श्री महादेव म्हणाले,
‘‘तो गंधर्व अशाप्रकारे वर मिळवून जाण्यासाठी निघाला असता रामाला म्हणाला, हे रघुनंदना! पुढच्या भागात दिसणाऱ्या मतंग ऋषींच्या एका आश्रमात शबरी नावाची एक भिल्लिण राहते आहे. ती भक्तिमार्गनिपुण असून तुझ्या चरणकमलाच्या ठिकाणी तिची अत्यंत भक्ति आहे. हे महाभागा! तू तिच्याकडे जा. ती तुला सर्व काही सांगेल.’’ असे बोलून सूर्यासारख्या तेजस्वी विमानात बसून तो विष्णुपदास, स्वर्गास गेला. रामनामस्मरणाच्या ठिकाणी असे फल आहे. सिंह, व्याघ्र इत्यादिकांनी दूषित असे ते भयंकर वन सोडून तो रघुनंदन राम शबरीच्या आश्रमात गेला. लक्ष्मणासह राम आश्रमाच्या जवळ आलेला पाहून आनंदाने उठून ती रामाला सामोरी गेली आणि तिने रामाच्या चरणांवर लोटांगण घातले. आनंदाश्रूंनी तिचे डोळे भरून आले. कुशलश्नपूर्वक आदरसत्कार करून तिने त्यांना उत्तम आसनावर बसविले. भक्तिपूर्वक दोघांचे उत्तम पादप्रक्षालन करून त्या उदकाचे आपल्या अंगावर सिंचन केले. नंतर अर्घ्यादि उपचारयुक्त पूजासाहित्याने राम, लक्ष्मणांची शबरीने आदरपूर्वक यथाविधि पूजा केली आणि रामाला देण्याकरिता म्हणून अमृततुल्य फळे गोळा करून ठेवली होती, ती आनंदाने भक्तिपूर्वक रामाला अर्पण केली. सुवासिक फुलांनी आणि विलेपनांनी त्यांचे पाद्यपूजन केले. रघुश्रेष्ठ रामाचे असे आदरातिथ्य केल्यानंतर शबरी हात जोडून म्हणाली ‘‘हे रघुत्तमा! ह्या आश्रमात माझे गुरू महर्षि मतंग रहात होते. त्यांच्या सन्निध राहून मी कित्येक सहस्त्र वर्षे सेवा केली. सांप्रत ते ब्रह्मपदाला गेले. जाताना त्यांनी मला सांगितले की तू येथेच समाधानाने रहा. सनातन परमात्मा राक्षसांच्या वधाकरिता आणि ऋषींचे रक्षणाकरिता दशरथपुत्र राम म्हणून अवतीर्ण झाला आहे. तो येईपर्यंत ध्याननिष्ठ होऊन येथेच स्थिर रहा. सांप्रत तो चित्रकूट पर्वतावरील आश्रमात रहात आहे. तो येईपर्यंत आपल्या शरीराचे रक्षण कर. रामाचे दर्शन झाल्यावर शरीर दग्ध करून घे, म्हणजे तू त्याच्या पदाला जाशील. त्याप्रमाणे हे रामा, मी केले आहे. आज माझ्या गुरुंचे भाषण सफल झाले आहे. हे अप्रमेयरूपा रामा! तुझे दर्शन माझ्या गुरुंनाही झाले नाही. मला कसे बरे होणार? मी एक हीन जातीत जन्मलेली मूर्ख स्त्री. तुझ्या दासाची दासी किंवा अशा दासांची परंपरा शतकावरही असली तरी मला त्यांची दासी होण्याचाही अधिकार नाही. मग प्रत्यक्ष तुझे दर्शन कोठून होणार? रामा! मन आणि वाणीला तुझे स्वरूप कळण्यासारखे नाही, असा तू माझ्या दृष्टीस पडला हे कसे? देवेशा! तुझी स्तुती कशी करावी याचे मला ज्ञान नाही. त्याला काय करू? माझ्यावर प्रसन्न हो.’’
