श्री महादेव म्हणाले,
विराध स्वर्गाला गेला असता लक्ष्मण, सीतेसह राम शरभंग ऋषिंच्या वनात गेला. ते वन सर्व प्राण्यांना सुखदायी होते. लक्ष्मणासह सीतेला घेऊन रामाला आलेला पाहून ते बुद्धिमान ऋषि लगेच उठले. सामोरे जाऊन त्यांनी त्या तिघांचे आदरपूर्वक पूजन केले. आसनावर बसवून कंदमूळफलादिकांनी त्यांचे आतिथ्य केले. नंतर शरभंग ऋषि मोठ्या प्रेमाने त्या भक्तवत्सल रामाला म्हणाले, ‘‘हे रामा, तप करण्याच्या दृढ संकल्पामुळे मी येथे बरेच वर्षे राहिलो. तुझे दर्शन व्हावे ही मनोमन इच्छा होती. कारण हे रामा, तू प्रत्यक्ष परमेश्वरच आहेस. माझ्या तपश्चर्येच्या सिद्धिने जे काही पुण्य मिळविले आहे ते सर्व आज मी तुला अर्पण करतो. त्यानंतर मी मुक्तीला प्राप्त करून घेईन.’’ असे म्हणून शरभंगाने आपले सर्व पुण्यफल रामाला अर्पण केले. नंतर शरभंग ऋषिंनी सीतेला आणि अप्रमेय, अनिवर्चनीय रामाला प्रणाम करून तत्काल चितेवर आरोहण केले. जो सर्वांच्या हृदयात राहतो, दुर्वादलाप्रमाणे ज्याचा सावळा वर्ण आहे, कमलासारखे ज्याचे नेत्र आहेत, ज्याने वल्कले धारण केली आहेत, सुंदर असा जटाकलाप मस्तकावर धारण केला आहे, सीता आणि लक्ष्मण ज्याच्यासोबत आहेत अशा श्रीरामाचे त्याने एकसारखे ध्यान धरले आहे, तो शरभंग म्हणाला, ‘‘स्मरण करताक्षणीच कामधेनुप्रमाणे इच्छित हेतू पुरविणारा जगामध्ये रामाशिवाय दुसरा दयाळू कोण आहे? अनन्यभावाने मी त्याचे स्मरण केले आहे आणि हीच गोष्ट ओळखून त्याने मला आज दर्शन दिले. देवाधिपति दाशरथी रामचंद्र प्रभू, आता मला पाहो. निष्पाप होऊन मी स्वतःच्या देहाचे दहन करून ब्रह्मलोकाला जातो. ज्याच्या वामांकावर सीता आरुढ झाली आहे, असा अयोध्यापति राम माझ्या हृदयात सदैव वास करो.’’ त्यानंतर रामाचे चिरकाळ ध्यान करून आणि पुढे असलेल्या प्रत्यक्ष रामाचे दर्शन घेऊन त्याने अग्नि पेटविला. त्यात आपले पंचमहाभूतात्मक शरीर जाळून टाकले. अशाप्रकारे तो दिव्य देहधारी होऊन लोकपतीच्या विष्णुपदाला गेला. नंतर दंडकारण्यात राहणारे सर्व मुनि रामाच्या दर्शनाकरिता शरभंगाच्या आश्रमात आले. त्या मुनिसमूहाला पाहून मायेने मनुष्यरुप धारण करणाऱ्या सीता, राम, लक्ष्मण ह्यांनी साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा सर्वांच्या हृदयात राहणाऱ्या रामाला त्या ऋषींनी आशीर्वाद दिले आणि रामाचे अभिनंदन केले.
