श्री महादेव म्हणाले,
‘‘हे पार्वती, एकदा दशरथ राजा असाच एकांतात बसला होता. त्याने त्याचे कुलगुरु वसिष्ठमुनिंना बोलावून म्हटले, मुनिवर्य, ‘‘सर्व नागरिक, व्यापारी आणि विशेषत: वेदज्ञ वृद्ध, अनुभवी मंत्री हे सर्वजण रामाची वारंवार स्तुति करीत असतात. सर्वगुणसंपन्न, कमलनयन असा माझा ज्येष्ठ पुत्र रामाला राज्याभिषेक करतो. आता मी वृद्ध झालो आहे. भरत, शत्रुघ्न मामाकडे भेटण्यास गेले आहेत. उद्या सकाळी रामाला राज्याभिषेक करावा असा माझा विचार आहे, आपण ह्या माझ्या विचाराला संमती द्यावी. राज्याभिषेकासाठी लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था करावी. रामाकडे जाऊन त्याला कळवावे. विविध रंगाच्या पताका सर्व बाजुंनी उभाराव्या, सुवर्णमय मोती जडविलेल्या चित्रविचित्र विविध तोरणे सर्वत्र बांधावीत.’’
राजा दशरथाने सुमंत्राला बोलावून सांगितले की, ‘‘वसिष्ठमुनि जशी आज्ञा करतील ते ते सर्व साहित्य त्यांना आणून द्यावे. उद्या सकाळीच मी रघुनंदन रामाला युवराजपदाचा अभिषेक करणार आहे.’’ ‘‘ठीक आहे’’ असे आनंदाने म्हणून त्या सुमंत्राने ‘मी काय करावे?’ असे वसिष्ठांना विचारले.
त्यावर ते महातेजस्वी, ज्ञानवंतामध्ये श्रेष्ठ असे वसिष्ठमुनी म्हणाले, ‘‘उद्या सकाळीच मधल्या दालनामध्ये, अंगावर सोन्याचे दागिने घातलेल्या अशा सोळा कन्यका उभ्या कराव्या. शिवाय जो ऐरावताच्या कुळात जन्मलेला असून चार दातांचा आहे असा सोन्याच्या आणि रत्नाच्या अलंकारांनी सजविलेला एक हत्ती तेथे घेऊन या. कलशांची स्थापना करावी, नवीन अशा तीन वाघांची कातडी आणून द्यावी. ज्याच्या दांडीला रत्न जडविले आहे असे मोत्यांनी सुशोभित पांढरे छत्र असावे. उत्तम फुले, चांगली वस्त्रे, इतर काही मौल्यवान अलंकार आणून ठेवा. ज्यांचा सत्कार केला आहे असे मुनिजन हातात दर्भ घेऊन त्या ठिकाणी थांबलेले असावे. नर्तिका, मुख्य वारांगना, गायक, बासरी वादक, इतर वाद्ये वाजविणारे वादक, कुशल वाजंत्री ह्या सर्वांनी राजवाड्याच्या अंगणात गायन, वादन करावे. सर्व चतुरंग सैन्य शस्त्रे घेऊन उभे राहू देत. विविध देवालयात देवतांच्या पूजा सुरु असाव्यात. ठिकठिकाणचे राजे नानाप्रकारचे नजराणे घेऊन शीघ्र येऊ देत.’’
