श्री महादेव म्हणाले,
‘‘मायावी, इच्छारुप धारण करणाऱ्या राक्षसाचा, मारीचाचा वध करून राम आपल्या आश्रमाकडे येऊ लागला, तोच त्याला दुरून लक्ष्मण येताना दिसला. तो अगदी दीन झाला असून त्याचा चेहरा सुकून गेला होता. त्याला पाहून त्या बुद्धिमान रामाने विचार केला की मी माया सीता निर्माण केली आहे ही गोष्ट लक्ष्मणाला माहीत नाही. मला सर्व समजत आहे. परंतु लक्ष्मणाला दाखविण्यासाठी प्राकृत मनुष्याप्रमाणे शोक करून दाखवावा. जर मी वैराग्य धारण करून माझ्या मंदिरात स्वस्थ बसून राहिलो तर कोट्यवधी राक्षसांच्या वधाची गोष्ट कशी बरे घडून येईल? कामिजनांप्रमाणे दुःखसंतप्त होऊन तिच्यासाठी शोक करू लागलो तरच क्रमाक्रमाने सीतेचा शोध करीत राक्षसांच्या नगरीला, लंकेला माझे जाणे शक्य होईल. असे जर झाले तर किंचितही आळस न करता सकुटुंब मी रावणाचा वध करीन. माझ्या सांगण्यानुसार अग्नीत गुप्त राहिलेल्या सीतेला घेऊन मी अयोध्येला जाईन. ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेनुसार मी मनुष्यरूप धारण केले आहे. या मनुष्यरूपात मी काही काळ पृथ्वीवर राहणार आहे. त्यामुळे माझे मायामनुष्यावताराचे चरित्र जे कोणी ऐकतील त्यांना भक्तिमार्गाने जात असता सहजपणे मुक्ति प्राप्त होईल’, असा मनाशी निश्चय करून राम लक्ष्मणाला पाहून त्याला म्हणाला की, ‘‘माझ्या प्रिय सीतेला सोडून तू का म्हणून आलास? ती जानकी बहुतेक राक्षसांनी नेली असणार किंवा भक्षण केली असेल.’’ त्यावर लक्ष्मणाने हात जोडून रडत रडत सीतेच्या तोंडचे अपशब्द रामाला सांगितले. तो म्हणाला, ‘‘हा लक्ष्मणा, असे राक्षसाच्या तोंडचे शब्द तिने ऐकले. आवाज अगदी तुझ्यासारखाच होता. तो ऐकून ‘त्वरेने जा’ म्हणून ती मला रडत रडत बोलली. तेव्हा मी तिला म्हणालो, ‘सुहास्यवदने देवी! हे शब्द राक्षसाचे आहेत. रामाचे नाहीत. तू स्वस्थ राहा’ अशाप्रकारे मी त्या साध्वीचे सांत्त्वन केले. तरीसुद्धा ती मला जे अपशब्द बोलली ते तुला सांगण्यासारखे नाहीत. म्हणून कान झाकून मी तुला पाहण्यासाठी निघालो.’’
राम लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘तू जे केलेस ते अनुचितच आहे. स्त्रीभाषण खरे मानून तू त्या शुभाननेला टाकून आलास तेव्हा आता राक्षसाने तिला नेली असेल किंवा भक्षण केली असेल यात काही संशय नाही.’’ अशाप्रकारे चिंताग्रस्त मनाने राम आपल्या आश्रमात परत आला. आश्रमात सीता दिसली नाही म्हणून दुःखित होऊन त्याने विलाप केला, ‘‘हे प्रिये! तू कोठे गेलीस? नेहमीप्रमाणे आज तू आश्रमात का नाहीस? किंवा मला मोह पाडण्यासाठी कोठे लपून तर बसली नाहीस ना?’’ असे म्हणून त्याने संपूर्ण वनात शोध केला. तरी पण त्याला ती कोठेच दिसली नाही. तेव्हा वनदेवतांना, ‘‘माझी सीता कोठे आहे?’’ असे विचारले. पशू, पक्षी, वृक्ष या सर्वांना ‘‘माझी सीता कोठे आहे ते सांगा?’’ असे विचारले. अशाप्रकारे त्या सर्वज्ञाने वनात सर्वत्र शोध केला. तरी त्याला सीता कुठेच दिसली नाही. राम स्वतः आनंदरूप असूनही त्याने सीतेसाठी विलाप केला. तो अचल गमनागमनरहित असून तो धावू लागला. तो राम ममत्वरहित आणि अहंकाररहित नित्य आनंदस्वरूप असूनही अतिशय दुःखी होऊन ‘माझी पत्नी माझी सीता’ असा विलाप करू लागला. अशाप्रकारे मायेला अनुसरून वागणारा राम, कुठेही आसक्ति न ठेवणारा राम, अज्ञानी लोकांना मात्र तो आसक्त असल्याप्रमाणे वाटतो. तत्त्ववेत्त्या लोकांना मात्र तसा वाटत नाही.
