श्री महादेव म्हणाले,
‘‘असा रात्रभर विचार करून आणि जे काही करावयाचे त्याची निश्चित योजना मनात ठरवून तो बुद्धिमान रावण प्रभातकालीच रथावर आरुढ झाला. तो समुद्राच्या पैलतीरावर असणाऱ्या मारीचाच्या गृही गेला. तेथे मारीच जटा आणि वल्कले धारण करून रहात असे. स्वतः निर्गुण असून गुणांना भासविणाऱ्या परमात्म्याचे तो ध्यान करीत होता. समाधि उतरल्यावर त्याने आपल्या घरी आलेल्या रावणाला पाहिले. त्याने ताबडतोब उठून रावणाला आलिंगन दिले. त्याची यथाविधि पूजा केली. आदरातिथ्य होऊन रावण सुखाने बसला असता मारीच त्याला म्हणाला, ‘‘रावणा! आज तुझे एकाच रथानिशी आगमन झाले! काहीतरी कार्याचा विचार मनात सारखा सुरू आहे म्हणून तू अत्यंत चिंताग्रस्त दिसतो आहेस. ह्यात काही गौप्य नसेल तर मला सांग. मी तुझे जे इष्ट असेल ते करीन. हे राजश्रेष्ठा! ती गोष्ट न्याय्य असेल तरच मला सांग. कारण मला पाप लागू नये.’’
रावण म्हणाला, ‘‘अयोध्यानगरीचा दशरथ नावाचा राजा होता. त्याचा ज्येष्ठ पुत्र राम सत्यपराक्रमी आहे. राजा दशरथाने रामाला बंधु लक्ष्मण आणि पत्नी सीतेसह ह्या रानटी लोकांना प्रिय असलेल्या अरण्यात पाठविले आहे. तो अरण्यात पंचवटी नावाच्या पुण्याश्रमात रहात आहे त्याची पत्नी सीता विशाल नेत्र असलेली, लोकांना मोह उत्पन्न करणारी अशी सुंदर आहे. माझ्या पराक्रमी राक्षसांना, खराला अपराधाशिवाय ठार मारले असून तो निर्भय होऊन वनात राहतो आहे. माझी बहीण शूर्पणखा अगदी निर्दोष असून तिचे नाक, कान त्या दुष्टाने कापले आहेत. आता तो पूर्णपणे निर्भय झाला आहे. म्हणून मला तुझे साहाय्य हवे आहे. तेथे जाऊन राम अरण्यात नाही असे पाहून त्याच्या प्रिय पत्नीला घेऊन यावे अशी माझी योजना आहे. तू मायेने हरिणाचे रुप घेऊन रामाला आश्रमापासून दूर घेऊन जावे म्हणजे मला सीतेचे हरण करता येईल. ह्या कार्यात मला तुझी मदत पाहिजे. त्यानंतर तू पूर्ववत आपल्या ठिकाणी जाऊन रहावे.’’ असे रावण म्हणाला.
हे ऐकून मारीचाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, ‘‘तुझा संपूर्णपणे घात होईल असा उपदेश तुला कुणी केला? असा उपदेश करून तो तुझ्या नाशाची वाट पहात आहे. तोच तुझा शत्रू असून त्याचाच तू प्रथम वध केला पाहिजे. रामाच्या पराक्रमाचे नुसते स्मरण जरी झाले तरी आजही माझे अंतःकरण भयग्रस्त होते. कौशिकाच्या विश्वामित्राच्या यज्ञरक्षणासाठी बालपणी राम आला होता. तेव्हा त्याने एकाच बाणाने मला शंभर योजने दूर समुद्रात फेकून दिले होते. तेव्हापासून मला त्याची खूप भीती वाटते. मला सतत त्याचीच आठवण येते. सर्वत्र मला एक रामच दिसतो आहे. दण्डकारण्यात पूर्वीचे वैर मनात धरून मी एकदा तीक्ष्ण शिंगाच्या हरिणाचे रुप धारण केले होते व माझ्यासारख्या अनेकांना बरोबर घेऊन त्याच्यावर धावून गेलो. सीता आणि लक्ष्मणासह राम जेथे होता त्या ठिकाणी त्याला मारण्यासाठी मी घाईघाईने गेलो. मला आलेला पाहून रामाने माझ्यावर एक बाण टाकला. हे राक्षसश्रेष्ठा, तो बाण मला हृदयाच्या ठिकाणी लागला आणि मी कोलांट्या खात समुद्रात पडलो. तेव्हापासून भयभीत होऊन मी ह्या पीडारहित ठिकाणी राहतो आहे. मला सर्वत्र रामाचाच भास होतो. एवढा भास होतो की सर्व उपभोग्य पदार्थातही रामाचा भास होतो. मी घाबरून जातो. ज्यांचे पहिले अक्षर ‘र’ आहे, असे