अशाप्रकारे आज्ञा बुद्धिवान वसिष्ठमुनींनी सुमंत्र मंत्र्याला दिल्या आणि स्वत: ते रामाच्या शोभिवंत अशा मंदिराकडे जाण्यास निघाले. वसिष्ठमुनी रथात बसून तीन चौक ओलांडून गेल्यानंतर खाली उतरले आणि मंदिरात रामाकडे गेले. गुरुवर्य वसिष्ठांचे आगमन झाल्याचे कळताच राम हात जोडून तत्काळ त्यांना सामोरा गेला. भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार केला. तेवढ्यातच सीतेने सुवर्णपात्रातून पाणी आणले. रामाने वसिष्ठगुरुंना रत्नजडित आसनावर बसविले. त्यांचे पादप्रक्षालन केले आणि ते प्रक्षालोदक सीतेच्या आणि स्वत:च्या मस्तकी धरण केले. ‘‘आज मी धन्य झालो आहे.’’ असे रामाने म्हटले असता वसिष्ठमुनि हसून म्हणाले, ‘‘अरे रामा, तुझ्या चरणाचे तीर्थ धारण करुन तो शिवशंकर धन्य झाला. माझा पिता ब्रह्मदेव चरणतीर्थ धारण करुन पापापासून मुक्त झाला. आता तू जे बोलतोस ते केवळ लोकांना उपदेश करण्यासाठीच बोलत आहे. तू प्रत्यक्ष परमात्माच येथे लक्ष्मीसह अवतार धारण केला आहेस. तू साक्षात ईश्वर आहे हे मी चांगले जाणतो. देवांचे कार्य सिद्धीस जावे आणि भक्तांची भक्ति सिद्धीस जावी म्हणून तसेच रावणवध करण्यासाठी तू अवतार घेतला आहेस हे मी जाणतो. तरी पण मी हे गुपित उघडकीस आणत नाही कारण तू हे सर्व मायेने करीत आहेस. म्हणून मी सुद्धा तसेच आचरण करीन. जसा माझा शिष्य झाला आहे तसा मी तुझा गुरु आहे. परंतु हे देवा, तू तर गुरुंचा गुरु आणि पितरांचा पितामह आहेस. तू सर्वांतर्यामी असून तूच जगरहाटी चालविणारा आहेस. तू इंद्रियांना न दिसणारा अगोचर, न समजणारा तसेच शुद्ध सत्वगुणांनी युक्त असे शरीर तू धारण केले आहेस. जन्म घेणे ही गोष्ट तुझ्या स्वाधीन आहे. योगमायेमुळे तू ह्या लोकांना मनुष्यासारखा नव्हे तर मनुष्यच भासतो. ईश्वाकु कुळात परमात्मा राम म्हणून जन्म घेणार आहे असे ब्रह्मदेवाने पूर्वी सांगितलेले मला आधीच समजले होते. हे रामा! म्हणून तुझ्याशी संबंध यावा, तुझ्या सहवासात राहण्याच्या इच्छेने तुझा गुरु व्हावे अशी आशा बाळगून मी हे निंद्य असे पौरोहित्यही केले आहे. पौरोहित्य करुन उपजीविका केल्याने जीवनाला दोष लागतो हे ही मला ठाऊक आहे.
हे रघुनंदना, माझे हे मनोरथ आज पूर्ण झाले आहे. सर्व लोकांना मोहून टाकणारी एकटी माया तुझ्या स्वाधीन आहे. हे रघुश्रेष्ठा, ती माया मला कधीच मोह घालणार नाही एवढे कर. गुरुंच्या उपकाराची फेड करावी अशी तुझी इच्छा असेल तर एवढे मात्र निश्चित कर. प्रसंगवशात मी हे सर्व तुला गुपित सांगितले. वास्तविक दशरथ राजानेच मला तुझ्याकडे पाठविले आहे. हे राघवा, राजा दशरथ तुला युवराजपदाचा अभिषेक करणार आहे. हे तुला सांगण्यासाठी आलो आहे. म्हणून तू आज सीतेसह यथाविधी उपवास कर. पवित्र होऊन, जितेंद्रिय होऊन, भूमीवर शयन कर. मी आता राजाकडे जातो. तू सुद्धा उद्या पहाटे राजाकडे जाशील.’’
असे सांगून गुरु वसिष्ठ रथात बसून घाईघाईने निघून गेले. रामसुद्धा लक्ष्मणाकडे बघून हसला आणि म्हणाला, ‘‘लक्ष्मणा, उद्या मला यौवराज्यभिषेक होणार आहे. पण ह्या सर्व गोष्टी केवळ निमित्तमात्र आहेत. वास्तविक तूच ह्या सर्वांचा कर्ता आणि भोक्ता आहेस. तू तर माझ्या बहि:श्वास आहेस, याबद्दल मला प्रश्न विचारण्याचे कारण नाही.’’ यानंतर रामाने मुनि वसिष्ठांनी सांगितले त्याप्रमाणे सर्व केले.
इकडे वसिष्ठांनीही राजाकडे जाऊन त्यांनी जे जे काही केले ते ते सर्व राजाला सांगितले. त्यानंतर राजाने रामाच्या अभिषेकासंबंधी सर्व निवेदन केले. त्यावेळी ही गोष्ट नगरीतील कोण्या पुरुषाने ऐकून ती वार्ता राजमाता कौसल्या आणि सुमित्रा यांना सांगितली. त्या दोघींनाही अतिशय आनंद झाला. त्यांनी ती वार्ता सांगणाऱ्याला उत्तम प्रतीचा हार बक्षिस दिला. रामावर अतिशय प्रेम करणाऱ्या मातेने संतुष्ट मनाने, रामाचे कार्य सिद्धीस जावे म्हणून लक्ष्मीदेवीची पूजा केली. राजा दशरथ जे बोलेल ते करणार आहे. ते सत्यवादी आहेत. परंतु कैकेयीच्या आधीन असल्यामुळे काय करतील ह्या विचारांनी तिचे चित्त व्याकूळ झाले, म्हणून तिने दुर्गादेवीची आराधना केली.