लक्ष्मणासह त्याने ते सर्व वन धुंडून काढले. परंतु एक भग्न, तुटका असा रथ, एक छत्री, एक धनुष्य आणि जमिनीवर पडलेले जू एवढ्याच वस्तू त्याला दिसल्या. ते पाहून राम लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘लक्ष्मणा, पहा सीतेला कोणी राक्षस घेऊन जात असता त्याला जिंकून आणखी कोणी सीतेला नेले असावे.’’ नंतर काही मार्ग चालून गेल्यावर रक्तबंबाळ झालेले पर्वतासारखे एक प्रचंड शरीर त्याला दिसले. ते पाहून राम म्हणाला, ‘‘ह्यानेच त्या रुपसंपन्न जानकीला खाऊन टाकलं आहे. तृप्त होऊन हा येथे एकांतात लोळत पडला आहे. पहा! आता मी ह्या राक्षसाचा वध करतो. हे रघुनंदन लक्ष्मणा! माझे धनुष्य आणि बाण लवकर घेऊन ये.’’ रामाचे हे भाषण ऐकून जटायु अत्यंत भयभीत होऊन म्हणाला, ‘‘मला मारू नकोस. तुझे कल्याण असो. मी माझ्याच कर्माने मरण पावतो आहे. मी जटायु असून तुझ्या स्त्रीचे हरण करणाऱ्या रावणावर मी धावून गेलो होतो. हे शत्रूनाशना! माझे त्याच्याशी युद्ध झाले. त्याचे घोडे, रथ, धनुष्य हे सर्व मी तोडून-ङ्गोडून टाकले. परंतु शेवटी त्यानेच माझा घात केला. हे जगन्नाथा! मी जखमी होऊन पडलो. आता मी प्राण सोडणार. माझ्याकडे एकदा पहा.’’
ते ऐकून त्या कंठाशी प्राण आलेल्या दीन जटायुकडे रामाने पाहिले. दुःखाश्रूंनी रामाचे डोळे भरून आले. आपल्या हातांनी रामाने त्याला कुरवाळले आणि म्हणाला, ‘‘हे जटायु! माझी सुमुखी भार्या कोणी हरण करून नेली ते मला पहिले तू सांग. तू माझ्या कामासाठी जखमी होऊन पडला आहेस म्हणून तू माझा प्रिय बंधू आहेस.’’ जटायुच्या तोंडातून सारखे रक्त वाहात होते. तो अत्यंत खोल आवाजात म्हणाला, ‘‘हे रामा! रावण नावाचा एक उग्र पराक्रमी राक्षस आहे. तो जनककन्या सीतेला घेऊन दक्षिण दिशेने गेला. यापुढे माझ्यात बोलण्याचे त्राण उरले नाही. मी आता तुझ्यासमोर प्राणत्याग करतो. अनघा रामा! देहत्यागाच्या वेळी मला तुझे दर्शन झाले. माझे अहोभाग्यच होय. तू प्रत्यक्ष विष्णु परमात्मा आहेस. मायेने मनुष्यरूप धारण केले आहेस. हे रघुश्रेष्ठा! अंतःकाळी तुझे दर्शन झाल्यामुळे मी मुक्त झालो आहे. हे रामा! पुनः एकदा तुझे हात माझ्या शरीरावरून ङ्गिरव. म्हणजे मी तुझ्या पदाला प्राप्त जाईन.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून रामाने संतोषपूर्वक त्याच्या अंगाला हाताने स्पर्श केला. त्यानंतर जटायूने प्राण सोडून तो जमिनीवर पडला.
त्या जटायुबद्दल रामाने आपल्या बंधुप्रमाणे शोक केला. त्याचे डोळे दुःखाश्रूंनी भरून आले. त्याने लक्ष्मणाकडून लाकडे आणवून त्याचा दहनसंस्कार केला. नंतर लक्ष्मणासह दुःखी अंतःकरणाने त्याने स्नान केले. रामाने एक मृग मारून त्याचे मांस हिरव्यागार गवताच्या कुरणावर अनेक ठिकाणी फेकले, जेणेकरून सर्व पक्षी ते मांस खातील आणि जटायुला तृप्ती मिळेल. त्यानंतर राम म्हणाला, ‘‘जटायु, तू माझ्या पदाला जा. सर्व लोकांसमोर तुला माझी सरुपता मुक्ति मिळो.’’ त्यानंतर जटायुला दिव्य स्वरूप प्राप्त झाले आणि तो सूर्यासारख्या तेजस्वी विमानात आरूढ झाला. शंख, चक्र, गदा, पद्म, किरीटादि सुंदर भूषणांनी आणि आपल्या अंगकांतीने त्याने सर्वत्र शोभा आणली होती. त्याची कांती निर्मल दिसत होती. त्याने पितांबर परिधान केला असून तशाच स्वरूपाचे विष्णुचे चार परिचारक (पार्षद) त्याची पूजा करीत होते.
