्युलोकी आलास. तुझी मृत्युलोकाची आयुष्यमर्यादा संपली असून तुझे मनोरथ पूर्ण झाले आहे. मी काल, ऋषीवेष घेऊन तुझ्याकडे आलो आहे. आता आणखी राज्याचा उपभोग घेण्याची तुझी इच्छा असेल तर तसा तू हो. ‘तुझे कल्याण होवो’ असे ब्रह्मदेवाने तुला सांगितले आहे. हे जितेंद्रिया! देवलोकी जाण्याची इच्छा असेल तर तुझ्या, विष्णुच्या समागमाने देवांचे ताप नाहीसे होतील.’’
ब्रह्मदेवाचा निरोप त्या कालमुखाने ऐकून हसत हसत श्रीराम सर्वांचा अंत करणाऱ्या त्या काळाला म्हणाला, ‘‘तुझे म्हणणे मी ऐकले. मला सुद्धा तेच इष्ट वाटत आहे. तू आल्यामुळे मला परम संतोष वाटला आहे. तिन्ही लोकांच्या कार्यासाठी म्हणून माझा अवतार आहे. तुझे कल्याण असो. मी जेथून आलो आहे तेथे परत जाणार आहे. माझे मनोरथ परिपूर्ण झाले आहे, ह्यात संशय नाही. पुत्रा! ब्रह्मदेवाने सांगितले आहे त्याप्रमाणे माझी सेवा करणाऱ्या देवांच्या सर्व कार्यात मी मायेच्या योगाने साहाय्य करावे, हेच आता योग्य आहे.’’
अशाप्रकारे त्या दोघांचे भाषण चालले आहे तोच दुर्वास ऋषी काही महत्त्वाचे कार्य योजून रामाची भेट घेण्यासाठी राजद्वारी आले. दुर्वास ऋषी लक्ष्मणाजवळ येऊन त्याला म्हणाला, ‘‘माझी रामाशी सत्वर भेट करून दे. माझे अत्यंत महत्त्वाचे काम आहे.’’ ते ऐकून लक्ष्मण त्या अग्नीप्रमाणे तेजस्वी ऋषीला म्हणाला, ‘‘आपले आज रामाशी कोणते कार्य आहे? आपली जी काही इच्छा असेल ती मी पूर्ण करीन. राजा राम दुसऱ्या काही कार्यात गुंतला आहे म्हणून थोडा वेळ आपण थांबावे.’’ ते ऐकून दुर्वास ऋषी क्रोधसंतप्त होऊन लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘ह्याक्षणी, हे लक्ष्मणा! जर प्रभु रामचंद्राची भेट करविली नाहीस तर मी तुझ्या सर्व कुळस्थळाचे भस्म करून टाकीन यात संशय नाही.’’ दुर्वास ऋषीचे ते अत्यंत भयंकर भाषण ऐकून आणि त्या वाक्याच्या स्वरूपाचा विचार करून लक्ष्मणाने मनात म्हटले, ‘माझ्या सर्व कुटुंबाचा नाश होण्यापेक्षा माझा एकट्याचाच नाश होणे अधिक चांगले.’ असा निश्चय करून लक्ष्मण रामाकडे गेला आणि त्याला दुर्वास आल्याचे सांगितले.
सौमित्राचे भाषण ऐकल्यानंतर रामाने कालाला निरोप दिला. त्वरित बाहेर येऊन त्याने त्या अत्रिसुत ऋषीची भेट घेतली. रामाने संतुष्ट चित्ताने त्या ऋषीला वंदन केले आणि आदरपूर्वक प्रश्न केला. तो रघुश्रेष्ठ ऋषीला म्हणाला, ‘‘मुने! आपले कोणते कार्य मी केले पाहिजे?’’ ते वचन ऐकून दुर्वास रामाला म्हणाला, ‘‘हजारो वर्ष केलेल्या उपोषणाची आज मला समाप्ती करावयाची आहे. म्हणून रघुत्तमा! घरात जे सिद्ध असेल त्याचे भोजन करण्याची माझी इच्छा आहे.’’ ऋषीचे भाषण ऐकून रामाला संतोष झाला. त्याने ऋषीला यथेच्छ सिद्धान्न घातले. ते अमृतासारखे अन्न भक्षण करून संतुष्ट चित्ताने तो ऋषी तेथून निघून गेला.