नेमके त्याचवेळेला देवांनी वाग्देवतेला, सरस्वतीला प्रेरणा केली आणि सांगितले की, ‘‘हे देवी! तू आता प्रयत्नपूर्वक भूलोकात अयोध्येला जा आणि ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे रामाच्या युवराज्यभिषेकात विघ्न आणण्याचा प्रयत्न कर. सर्वप्रथम मंथरा जी कैकेयीची दासी आहे तिच्या शरीरात प्रवेश करुन नंतर कैकेयीच्याही शरीरात प्रवेश कर. हे कल्याणकारी देवते! तेथे विघ्न निर्माण करण्याचे कार्य झाले की पुन्हा स्वर्गलोकात परत ये.’’ ‘‘ठीक आहे’’ असे म्हणून त्या सरस्वतीने प्रथम मंथरेच्या शरीरात प्रवेश केला. ती मंथरा, कुबडी, तीन ठिकाणी वाकडी असलेली राजप्रासादाच्या गच्चीवर चढली. तेथून तिने सर्व पाहिले. अयोध्या नगरी चोहोबाजूंनी शृंगारलेली तिला दिसली. सर्वत्र पताका, तोरणे लावून सुशोभित केलेली, सर्व प्रकारचे उत्सव चालले आहेत. हे सर्व बघून तिला आश्चर्य वाटले. ती तशीच पुन्हा खाली उतरुन तिच्या मातेला विचारु लागली, ‘‘माते, हे सारे नगर का बरे शृंगारले आहे? कौसल्या तर अतिशय आनंदात नाना प्रकारचे उत्सव करण्यात गुंग आहे. ती प्रमुख ब्राह्मणांना विविध वस्त्रे देत आहे.’’ मातेने मंथरेला सांगितले की, ‘‘रामचंद्राला राज्याभिषेक करण्याचा उद्या समारंभ होणार आहे. त्यासाठी आज सर्व नगरी सुशोभित केली गेली आहे.’’ हे ऐकताच ती मंथरा ताबडतोड कैकेयीकडे जाऊन म्हणाली, ‘‘हे हतभागिनी! तू कशाला निजलीस आहे? मूर्ख स्त्रिये, तुझ्यावर फार मोठे संकट येत आहे.’’ कैकेयी मात्र विशाल अशा मंचकावर स्वस्थचित्ताने पहुडली होती. ‘‘हे कैकेयी, तुला तुझ्या सौंदर्याचा फार अभिमान असल्यामुळे तू गर्विष्ठ झाली आहेस. पण तुझ्यावर आलेले संकट तुला कुठे माहीत आहे? दशरथ राजाची रामावर कृपा आहे म्हणून उद्या त्याला राज्याभिषेक होईल.’’ हे मंथरेचे भाषण ऐकून ती कैकेयी अगदी ताडकन उठली. कैकेयी दिव्य, रत्नजडीत सोन्याचा पैजणांचा जोड तिला देऊन म्हणाली, ‘‘एवढी आनंदाची गोष्ट घडत असता तू मला संकट आले म्हणून का सांगते? अग, राम तर मला भरतापेक्षाही अधिक प्रिय आहे, तो प्रियवंद राम मला आणि कौसल्या मातेला सारख्या दृष्टीने पाहून माझी नेहमी सेवा करीत असतो. हे मूर्ख स्त्रिये, रामापासून तुला कोणते भय प्राप्त झाले आहे ते मला प्रथम सांग.’’
