श्री महादेव म्हणाले,
‘‘नंतर दशरथ राजाने रामाच्या राज्याभिषेकासंबंधी मंत्रिजनांना आणि इतर जनांना आज्ञा देऊन, आनंदित होऊन तो घरी आला. तेथे त्याला आपली प्रिय पत्नी कैकेयी दिसली नाही. तेव्हा ‘हे असे कां बरे’, या विचाराने तो व्याकूळ झाला, दु:खी झाला. ‘यापूर्वी तिच्या मंदिरात प्रवेश करताच मला ती सुंदर हसतमुखाने सामोरी येत असे. आज का बरे आली नाही?’ असा स्वत:च्या मनाशी विचार करुन अत्यंत खिन्न झाला. त्याने दासीजनांना विचारले ‘‘तुमची स्वामिनी कोठे आहे? ती मला सामोरी का आली नाही?’’ तेव्हा दासींनी सांगितले ‘‘महाराज, त्या क्रोधागारात बसल्या आहेत. कारण आम्हाला काही माहीत नाही तेव्हा आपणच जाऊन बघावे.’’ दासींनी असे सांगताच राजा घाबरुन गेला. कैकेयीजवळ जाऊन तिला समजावू लागला. ‘‘पलंग इ. चा त्याग करुन तू जमिनीवर का बरे निजली आहेस? तू माझ्याशी का बोलत नाही? यामुळे मला खूप दु:ख होत आहे. अलंकारांचा त्याग करुन, मलिन वस्त्रे धारण करुन अशी का बरे पडली आहेस? हे सर्व कशासाठी करतेस? तुझ्या मनातील इच्छा काय ते सांग? मी अवश्य पूर्ण करीन. तुझ्या विरुद्ध कोणी अहित वा अकल्याण करु इच्छित असेल तर ते कुणीही असो मी त्याला शिक्षा करीन किंवा वधही करीन यात शंका करु नकोस. हे देवि! तुला जे काही प्रिय वाटत असेल ते मला अवश्य सांग. कितीही अवघड जरी ते असले तरी, दुर्लभ असले तरीही मी सहजसाध्य करीन. तुला तर माझे मन चांगलेच माहिती आहे. मी किती तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्या अधीन आहे हे पण तू जाणतेस. एवढे सर्व माहीत असता तू मला व्यर्थ दु:ख देण्याचे कष्ट का बरे करते आहेस. तुझ्यासाठी मी तुला प्रिय असलेल्या दरिद्री व्यक्तिला श्रीमंत करु की तुझे अहित करणाऱ्या कोण्या श्रीमंताला निर्धन करु ते सांग. कोणाचा वध करु किंवा कुणाला अभय देऊन सोडून देऊ. तुझ्यासाठी मी प्राण सुद्धा देईन. हे प्रिये, तो कमलनयन राम मला माझ्या प्राणापेक्षाही अधिक प्रिय आहे. त्याची शपथ घेऊन सांगतो तुला जे प्रिय असेल ते सांग.’’ अशाप्रकारे रामाची शपथ घेऊन राजा म्हणाला याची खात्री पटून नंतर कैकेयीने हळूहळू आपले डोळे पुसले आणि राजाला म्हणाली, ‘‘महाराज आपण जर सत्यप्रतिज्ञ असाल तर माझ्या मनातील इच्छा मी प्रगट करते, ती आपण ताबडतोब पूर्ण करावी. पूर्वी देव आणि दैत्य यांच्या युद्धामध्ये मी आपले रक्षण केले. तेव्हा आपण संतुष्ट होऊन दोन वर दिले होते. आपले आचरण पवित्र आहे. म्हणून मी ते दोन्ही वर आपल्याजवळ ठेव म्हणून ठेवले होते. त्यातील एका वराने माझ्या प्रिय पुत्राला भरताला ताबडतोब राज्याभिषेक करावा आणि दुसऱ्या वराने रामाला चौदा वर्षे वनवासात पाठवावे. त्याने मुनिवेष धारण करुन, जटा, वल्कले यांनी देह भूषवून कंद, मुळे, फळे खाऊन वनवासात रहावे. हा वनवासाचा काळ संपल्यावर स्वेच्छेने परत यावे किंवा वनातच रहावे. उद्या सकाळीच राम वनाला जावो. जर या कार्यात थोडाही विलंब झाला तर आपल्यापुढे मी प्राण देईन. आपण आपली प्रतिज्ञा सत्य करुन दाखवावी.’’