ऋषी आश्रमाला गेल्यावर रामाला कालाच्या भाषणाची आठवण झाली. दुःख आणि शोकामुळे त्याचे मन उद्विग्न झाले. तो अत्यंत विव्हळ झाला. त्याच्या तोंडातून शब्द निघेना. लक्ष्मणाचा घात झाला हे त्या रघुश्रेष्ठाला कळून आले. सर्व प्राणीमात्रांचा स्वामी तो राम दुःखाने मुख खाली खालून स्वस्थ बसला. राम दुःखमग्न होऊन सचिंत स्वस्थ बसला आहे आणि प्रेमपाशाची निंदा करीत आहे असे पाहून लक्ष्मण त्याला म्हणाला, ‘‘रघुनंदना! हा माझ्यामुळे उत्पन्न झालेला संताप सोडून दे. माझा वध कर. प्रभो! अशाप्रकारे कालाची गती होणार हे पूर्वीच ठरलेले आहे. तुझ्या हातून प्रतिज्ञाभंग झाल्यास मला नरकात जावे लागेल! जर तुझी माझ्यावर प्रीति असेल आणि मी जर तुझ्या अनुग्रहास पात्र असेन तर शंका सोड आणि माझा वध कर. प्रभो! तू सर्व जाणतोस, तरी धर्माचा त्याग करू नकोस.’’ लक्ष्मणाचे ते भाषण ऐकून रामाने आपल्या सर्व प्रधानांना आणि वसिष्ठांना बोलावून आणले आणि त्यांना सर्व वर्तमान सांगितले. प्रभु रामाने मुनिचे आगमन, कालाचे भाषण आणि आपली प्रतिज्ञा हे सर्व त्यांना सांगितले. रामाचे भाषण ऐकून ते सर्व मंत्री आणि उपाध्याय हात जोडून, कष्टांशिवाय कोणतेही कार्य शेवटास नेणाऱ्या त्या रामाला म्हणाले, ‘‘पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी आपण जेव्हा अवतार घेतला तेव्हा आपला लक्ष्मणाशी वियोग होणार, हे पूर्वीच ठरलेले होते व ती गोष्ट ज्ञानदृष्टिच्या योगाने आपणास कळालेलीही होती. रामा! लक्ष्मणाचा त्याग सत्वर कर, पण प्रभो! प्रतिज्ञेचा भंग करू नकोस. प्रतिज्ञेचा त्याग केला असता धर्म निष्ङ्गल होतो. धर्माचा नाश झाला की सर्व त्रैलोक्य निःसंशय नाश पावते. हे रघुत्तमा! तू तर सर्व लोकांचा पालक आहेस. एका लक्ष्मणाचा त्याग करून त्रैलोक्याचे रक्षण करणे, हे तुला योग्य आहे.’’ धर्माला आणि अर्थाला अनुसरून त्यांनी केलेले पवित्र भाषण सभेमध्ये ऐकून लगेचच रामाने लक्ष्मणाला सांगितले. ‘‘लक्ष्मणा! तुला वाटेल तिकडे निघून जा. धर्माचा लोप होऊ नये याकरिता चांगल्या मनुष्याचा त्याग करणे किंवा वध करणे ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत.’’ असे त्या रघुत्तमाने सांगितले असता लक्ष्मणाचे डोळे दुःखाश्रूंनी भरून आले. रामाला नमस्कार करून लक्ष्मण ताबडतोब आपल्या गृही गेला. तेथून तो सरयू नदीच्या तीरावर गेला. तेथे आचमन करून लक्ष्मणाने हात जोडले. नऊही द्वारे बंद केली, मस्तकी प्राण नेला आणि नाशरहित, निर्विकार, सर्वांचे आश्रयस्थान वासुदेवनामक परब्रह्मपदाचे त्याने अंतःकरणपूर्वक ध्यान सुरू केले. पुढे लक्ष्मणाने प्राणवायुचा निरोध केल्यावर अग्नीसह सर्व देवांनी आणि ऋषींनी त्याच्यावर पुष्पवृष्टि केली आणि त्याची स्तुती केली. लक्ष्मणाला शरीरासह उचलून घेऊन इंद्र स्वर्गलोकाला गेला. इतर देवांना ते लक्ष्मणाचे शरीर काही काळ अदृश्य होते. पुढे लक्ष्मण हा विष्णुचा चतुर्थांश आहे असे मोठमोठ्या देवांना आणि सर्व देवर्षींना दिसून आल्यावरून त्यांनी लक्ष्मणाची पूजा केली. लक्ष्मणरूपी हरि, विष्णुचा अंश असा लक्ष्मण स्वर्गाला गेला आणि त्याचे पूर्वीचे मोठे सर्परूप त्याला प्राप्त झाले. तेव्हा सिद्धलोकातील योगी आणि ब्रह्मदेव मोठ्या आनंदाने त्याच्या दर्शनास आले.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे अष्टमः सर्गः।