श्री महादेव म्हणाले,
‘‘हे पार्वति, रघुनंदन राम त्या ठिकाणी एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी सकाळीच स्नान करून मुनिश्रेष्ठांचा निरोप घेऊन पुढील प्रस्थानाच्या तयारीस लागले. राम म्हणाला, ‘‘मुनिवर्य, ज्या दण्डकारण्याला मुनिसमुदायाच्या निवासामुळे अत्यंत शोभा आली आहे, अशा त्या दण्डकारण्यात आम्ही जात आहोत. तरी आपण आम्हाला आज्ञा द्यावी ही विनंती आहे. आम्हाला मार्ग दाखविण्यासाठी आपल्या शिष्यांना सूचना द्यावी.’’ हे रामाचे भाषण ऐकून ते महाकीर्तिवान महर्षि अत्रिमुनि हसू लागले आणि रामाला म्हणाले, ‘‘हे रामा, तू तर देवांनाही आधार देणारा आहेस. तू स्वतः सर्वांचा मार्गदर्शक असून आणखी दुसरा कोण तुला मार्ग दाखविणार आहे? तरी पण लोकांचे अनुकरण करणाऱ्या तुला माझे शिष्य मार्ग दाखवतील.’’ असे बोलून त्यांनी शिष्यांना आदेश दिला आणि स्वतः काही अंतरापर्यंत त्याला पोचवायला गेले. रामाने त्यांना प्रेम आणि आदरपूर्वक परत जाण्याची विनंती केली. त्यानंतर अत्रिमुनि आपल्या आश्रमात परत आले.
पुढे एक कोस अंतर चालून गेल्यानंतर त्यांना एक मोठी नदी दिसली. तेव्हा राम त्या अत्रिऋषींच्या शिष्यांना म्हणाला, ‘‘नदी पार करून जाण्याची काही व्यवस्था येथे आहे का?’’ त्यावर शिष्य म्हणाले, ‘‘हे रघुनंदना, येथे एक मजबूत नौका आहे. तिच्या साहाय्याने आम्ही तुम्हाला एका क्षणात पलीकडे नेऊ.’’ त्यानंतर राम, सीता, लक्ष्मण यांना नौकेत बसवले आणि त्या शिष्यांनी क्षणभरात त्या सर्वांना पैलतीरावर उतरविले. रामाचा प्रेम, आनंदाने निरोप घेऊन ते सर्व मुनीकुमार अत्रिऋषींच्या आश्रमात परत गेले.
पुढे जात असलेल्या त्या तिघांना एक घोर अरण्य लागले. तेथे सतत रानमाशांचा ‘घों घों’ असा सारखा आवाज येत होता. अनेक प्रकारचे वन्यपशूंचे समुदाय सर्वत्र फिरत होते. व्याघ्र-सिंहादि पशू तेथे असल्यामुळे ते अरण्य अतिशय भीषण वाटत होते. भयानक रूप धारण करणारे भयंकर असे राक्षस सुद्धा तेथे रहात होते. अशा त्या भयानक अरण्यात प्रवेश केल्यावर राम लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘ह्यापुढे तू अतिशय दक्ष होऊन माझ्यासोबत रहा. मी पुढे जातो. तू माझ्यामागून धनुष्य सज्ज करून रहा.’’ असे म्हणून त्याने धनुष्याला प्रत्यंचा लावली आणि हातात बाण घेऊन तो चालू लागला. परमात्मा आणि जीवात्मा ह्या दोहोंमध्ये माया असते त्याप्रमाणे सीता ही दोघांच्यामध्ये राहून चालत असे. ‘‘लक्ष्मणा, तू चौफेर दृष्टी ठेव. हे शत्रूदमना लक्ष्मणा, दण्डकारण्यात राक्षसांची फारच भीती असते हे पूर्वी ऐकले होते. आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहे.’’ असे बोलत बोलत ते सहा कोस रस्ता चालून गेले. तेथे त्यांना एक सरोवर दिसले. त्या सरोवरात निळी, पांढरी, तांबडी अशा रंगाची कमळे होती आणि थंड पाणी असल्यामुळे ते सरोवर खूप सुंदर दिसत होते. त्या तिघांनीही त्या सरोवराचे पाणी प्राशन केले. त्या पाण्याच्या जवळच, छायेखाली त्यांनी क्षणभर विश्रांती घेतली. तेवढ्यात एक भयानक, प्रचंड प्राणी त्यांच्या दिशेने येत असल्याचे त्यांनी पाहिले. त्याच्या तोंडात भयंकर दाढा होत्या. आपल्या गर्जनेने तो सर्वांना भीती दाखवित होता. त्याच्या डाव्या खांद्यावर एक शूळ होता. त्या शूळाच्या टोकाला अनेक माणसे त्याने बांधून ठेवली होती. अरण्यात हिंडत असताना दिसेल तो प्राणी मग ते हत्ती, वाघ, रेडा कोणालाही तो खात असे. अशा त्या भयंकर राक्षसाला पाहून आपले प्रत्यंचा लावलेले धनुष्य हातात सज्ज ठेवून राम लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘बंधो, तो पहा भयंकर अक्राळविक्राळ देहाचा राक्षस आला आहे. हा घाबरट लोकांना भीती दाखवतो आहे. तेव्हा तू आपले धनुष्य सज्ज करून रहा. हे सीते, तू घाबरू नकोस.’’ असे म्हणून बाण हातात घेऊन राम पर्वतासारखा निश्चल उभा राहिला. त्यावेळी तो राक्षस राम आणि सीता यांना पाहून भीती दाखविण्यासाठी विकट हास्य करून म्हणाला, ‘‘तुम्ही दोघे कोण आहात? तुम्ही लहान बालके असून मुनिवेष धारण केला आहे. बाण, भाते, जटा, वल्कले धारण केली आहेत. तुमच्याबरोबर ही स्त्री आहे. तुम्ही फार उन्मत्त दिसत आहात. तुम्ही फार सुंदर आहात, पण माझ्या मुखात प्रविष्ट झालेल्या घासाप्रमाणे मला वाटत आहात. हिंस्त्र पशू असलेल्या या अरण्यात तुम्ही कशासाठी आला आहात?’’