ते कैकेयीचे बोलणे ऐकून विशिष्ट वैर भावनेने प्रभावित झालेली मंथरा अत्यंत खिन्न झाली आणि म्हणाली, ‘‘देवी, माझे बोलणे नीट ऐकून घ्या. खरोखर तुझ्यावर मोठे संकट आले आहे. राजा दशरथ तुला संतुष्ट ठेवण्यासाठी नेहमी गोड बोलतो. तो कामुक आणि मिथ्या वागणारा आहे. इकडे गोड बोलून तुला संतुष्ट करतो. तिकडे मात्र राजमातेचे अत्यंत मोठे चांगले कार्य करतो. मनामध्ये असाच विचार करुन त्याने तुझा पुत्र भरताला मामाकडे पाठविले. शत्रुघ्न सुद्धा त्याच्याबरोबर गेला. आता सुमित्रेचे मात्र बरे होईल यात शंकाच नाही. लक्ष्मण हा सदैव रामाच्या मागेच असतो. त्यालाही राज्यसुख अनुभवता येईल. भरत मात्र रामापुढे सेवा करणाऱ्या दासाप्रमाणे राहील किंवा त्याला नगराबाहेरही काढले जाईल किंवा त्याला लवकरच प्राणत्याग करावा लागेल. तुला मात्र एखाद्या दासीप्रमाणे कौसल्येची सेवा करावी लागेल. अशा प्रकारे सवतीकडून पराभूत होण्यापेक्षा मरण परवडले. म्हणून तू ताबडतोब सावध हो. भरताला राज्याभिषेक आणि रामाला चौदा वर्षे वनवास घडेल असे काही तरी कर. हे कैकेयी, असे जर केलेस तरच तुझा भरत निर्भय होईल. यासाठी मी पूर्वीच ठरवून ठेवलेली उपाययोजना कर. तो उपाय तुला सांगते. पूर्वी देव आणि असुरांचे युद्ध झाले तेव्हा इंद्राने स्वत: दशरथ राजाला मदतीसाठी बोलाविले होते. तेव्हा राजाने तुलाही सोबत नेले होते. युद्ध सुरु असताना राजाच्या रथाच्या आसांचा खिळा तुटून पडला. महाराजांच्या लक्षात ही गोष्ट आली नाही. कारण तू मोठ्या धैर्याने प्रयत्नपूर्वक त्या खिळ्याचे छिद्र स्वत:च्या हाताने अडवून बाजू सांभाळलीस. केवळ महाराजांचे प्राण वाचविणे ह्या इच्छेने तू केलेस. नंतर असुरांना ठार मारल्यानंतर राजाची दृष्टी तुझ्याकडे वळली तेव्हा ते बघून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. आणि आनंदाने तुला आलिंगन दिले. तुला वर देण्यासाठी सिद्ध झाले. महाराज स्वत:च म्हणाले की, ‘‘तू तुझ्या मनातील दोन वर माग.’’ तेव्हा तू म्हणालीस, ‘‘आपण मला दोन वर दिलेले आहेत ते ठेव म्हणून चिरकाल तुमच्याकडेच असू द्या. जेव्हा प्रसंग येईल तेव्हा ते दोन वर आपण मला द्यावे.’’ असे तू म्हटले असता ‘ठीक आहे’, असे तुला सांगून महाराज स्वत: म्हणाले, ‘तू आता मंदिरात जा.’ हे सर्व मी तुझ्याकडूनच ऐकले आहे. ते पूर्वीचे सर्व आता मला आठवते आहे. तू आता क्रोधावतार धारण करुन क्रोधागारात जाऊन बैस. अंगावरील दागिने इतस्तत: फेकून मौन धारण करुन भूमिवर निजून राहा. जोपर्यंत राजा तुझ्या इच्छेप्रमाणे गोष्ट घडवून आणीत नाही तोपर्यंत तू असे वागावे.’’
कैकेयीने मंथरेचे कौतुक केले ‘‘तुला एवढी बुद्धी कशी सुचली? तू जरी शरीराने वाकडी आहेस परंतु सुंदर आणि बुद्धिमान आहेस. माझा भरत जर राजा होईल तर मी तुला शंभर गावे देईन. तू मला माझ्या प्राणासारखी प्रिय आहेस.’’ अशाप्रकारे मंथरेला सांगून राणी कैकेयी क्रोधागारात जमिनीवर निजून राहिली. अंगावरील आभूषणे काढून टाकून, मलिन वस्त्र परिधान करुन जमिनीवर पडून राहिली. मंथरेला म्हणाली, ‘‘राम वनात जाईपर्यंत मी अशीच पडून राहीन किंवा माझे प्राण देईन’’, ‘‘तू असेच निश्चयाने आचरण कर. यातच तुझे कल्याण आहे.’’ कैकेयी तसेच वागू लागली.
मनुष्य कितीही धैर्यवान, गुणवान, दयाळू, सदाचारी असो, नीति जाणणारा असो, गुरुसेवा परायण, ब्रह्मवेत्ता असो, त्याला जर दुष्ट पापी व्यक्तीची संगत घडली तर त्याच्या बुद्धिला भ्रष्टता येऊन हळूहळू तो दुष्टासारखाच बनतो. कैकेयीने हेच स्पष्ट केले आहे. म्हणून सदैव दुष्टाची संगती वर्ज्य करावी. दुष्ट संगतीत असणारा मनुष्य हा राजकन्येप्रमाणे, कैकेयीप्रमाणे स्वार्थाला मुकतो.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अयोध्याकाण्डे द्वितीयः सर्गः।