श्री महादेव म्हणाले,
‘‘जाता जाता मार्गावर पर्वताचे शिखरच की काय, असा उभा असलेला वृद्ध जटायु रामाला दिसला. त्याला पाहताच ‘हे काय आहे’ असे आश्चर्यचकित होऊन राम लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘सौमित्रा! धनुष्य आण. हा बघ राक्षस, पुढेच उभा आहे. ह्या ऋषिभक्षकाचा वध करतो.’’ रामाचे असे वचन ऐकून गृध्रराज जटायु भयभीत झाला आणि म्हणाला, ‘‘रामा! तू माझा वध करावा हे उचित नाही. मी तुझ्या पित्याचा प्रिय मित्र आहे. तुझे कल्याण असो. माझे नाव जटायु आहे. मी तुझे प्रिय करणारा आहे. तुझेच प्रिय करण्यासाठी मी पंचवटीत राहीन. तुम्ही दोघेही शिकारीला गेल्यास मी जानकीचे प्रयत्नपूर्वक रक्षण करीन.’’
हे जटायुचे भाषण ऐकून राम प्रेमाने म्हणाला, ‘‘हे गृध्रराज! अति उत्तम. येथे जवळच माझ्या आश्रमाजवळ वनामध्ये राहून माझे इष्ट करीत जावे.’’ असे जटायुला सांगून त्याला आलिंगन देऊन प्रभु राम, बंधु लक्ष्मण आणि सीतेसह पंचवटीला गेला. गोदावरीच्या तीरावर गेल्यानंतर पंचवटीमध्ये त्या बुद्धिमान लक्ष्मणाकडून एक अत्यंत विस्तीर्ण असे मंदिर तयार करविले. तेथे ते सर्व गोदावरीच्या उत्तर तीरावर राहू लागले. त्या ठिकाणाभोवती कदंब, फणस, आंबे इत्यादि पुष्कळ वृक्ष दाटलेले होते. गर्दी नसलेले, रोगरहित असे ते एकांताचे ठिकाण होते. बुद्धिमान लक्ष्मणाच्या साहाय्याने सीतेचे मनोरंजन करीत राम तेथे राहिला. हा जणू दुसरा देवलोकच आहे असे रामाला वाटून राम आनंदाने तेथे राहिला. लक्ष्मण दररोज कंद, मुळे, फळे आणून देत असे. रामसेवेत तो तत्पर असे. धनुष्यबाण हाती घेऊन तो रात्री सर्वत्र लक्ष ठेवून जागरण करीत असे. गोदावरीच्या तीरावर ते तिघेही स्नान करीत असत. कोठे जायचे असल्यास राम आणि लक्ष्मणाच्या मधे सीता चालत असे. संतुष्ट मनाने दररोज पाणी आणून लक्ष्मण प्रेमपूर्वक सेवा करीत असे.
एकदा राम एकांतात बसला असता लक्ष्मण म्हणाला, ‘‘भगवन्! कमलनयन रामा, मोक्षप्राप्तीचे निश्चित साधन कोणते ते तुझ्याकडून ऐकावे अशी माझी इच्छा आहे. तू ते मला संक्षेपाने सांग. ज्ञान म्हणजे काय, विज्ञान अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय? तसेच त्या ज्ञानाचे पोषक जे भक्तिवैराग्य इ. साधन त्याबद्दलही हे रघुश्रेष्ठा, मला सांग. हे सांगणारा या पृथ्वीतलावर दुसरा वक्ता नाही.’’