राजा, रत्न, रमणी, रथ इ. शब्द जरी ऐकले तरी सुद्धा भीती वाटते. राम आला की काय ह्या शंकेने मी बाहेरची सर्व कामे सोडून दिली. मी जेव्हा झोपतो तेव्हा सतत रामाचा विचार करीत असल्यामुळे स्वप्नातही राम दिसतो आणि मी जागा होतो. मग झोप नष्ट होते. म्हणून तू रामासंबंधीचा आग्रह सोडून दे. घरी जा आणि चिरकाल परंपरेने चालत आलेल्या राक्षसकुळाचे पालन कर. रामाच्या विरुद्ध एखादी गोष्ट मनात आणशील तर संपूर्ण राक्षसकुळ नष्ट होईल. मी तुझ्या हिताचीच गोष्ट सांगत आहे. तरी तू माझे म्हणणे ऐक. ‘परमात्मा’ रामाच्या ठिकाणी विरोधभक्ति टाकून त्याचे भक्तिपूर्वक भजन कर. तो रघुनंदन अत्यंत दयाळू आहे. नारदमुनीच्या बोलण्यावरून मला समजले आहे की सत्ययुगात ब्रह्मदेवाने परमेश्वराची प्रार्थना केली. त्यावेळी श्रीहरिने त्यांना सांगितले की ‘तुझी इच्छा काय आहे ते सांग, तसे मी करतो.’ तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, ‘हे कमललोचन श्रीहरि! मनुष्यरूप धारण करून आणि दशरथाचा पुत्र होऊन तू पृथ्वीवर अवतीर्ण हो आणि शत्रूरुपात असलेल्या दशाननाचा वध कर.’’ म्हणून रामाने अवतार घेतला आहे. तो मनुष्य नसून साक्षात निर्विकार नारायण आहे. मायेने मनुष्यरुप घेऊन, अतिनिर्भय होऊन पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी या वनात आला आहे. तरी तू सुखाने घरी जा.’’
हे मारीचाचे भाषण ऐकून रावण म्हणाला, ‘‘ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेनुसार परमात्मा राम जर मला मारण्यासाठी मनुष्यरुप घेऊन प्रयत्नपूर्वक येथे आला आहे तर तो सत्यसंकल्प प्रभु लवकरच त्याप्रमाणे करेल आणि म्हणूनच शक्य तो प्रयत्न करून मी रामापासून सीतेला घेऊन येणार आहे. हे वीरा! रणांगणात माझा वध झाल्यास मला परमपदाची प्राप्ती होईल. याउलट रामाला मी युद्धात मारले तर सीतेची प्राप्ती होऊन मी निर्धास्त होईन. म्हणून हे महाभागा! मारीचा! उठ, विचित्र मृगरुप धारण कर आणि राम-लक्ष्मणाला आश्रमापासून बरेच दूर घेऊन जा. त्यानंतर तू सत्वर घरी जा. सुखाने रहा. जर मला घाबरविणारे भाषण केलेस तर इथेच तुझा मी वध करीन, ह्यात काही संशय नाही.’’
असे रावणाने म्हटल्यानंतर मारीच मनात विचार करू लागला, ‘जर मला राम मारील तर मी संसारसागरातून मुक्त होईन. परंतु हा दुष्ट रावण मला मारील तर मला निःसंशय नरकाची प्राप्ती होईल.’ असा विचार करून रामाकडून वध व्हावा म्हणून मारीच वेगाने उठला आणि रावणाला म्हणाला, ‘‘हे महासमर्थ राजा! तुझी आज्ञा पालन करतो.’’ असे म्हणून ते दोघे रथात बसले आणि रामाच्या आश्रमाजवळ आले. मारीचाने सुवर्णमृगाचे रूप धारण केले. त्याच्या अंगावर रुप्यासारखे ठिपके होते. त्याची शिंगे रत्नाची होती, खूर हिऱ्याचे होते, डोळे निळ्या रत्नांचे इंद्रनीलमण्याप्रमाणे होते, कांती विजेसारखी होती आणि चेहरा अत्यंत सुंदर होता. तो हरीण वनात इकडेतिकडे ङ्गिरू लागला. तो रामाच्या आश्रमाच्या बाजूने सीतेच्या दृष्टीस पडून क्षणभर पुढे धावत असे. क्षणभर उभा राही. काही वेळाने जवळ येऊन भयभीत होऊन पुन्हा दूर निघून जात असे. अशारितीने कपटाने हरिणाचे रूप धारण करणारा तो दुष्ट मारीच सीतेला मोह पडावा अशा उद्देशाने तेथेच बागडत राहिला.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अरण्यकाण्डे षष्ठः सर्गः।