अशावेळी जटायुने रामाला उद्देशून हात जोडून स्तुती करण्यास सुरुवात केली. जटायु म्हणाला, ‘‘ज्याचे गुण असंख्य आहेत, जो प्रमेयातीत आहे, जो सर्वांचे आदिकारण आहे, जगाचे पालन, संहार इत्यादि कार्याचा जो हेतू आहे, ज्याचे रूप शांतीने सुशोभित आहे, अशा त्या परमात्मारूपी रामचंद्राला मी नेहमी प्रणाम करतो. जो अत्यंत सुखमय असून लक्ष्मी आपले प्रेमकटाक्ष ज्यावर टाकीत असते, ज्याने इंद्र, ब्रह्मदेव इत्यादिकांची दुःखे दूर केली आहेत, जो भक्तांना वर देण्यासाठी सदैव तत्पर असतो, ज्याच्या हातात उत्तम तऱ्हेचे धनुष्यबाण असतात अशा त्या नरश्रेष्ठाला, रामचंद्राला मी रात्रंदिवस नमस्कार करतो. ज्याचे रूप त्रिभुवनात अत्यंत सुंदर आहे, जो सर्वांची स्तुति करण्यास योग्य आहे, जो शेकडो सूर्यांसारखा तेजस्वी आहे, जो भक्तांचे काम पूर्ण करतो, जो निरंतर सर्वांचा आश्रयदाता आहे, प्रेमळ अंतःकरणात ज्याचा वास आहे अशा त्या रघुनंदनाला मी शरण जातो. ज्याचे नाव संसाररुपी अरण्याला जाळून टाकणारा वणवा आहे, जो शंकर इ. देवतांचे दैवत आहे, जो दयाळू आहे, हजारो कोटी मोठमोठ्या दैत्यांचा ज्याने नाश केला आहे, ज्याची अंगकांती सूर्यकन्या यमुना हिच्यासारखी कृष्णवर्ण आहे अशा त्या हरिला, रघुवीराला मी वंदन करतो. संसारात नित्य आसक्त असणाऱ्या लोकांपासून जो सर्वदा दूर असतो, संसारापासून पराङ्मुख झालेल्यांनाच जो भेट देतो, ज्याचे चरण भवसागर तरून जाण्याची उत्तम नौकाच आहे, अशा त्या रघुनंदनाला मी शरण येतो. जो शंकर, पार्वती यांच्या अंतःकरणात वास करतो, जो कृष्णावतारात गोवर्धन नावाच्या मोठ्या पर्वताला धारण करतो, ज्याची चरित्रे अत्यंत सुंदर, मनोहर आहेत, मोठमोठे देव आणि दैत्य ज्याची चरणसेवा करतात, जो देवांना वर देतो अशा त्या रघुनायकाला मी शरण जातो. परधन आणि परस्त्री ज्यांनी वर्ज्य केली आहे, दुसऱ्यांच्या गुणांनी आणि ऐश्वर्याने ज्याचे अंतःकरण संतुष्ट होते, ज्याचे मन नेहमी परहित करण्याच्या कामी तत्पर असते अशा लोकांना जो सुसेव्य आहे अशा त्या कमलनयन रघुश्रेष्ठाला रामाला मी शरण जातो. हास्याच्या योगाने ज्याचे मुखकमल सुंदर आहे आणि विकसित झाले आहे, ज्याची प्राप्ती अत्यंत सुलभमार्गाने होते, ज्याची स्वरूपकांती इंद्रनील मण्याप्रमाणे आहे, शुभ्रकमलाप्रमाणे सुंदर नेत्रांनी ज्याला शोभा आली आहे अशा शंकराच्या गुरुचाही, ब्रह्मदेवाचाही गुरु जो विष्णु रामचंद्र त्याला मी शरण जातो. पाण्याने भरलेल्या भांड्यात अनेक रूपांनी जसा सूर्य भासतो, त्याप्रमाणे तीन गुणांनी युक्त होऊन तू ब्रह्मा, विष्णु, शंकर अशा रुपभेदांनी ह्या जगात शोभतोस. देवेंद्राच्या स्तुतीसही तू पात्र होतोस, त्या तुझे, रामचंद्राचे मी स्तवन करतो. शेकडो मदनाप्रमाणे ज्याची अंगकांति सुंदर आहे, शतपथ ब्राह्मणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे प्रेमभावनेनेच ज्याची प्राप्ती होणे शक्य आहे, मोठमोठ्या योगीजनांच्या हृदयात जो सदैव प्रकाशत असतो अशा लोकांचे दुःख हरण करणाऱ्या प्रभु रामचंद्राला मी शरण जातो.’’
अशाप्रकारे जटायु स्तुती करत असता प्रभु राम प्रसन्न झाले. त्याला म्हणाले, ‘‘तुझे कल्याण असो. तू माझ्या विष्णुच्या पदाला प्राप्त होशील. हे स्तोत्र जो कोणी ऐकेल, लिहिल किंवा नियमाने पठण करील तो माझ्या सरूपता मुक्तीला प्राप्त होईल. त्याला मरणसमयी माझी स्मृती होईल.’’ हे श्रीरामाचे भाषण आनंदित होऊन जटायुने ऐकले. त्यानंतर रघुनंदन रामाच्या सरूपतेला पोचून ब्रह्मदेवालाही पूज्य अशा अत्युत्तम पदाला तो प्राप्त झाला.
इति श्रीमद्ध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अरण्यकाण्डे अष्टमः सर्गः।