त्यावर श्रीराम म्हणाले, ‘‘वत्सा! ऐक. गुह्यापेक्षाही अधिक गुह्य असे ज्ञान तुला सांगतो. ते ज्ञान झाले म्हणजे काल्पनिक भ्रम लगेचच नष्ट होतो. सर्वप्रथम तुला मायेचे स्वरुप सांगतो. त्यानंतर ज्ञानाचे साधन, नंतर ज्ञान, नंतर विज्ञान अपरोक्ष ज्ञान आणि नंतर ज्ञेय असा जो परमात्मा त्यासंबंधी सांगेन. हे जाणल्याने मनुष्यप्राणी संसारभयापासून मुक्त होतो. आत्म्याहून भिन्न अशा शरीरादिकाच्या ठिकाणी हा आत्मा अशी जी आत्मबुद्धि होते तीच माया होय. तिच्या साहाय्याने हा संसार कल्पिला जातो. हे कुलनंदना, लक्ष्मणा! मायेची निश्चित अशी दोन पुरातन रुपे आहेत. ती विक्षेप रुप व आवरण आच्छादन अशी दोन रुपे आहेत. यापैकी पहिले रुप म्हणजेच विक्षेप (पसारा). प्रकृतीपासून तर ब्रह्मदेवांपर्यंत स्थूलसूक्ष्म भेदरूप सर्व जगाची कल्पना करते. दुसरे रुप आवरण, अखिल ज्ञानरुपाला आच्छादून असते. माया केवळ परमात्म्याच्या आधारावर विश्वाची रचना करीत असते. भ्रमाने जसा दोरीवर सापाचा भास व्हावा त्याप्रमाणे हे सर्व आहे. वास्तविक हे काहीच सत्य नाही. मनुष्य जे जे काही ऐकतो, पाहतो, स्मरण करतो ते ते सर्व स्वप्नाप्रमाणे खोटे आहे. संसारवृक्षाचे मजबूत असे मूळ हा देहच होय असे म्हटले आहे. पुत्र, स्त्री इत्यादि संबंधांमुळे म्हणूनच देह हा मूळ कारण आहे. तसे नसते तर आत्म्याला त्या पुत्रादिकांचा काय संबंध आहे? पंचस्थूलभूतांचा देह, स्थूल देह, पाच सूक्ष्मभूते, अहंकार, बुद्धि, दशेंन्द्रिये, चैतन्याचे प्रतिबिंब, मन, मूल प्रकृति ह्या सर्वांना क्षेत्र असे म्हणतात. त्यालाच देह म्हणतात. या सर्वांपेक्षा जीव वेगळा आहे. तोच खरा परमात्मा होय. तो परमात्मा विकाररहित आहे. जीवाचे सत्यज्ञान होण्याची साधने सांगतो, ऐक. जीव आणि परमात्मा हे पर्यायशब्द एकार्थवाचक शब्द आहेत. या दोहोत भेदभाव नाही. त्या परमात्मास्वरुपाला प्रमाण नाही. आता त्याचे ज्ञान होण्याचे उपाय ऐक. दंभ आणि हिंसा ह्यांचा त्याग, दुसऱ्यांनी केलेली निंदा सहन करणे, सर्वत्र सरळपणाने वागणे, मन, वाणी, शरीर यांच्या साहाय्याने उत्तम भक्ति करून सद्गुरुंची सेवा करणे, शारीरिक, मानसिक शुद्धि, सदाचरणात राहाणे, मन, वाणी आणि शरीर ह्यांचा निग्रह, विषयांची इच्छा न करणे, अहंकारबुद्धिचा त्याग करणे, जन्मजरादिकांचा विचार, संसाराबद्दल अनासक्ति, पुत्र-स्त्री-धन याबद्दल अप्रीती, इष्ट किंवा अनिष्ट परिस्थितीत चित्ताची समता राखणे, सर्वांतर्यामी अशा रामाच्या ठिकाणी अनन्यभक्ति, जनसमुदायरहित पवित्र स्थानी राहाणे, प्राकृत जनसमाजाशी प्रेमसंबंध न ठेवणे, आत्मज्ञान मिळविण्याचा सतत प्रयत्न करणे, या सर्व गोष्टींनी ज्ञान प्राप्त होते. या विरुद्ध आचरण केल्यास विपरीत परिणाम म्हणजे अज्ञान प्राप्त होते. मी चिदात्मा बुद्धि, प्राण, मन, देह, अहंकार यापेक्षा निराळा आहे, नित्यशुद्ध, ज्ञानरूप आहे असे ज्यामुळे मनुष्य जाणतो त्यालाच ज्ञान मी निश्चयने समजतो. जेव्हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो तेव्हा ते विज्ञान अपरोक्ष ज्ञान होय. आत्मा सर्वत्र पूर्ण ज्ञानानंदरुप आहे. तो अव्यय, विकाररहित आहे. त्याच्या ठिकाणी बुद्ध्यादिकांचे राग-द्वेष इ. धर्म नाही. तो परिणामादि, रुपांतररहित आहे. तो स्वतःच्या प्रकाशाने देहादिकांना प्रकाशित करतो. त्याच्या स्वरूपाला कशाचेही आवरण नाही. तो एकरूप अद्वितीय आहे. तो सत्य ज्ञान, अनंत इत्यादि लक्षणांनी युक्त आहे. तो कोठेही आसक्त होत नाही. तो स्वयंप्रकाश आहे. सर्वद्रष्टा आहे. अपरोक्ष ज्ञानाने तो जाळला जातो. गुरुकडून शास्त्रोपदेश, महावाक्योपदेश झाल्यानंतर जीवात्मा आणि शिवात्मा यांचे ऐक्यज्ञान होते. तेव्हा कुठे मूळ अशी अविद्या परमात्म्याच्या स्वरूपी लीन होते. ह्या अवस्थेलाच मुक्ति म्हणतात. हा आत्मज्ञानप्राप्तीचा उपाय आहे. रघुनंदना लक्ष्मणा, परमात्मा जो मी, त्या माझे मोक्षावस्थेचे स्वरूपज्ञान, विज्ञान आणि वैराग्य ह्यासह मी सर्व तुला सांगितले आहे. परंतु जे माझ्या भक्तिच्या ठिकाणी विन्मुख असतात त्यांना ह्या स्वरूपाची प्राप्ती दुर्लभ आहे, असे मी समजतो. डोळे असूनही रात्री मनुष्याला नीट दिसत नाही. पण दिव्याच्या प्रकाशात त्याला सर्व दिसू लागते. त्याप्रमाणे माझी भक्ति ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांनाच आत्मस्वरूप स्पष्टपणे समजते. तेव्हा आता माझी भक्ति कशी प्राप्त होईल हे थोडक्यात सांगतो. लक्षपूर्वक ऐक. माझ्या भक्तांची संगति, माझी आणि भक्तांची निरंतर सेवा, एकादशी व्रत वगैरे नियम, जयंत्यादि उत्सवांची आवड, माझ्या कथांचे श्रवण-पठण-कीर्तन यांची आवड, माझ्या पूजेत दक्षता घेणे, माझ्या नामाचा सतत जप करणे ही सर्व साधने होत. अशारितीने माझ्या ठिकाणी जे सतत आसक्त होतात त्यांची माझ्या ठिकाणी निरंतर निश्चल भक्ति जडते. एकदा अशी भक्ति जडली की मग मिळविण्यासारखे काहीच शिल्लक रहात नाही. माझ्या भक्तांना ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य हे तत्काळ प्राप्त होतात. त्यामुळे त्यांना मुक्ति मिळते. तुझ्या प्रश्नाप्रमाणे मी हे सर्व काही सांगितले आहे. ह्या ठिकाणी मन ठेवून जो रहात नाही त्याला हे ज्ञान सांगण्याचा कधीही प्रयत्न करू नये. परंतु जो कोणी माझा भक्त असेल, त्याला प्रयत्नपूर्वक बोलावून हे ज्ञान द्यावे. श्रद्धेने आणि भक्तियुक्त होऊन जो याचे नित्य पठण करील तो अज्ञानपटलाने उत्पन्न झालेल्या अंधःकाराचा नाश करून मुक्त होईल. माझा भक्तियोग करून माझ्या ठिकाणी जे आसक्त होतात त्यांचे मन शांत आणि निर्मळ असते. त्यांना माझ्या सेवेची आवड असते. शुद्ध आत्मज्ञानप्राप्तीची त्यांना सदैव इच्छा असते. असा भक्तांच्या सहवासात जो रहातो, ज्ञान मिळविण्याच्या कार्यात उद्युक्त होतो, साधुंच्या सेवेशिवाय दुसऱ्या कुठेही त्याच्या मनाची प्रवृत्ति नसते अशा त्या भक्ताच्या हातातच मोक्ष असतो आणि त्या भक्तालाच मी दर्शन देतो.’’
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अरण्यकाण्डे चतुर्थः सर्गः।