असे त्या राक्षसाचे बोलणे ऐकून राम हसून त्याला म्हणाला, ‘‘मी राम आहे आणि हा लक्ष्मण माझा प्रिय बंधू आहे. तसेच ही सीता माझी प्राणप्रिय स्त्री आहे. वडिलांच्या वचनाप्रमाणे तुमच्यासारख्यांना शिक्षा करण्यासाठी आम्ही आलो आहोत.’’ हे रामाचे भाषण ऐकून तो राक्षस मोठ्याने हसला. तोंड पसरून लगेच त्याने हातात शूळ घेतला आणि म्हणाला, ‘‘हे रामा! तू ह्या जगद्विख्यात अशा विराधाला, मला ओळखत नाहीस काय? माझ्या भीतीमुळे येथील मुनिजन वन सोडून निघून गेले. तुम्हाला जर जिवंत राहण्याची इच्छा असेल तर आपली आयुधे टाकून आणि सीतेला सोडून निघून जा. नाही तर मी तुम्हा दोघांना आताच खाऊन टाकीन.’’
असे म्हणून तो राक्षस सीतेला धरण्यासाठी तिच्यावर धावून गेला. तेव्हाच रामाने हसतहसत बाण मारून त्याचे दोन्ही हात तोडले. तेव्हा अतिशय संतप्त होऊन त्याने आपले भयंकर असे मुख पसरले, रामावर धावून आला. तो धावून येत आहे असे पाहून रामाने त्याचे दोन्ही पाय तोडून टाकले. नंतर तोंडाने रामाचा घास घेण्याच्या हेतूने सापाप्रमाणे सरपटत तो राक्षस रामाकडे येऊ लागला. तेव्हा रामाने अर्धचंद्राकार बाण योजून त्याचे प्रचंड मस्तक तोडून टाकले. त्याचे मस्तक रक्ताच्या थारोळ्यात पृथ्वीवर पडले. ते पाहून सीतेने रामाला आलिंगन दिले आणि त्याची प्रशंसा केली. त्यावेळी देवगणांनी दुंदुभी वाजविल्या. अप्सरा आनंदाने नाचू लागल्या, गंधर्व-किन्नर गाऊ लागले. आकाशात सूर्य दिसावा त्याप्रमाणे त्या विराधाच्या देहातून अत्यंत तेजस्वी असा निर्मल वस्त्र परिधान केलेला, सोन्यासारख्या चकचकीत अलंकारांनी सुशोभित असा एक पुरुष प्रगट झाला. प्रणतांची दुःखे दूर करणारा, संसारप्रवाहाचा नाश करणारा, दयेची जणू खाणच असलेला, अशा श्रीरामाला त्याने नमस्कार केला. नंतर प्रसन्नचित्ताने त्या शरण आलेल्यांची संकटे निवारण करणाऱ्या रामाला त्याने पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. विराध म्हणाला, ‘‘कमलपत्रविशालाक्षा श्रीरामा, मी अत्यंत तेजस्वी असा विद्याधर आहे. अकारण क्रुद्ध होणाऱ्या दुर्वासमुनींनी पूर्वी मला एक शाप दिला होता. त्या शापातून आज तू मला मुक्त केले आहेस. आता यापुढे संसारपीडा नाहीशी व्हावी यासाठी तुझ्या चरणकमलांची मला सदैव स्मृती व्हावी, माझी वाणी तुझ्या नामाचे सतत संकीर्तन करो. माझ्या हाताने सदैव तुझे पूजन-अर्चन होवो. माझे मस्तक सतत तुझ्या चरणांना वंदन करो. माझे सर्व शरीर तुझ्या सेवेत तत्पर असो. भगवन् सीतारामा! विशुद्ध ज्ञान, अपरोक्ष ज्ञान म्हणजे तुझी मूर्ती आहे. तू स्वस्वरुपी रममाण होणारा आहेस आणि तू सर्वांना रमविणारा असून अघटित घटनासामर्थ्यवान आहेस. तुला माझा नमस्कार असो. हे रामा! मी तुला शरण आलो आहे. तूच माझे रक्षण कर. मी तुझ्या आज्ञेने देवलोकी जाईन. हे रघुश्रेष्ठा! तुझी माया मला मोहित न करो.’’ अशी विनंती विराधाने केली असता श्रीरामचंद्र प्रसन्न झाले. संतुष्ट होऊन बुद्धिमान रामाने विराधाला वर दिला आणि सांगितले, ‘‘हे विराधा, मायादोषाचे परिणाम तू जिंकले आहेस. ज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ होऊन तू मुक्त झाला आहेस. लोकांमध्ये दुर्मिळ अशी माझी भक्ति उत्पन्न झाली असता मुक्ति निश्चितपणे मिळतेच. म्हणून तू भक्तिसंपन्न होऊन माझ्या आज्ञेने मोक्षाला जाशील.’’ श्रीरामाने भयंकर अशा राक्षसाचा नाश केला, त्याला शापातून मुक्त केले. वर सुद्धा दिला. तो राक्षस पुन्हा विद्याधर झाला. जो कोणी रामचरित्र वर्णन करतो त्याला संपूर्ण इच्छित वस्तू प्राप्त होतात.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अरण्यकाण्डे प्रथमः सर्गः।