नंतर हात जोडून त्यांनी त्या धनुर्धारी हरिला, भक्तांची दुःखे हरण करणाऱ्या रामाला म्हटले, ‘‘हे रामा! ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यानुसार भूमीचा भार हरण करण्याकरिता तू अवतार धारण केला आहेस. तू प्रत्यक्ष हरि आहेस. जानकी लक्ष्मी आहे. लक्ष्मण शेषाचा अंश आहे आणि भरत, शत्रुघ्न शंख चक्र आहेत, हे आम्ही जाणतो. आधी तू ऋषींचे दुःख हरण करावे, हेच योग्य आहे. हे रघुत्तमा! लक्ष्मण आणि जानकी ह्यांना घेऊन मुनींची सर्व आश्रमस्थाने क्रमाने पाहण्यास चलावे. असे केल्याने आमच्यावरील तुझी दया, प्रेम मात्र दृढ होईल.’’
अशी ऋषींनी प्रार्थना केली असता प्रभू रामचंद्र मुनींची वने पाहण्यास त्यांच्याबरोबर गेले. तेथे सर्वत्र पडलेली अनेक मस्तकांची हाडे त्याला दिसली. ते बघून राम म्हणाला, ‘‘ही कोणाची हाडे आहेत? येथे कशी काय पडली आहेत?’’ त्यावर मुनि म्हणाले, ‘‘हे रामा! ही ऋषींची मस्तके आहेत. हे प्रभो! ऋषींची समाधी उतरल्यावर त्यांची मस्तके राक्षसांनी खाऊन टाकली आहेत. ऋषींचे काहीतरी व्यंग पाहूनच ते त्यांच्या भोवताली फिरत असतात’’
अशा तऱ्हेचे भीतीयुक्त आणि दीनवाणे असे त्या मुनींचे भाषण ऐकून रामाने सर्व राक्षसांना ठार मारण्याची प्रतिज्ञा गेली. जानकी आणि लक्ष्मणासह राम तेथे काही वर्षे राहिला. तेथे ते वनवासी मुनी नेहमी रामाची पूजा करीत असत. पुढे एक एक करीत ऋषींचे आश्रम बघतबघत प्रभू राम सुतीक्ष्ण नावाच्या ऋषींच्या आश्रमात आले. तेथे अनेक ऋषी रहात होते. तेथे सर्व ऋतुतील फळे-फुले भरपूर प्रमाणात होती. म्हणून ते ठिकाण सर्वांना सुखदायी आणि राहण्यास योग्य असे वाटत होते. राम आला आहे हे ऐकून सुतीक्ष्ण ऋषी स्वतः रामाला सामोरा गेला. अगस्त्य ऋषींचा शिष्य सुतीक्ष्ण राममंत्रोपासनेत सदैव रहात असे. अतिशय भक्ति केल्यामुळे रामदर्शनासाठी त्याचे नेत्र उत्सुक झाले होते. त्याने यथाविधी रामाची पूजा केली आणि म्हणाला,
‘‘हे सीतापते! मी तुझ्या नाममंत्राचा सतत जप करीत असतो. तुझे गुण अनंत आहेत. अप्रमेय आहेत. तुझ्या चरणांचा आश्रय साक्षात शंकर, ब्रह्मदेव यांनी केला आहे. तुझे चरण म्हणजे संसारसागर तरून जाण्यासाठी उत्तम अशी नौकाच आहे. हे रामा! तू सर्वांना रमविणारा आहेस. मी सदोदित तुझ्या दासांचाही दास आहे. तुझे ज्ञान जगात कोणालाही नाही. तुझ्या मायेने मी स्त्री, पुत्र, गृहादिरुपी अंधःकारमय विहिरीत बुडालो होते. मळाचा सुंदर गोळा असलेल्या शरीराच्या मोहपाशात माझे हृदय बद्ध झाले होते. अशा अवस्थेतील मला बघून हे रामा! तू स्वतः माझ्याकडे आलास. तू सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात राहतोस. तुझ्या मंत्राचा जे जप करीत नाहीत त्यांच्यावर तू आपले मोहपाश टाकतोस आणि तुझ्या मंत्रसाधनेत तत्पर असणाऱ्यांपासून माया दूर निघून