श्रीराम म्हणाले, ‘‘पुरुष, स्त्री हा विशेष किंवा जाती, नाम, आश्रम इ. गोष्टी माझ्या भजनाला, सेवा करण्याला कारण होत नाहीत. त्यासाठी भक्ति हेच साधन आहे. माझ्या भक्तिसंबंधी जे सर्वदा पराङ्मुख असतील, त्यांनी कितीही यज्ञे, दाने, तपश्चर्या, वेदाध्ययन इ. कर्मे केली तरी त्यांना माझे दर्शन होणे शक्य नाही. म्हणून हे स्त्रिये! भक्तिची साधने थोडक्यात सांगतो. पहिले साधन म्हणजे सज्जनसंगती हेच सांगितले आहे. दुसरे साधन माझ्या कथांचे वर्णन, तिसरे माझ्या गुणांचे गायन करणे, चौथे माझ्या वचनांचे व्याख्यान करणे. हे कल्याणि! ‘हा रामच आहे’ अशा बुद्धिने निष्कपट रितीने सदैव गुरुंची उपासना करणे हे पाचवे साधन होय. पुण्याचरणाची आवड आणि यमनियमांचे पालन करणे, माझ्या पूजनात सदैव एकनिष्ठता ठेवून राहणे हे सहावे साधन आहे. माझ्या मंत्रांची सांग उपासना करणे हे सातवे साधन आहे. माझ्यापेक्षाही माझ्या भक्तांची पूजा करणे, भूतमात्रांच्या ठिकाणी मद्भाव म्हणजे ‘ही सर्व रामच आहेत’ असा भाव ठेवणे, लौकिक गोष्टीचा कंटाळा करणे, मनाचा आणि बाह्येंद्रियांचा निग्रह करणे हे आठवे साधन आणि मत्स्वरूपाचा तत्त्वविचार हे नववे साधन होय. अशी नऊ प्रकारांनी भक्ति आहे. ह्या सर्वांचे साधन जो कोणी करील मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो किंवा पशुपक्षीकोटितील असो, त्याच्या ठिकाणी माझी भक्ति जडते. हे शुभलक्षणे! प्रेम हे त्या भक्तिचे लक्षण होय. भक्ति झाल्याबरोबर माझ्या स्वरूपाचा अनुभव येतो. माझ्या स्वरूपाचा अनुभव, साक्षात्कार झाला असता त्याच जन्मात मोक्ष मिळतो. म्हणून भक्ति हेच मोक्षाचे कारण आहे, हे निश्चित होय. वरीलपैकी प्रथम साधन केले असता क्रमाने सर्वसाध्य होते म्हणून भक्ति म्हणजेच मुक्ति होय हे पूर्णपणे योग्य आहे. ज्याअर्थी तुझी माझ्यावर भक्ति जडली आहे त्याअर्थी मी तुझ्याकडे आलो आहे. माझ्या दर्शनामुळे तुला मुक्ती मिळेल यात संशय नाही. आता तुला माहीत असेल तर कमललोचना सीता कोठे आहे? त्या माझ्या सुस्वरूप प्रियेला कोणी नेले ते सांग.’’
तेव्हा शबरी म्हणाली, ‘‘देवा सर्वज्ञा! विश्वकर्त्या! तू सर्व जाणत आहेस. त्याअर्थी हे प्रभो! सांप्रत सीता कोठे आहे हे मी तुला सांगते. रावणाने सीतेचे अपहरण केले असून सध्या ती लंकेमध्ये आहे. हे रामा! येथे जवळच पंपा नावाचे सरोवर आहे. त्याच्या जवळच ऋष्यमूक नावाचा मोठा पर्वत आहे. त्यावर सुग्रीव नावाचा अतुल पराक्रमी वानरांचा राजा भयभीत होऊन आपल्या चार प्रधानांसह राहात आहे. त्याला आपल्या वाली नामक भावाची भीती वाटते. तथापि एका ऋषींच्या भीतीमुळे तो वाली येथे येऊ शकत नाही. प्रभो! तू तेथे जा आणि सुग्रीवाशी मैत्री कर. तो तुझे सर्व कार्य सिद्धीस नेईल. हे रघुनंदना! तुझ्यासमोर मी आता अग्निप्रवेश करते. हे राजेंद्रा! क्षणभर येथे राहा. तोपर्यंत मी शरीराचे दहन करून तुझ्या विष्णुपदाला जाईन.’’ अशाप्रकारे रामाशी बोलून त्या शबरीने अग्निप्रवेश केला. तत्क्षणी तिच्या अज्ञानातून निर्माण झालेली सर्व बंधने नष्ट झाली. रामाच्या प्रसादामुळे ती शबरी अत्यंत दुर्लभ अशा मोक्षाला प्राप्त करती झाली.
भक्तवत्सल जगन्नाथ राम प्रसन्न झाला असता दुर्लभ असे काय असणार? नीच कुळात जन्मलेली शबरी मोक्षाला प्राप्त करती झाली. तर मग वर्णात मुख्य, सदाचरणी, रामाचे चिंतन करणारे ब्राह्मण मुक्ती मिळवतील यात संशय नाही. हे सुज्ञ जनहो! भगवान श्रीरामचंद्राची भक्ती मुक्ती देणारी आहे. म्हणून इच्छा पूर्ण करणारी कामधेनुच अशा त्याच्या चरणयुगुलांची अतिशय उत्सुक होऊन सेवा करा. विविध प्रकारचे अज्ञानमूलक असे जे मंत्रतंत्राचे खटाटोप, ते दूर टाका आणि मदनारि शंकराच्या हृदयात शोभणाऱ्या श्यामसुंदर प्रभु रामचंद्राचे भजन करा.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अरण्यकाण्डे दशमः सर्गः।