जाते. जसा राजा आपल्या सेवकांना त्यांनी केलेल्या सेवेनुसार फळ देतो, तसाच तू सुद्धा आपल्या भक्तांना त्यांच्या सेवेनुसार फळ देतो. जगाची उत्पत्ति, संहार, पालन या सर्वांना तूच एक कारण आहेस. आपल्या त्रिगुणात्मक मायेने हे ईश्वरा, तूच ब्रह्मा, विष्णु, शंकर या रुपांनी भासतोस. जसा सूर्य पाण्याच्या अनेक भांड्यात प्रतिबिंबित झाला म्हणजे विविध आकाराचा दिसतो त्याप्रमाणे तुझ्या मायेने बुद्धि मोहित झालेल्या लोकांना तुझी वेगवेगळी रूपे दिसतात. हे श्रीरामा! तमोगुणाच्या पलीकडे राहणाऱ्या तुझ्या चरणकमलांचे आज मला प्रत्यक्ष दर्शन होत आहे. दुर्जन लोकांना तुझे स्वरूप कळण्यासारखे नाही. ज्यांची हृदये तुझ्या मंत्रजपाने पवित्र झाली आहेत अशाच लोकांच्या हृदयात तू प्रसन्नतेने राहतोस. हे रामा! वास्तविक तुला रूप नाही. मायेच्या योगाने तू जे उत्तम असे मनुष्यरूप धारण केले आहे, अशा त्या स्वरूपात मला तुझे दर्शन घडते आहे. कोटिमदनांप्रमाणे तू मनोहर आहेस. हातात धनुष्यबाण असूनही तुझे अंतःकरण दयार्द्र आहे. हास्याच्या योगाने तुझ्या मुखाला सुंदर शोभा आली आहे. हे रामा! सीतेसह मला तुझे दर्शन झाले आहे. लक्ष्मण तुझ्या चरणांची नित्य सेवा करीत आहे. तुला कसलीही भीती नाही. नीलकमलाप्रमाणे तुझी अंगकांती आहे. तुझे गुण तर अनंत आहेत. तू प्रशान्त आहेस. मी तुला नित्य प्रणाम करतो. पूर्णज्ञानप्रकाशरूप असे तुझे स्वरूप ज्ञानी लोक जाणतात, जे आज मला प्रत्यक्ष गोचर झाले आहे असे मला वाटते. ते तुझे सगुणरूप माझ्या हृदयात नित्य राहो. यापेक्षा मला दुसरे काही नको.’’
अशाप्रकारे ऋषि स्तुति करीत असता राम हसत म्हणाला, ‘‘मुने, माझ्या उपासनेने तुझे चित्त निर्मल झाले आहे, हे मी जाणतो. म्हणूनच तुला भेटण्यासाठी मी आलो आहे. माझ्याशिवाय अन्य तरणोपाय नाही. जगामध्ये माझ्या नाममंत्राची जे उपासना करतात, मला शरण येतात, इतर कशाचीही इच्छा करत नाहीत, त्यांनाच माझे दर्शन होते. हे तू केलेले स्तोत्र मला प्रिय आहे आणि त्याचा नित्य पाठ करणाऱ्याची माझ्या ठिकाणी भक्ति जडेल. त्याला विमलज्ञानाची प्राप्ती होईल. माझ्या उपासनेने तू आज मुक्त झाला आहेस. देहान्ती तू माझ्या स्वरूपात लीन होशील, यात संशय नाही. तुझे गुरु मुनिश्रेष्ठ अगस्त्य मुनि, त्यांच्या दर्शनाची मला उत्कंठा लागली आहे.’’ यावर सुतीक्ष्ण म्हणाला, ‘‘राघवा, ठीक आहे. उद्या तू तिकडे जावे. मी सुद्धा तुझ्याबरोबर त्यांचे दर्शन घ्यायला येतो. बरेच दिवसांपासून मी त्यांचे दर्शन घेतले नाही.’’
अगस्त्य ऋषिंबरोबर भाषण करण्याची उत्सुकता असलेला राम पहाटेच मुनि सुतीक्ष्ण, सीता आणि लक्ष्मण यांना सोबत घेऊन अगस्तीचा कनिष्ठ बंधू जेथे राहात असे, तेथे येऊन पोहोचले.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अरण्यकाण्डे द्वितीयः सर्गः।