अंगावर शहारे आणणारे कैकेयीचे हे निष्ठूर भाषण ऐकून वज्राघाताने जसा पर्वत कोसळावा त्याप्रमाणे राजा दशरथ मूर्च्छित होऊन जमिनीवर पडला. काही वेळाने शुद्धीवर येत हळूहळू डोळे उघडले आणि अत्यंत भितीने डोळ्यातील अश्रू पुसले. ‘मला काही दुष्ट स्वप्न तर दिसले नाही ना? माझ्या मनाला भ्रम तर झाला नाही ना?’ असा तो राजा दशरथ विचार करीत असता त्याला वाघिणीप्रमाणे क्रूर असलेली पत्नी समोर बसलेली दिसली. तिला राजा म्हणाला,‘‘हे कल्याणी, माझे प्राण हरण करणारे हे भाषण तू का करते आहे? रामाने तुझा असा कोणता अपराध केला आहे? तू तर माझ्यासमोर नित्य रामाच्या चांगल्या गुणांचेच वर्णन करीत असते. कौसल्येला आणि मला सारखेच मानून हा राम माझी नित्य सेवा करतो असे तूच पूर्वी मला म्हणाली होतीस ना? आणि आता हे कसे काय उलट बोलते आहे? हवे तर तुझ्या पुत्रासाठी राज्य घे. परंतु रामाला मंदिरातच राहू दे. हे सुंदरी, माझ्यावर एवढी कृपा कर. रामापासून तुला कसलीच भीती नाही.’’ साश्रू नेत्राने एवढे बोलून तो थांबला. तिच्या विनवणीच्या स्वरुपात पाया देखील पडला. परंतु कैकेयीने डोळे लाल करुन त्याला प्रत्युत्तर दिले. म्हणाली, ‘‘हे राजेन्द्रा! आपल्याला भ्रम तर झाला नाही ना? पूर्वी जे आपण बोललात आता मात्र त्या उलट बोलत आहात. आपले स्वत:चे बोलणेच आपण खोटे कराल तर आपणाला नरकप्राप्ति होईल. उद्या सकाळी हरिणाचे कातडे आणि वल्कले नेसून राम जर वनात गेला नाही तर मी गळफास घेईन अथवा विष भक्षण करुन प्राणत्याग करीन. स्वत: आपण सत्यप्रतिज्ञ आहात अशी प्रौढी सर्व लोकात, सभांमध्ये मिरवित असता, पण आता मात्र रामाची शपथ घेऊन आपली प्रतिज्ञा खोटी ठरवित आहात. आपण निश्चितपणे नरकास जाणार आहात.’’
आपल्या प्रिय पत्निने असे म्हटल्याने राजा दशरथ अत्यंत दीनवाणा होऊन शोकसागरात बुडून गेला. नंतर मूर्च्छित होऊन जमिनीवर पडला. त्याची अवस्था अचेतन प्रेताप्रमाणे झाली होती. रात्रभर दु:खाने व्याकूळ झाल्यामुळे ती रात्र त्याला फार भयानक वाटली. पहाटेच्या वेळी बंदीजन, भाट गाऊ लागले. परंतु क्रोधाने कैकेयीने त्या सर्वांना प्रतिबंध केला. त्यांचे गाणे बंद केले. मधल्या दालनात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ऋषि तसेच अनेक कन्यका सर्व जमलेले होते. छत्र, चामर, दिव्य हत्ती, घोडे हे सर्व आणण्यात आले होते. याशिवाय तेथे मुख्य वारांगना, नगरवासी, ग्रामवासी सर्व लोक जमा झाले होते. कारण वसिष्ठांनी त्यांना तशी आज्ञा केली होती. त्याप्रमाणे सर्वजण उपस्थित होते. नगरातील स्त्रिया, बालके, वृद्ध कुणीही रात्रभर झोपले नव्हते. कारण त्यांना पितांबर धारण केलेला राम बघायचा होता. सर्व अलंकारविभूषित, किरीट आणि हातातील कड्याने ज्याची शोभा अधिक उजळून निघाली आहे अशा गळ्यात कौस्तुभ घातलेल्या, अतिशय देखण्या श्यामल वर्णाच्या, अभिषेक झाल्यानंतर हत्तीवर बसून हसतमुखाने येत असलेल्या रामाचे त्यांना दर्शन घ्यायचे होते. पांढऱ्या रंगाचे छत्र हातात घेऊन जवळ असलेला सुलक्षण लक्ष्मण यांना आम्ही केव्हा पाहू अशी उत्कंठा त्यांना लागली होती. सर्व नगरजन दर्शनासाठी उत्सुक झालेले होते.
सुमंत्र नावाचे प्रधानमंत्री मात्र चिंतित होते की ‘अजूनपर्यंत महाराज कसे उठले नाहीत? असे का बरे झाले?’ ह्या विचाराने तो हळूहळू जेथे दशरथ राजा होता तेथे गेला. तेथे गेल्यानंतर त्याने महाराजांचा जयजयकार केला, राजाला प्रणाम केला आणि थांबला. राजा खिन्न असलेला बघून त्याने कैकेयीला विचारले, ‘‘कैकेयी राणीचा विजय असो. महाराज आज असे का बरे दिसतात?’’ तेव्हा कैकेयी म्हणाली ‘‘महाराजांना रात्री झोप लागली नाही. सतत ‘राम राम, हे राम’ म्हणत रामाचेच चिंतन करीत होते म्हणून त्यांना जागरण झाले, म्हणून ते अस्वस्थ झाले आहेत. तेव्हा तू ताबडतोब रामाला घेऊन ये, महाराजांना त्याला पाहण्याची इच्छा आहे’’. यावर सुमंत्र म्हणतो, ‘‘हे राणी, महाराजांच्या आज्ञेशिवाय मी कसा बरे जाऊ?’’ हे मंत्र्याचे बोलणे ऐकून ‘‘हे सुमंत्रा, त्या सुंदर रामाला पाहण्याची माझी इच्छा आहे, तेव्हा त्याला लवकर घेऊन ये.’’ हे ऐकून सुमंत्र ताबडतोब रामाच्या मंदिरात गेला. तो तसाच रामाजवळ गेला आणि म्हणाला, ‘‘हे कमलनयन रामा, तुझे कल्याण असो, तू ताबडतोब माझ्याबरोबर ये, पित्याच्या मंदिरात चल. महाराज तुला भेटू इच्छितात.’’ राम सुद्धा घाईघाईने निघाला. सारथी आणि लक्ष्मण सोबत असलेला राम मधल्या दालनापर्यंत आला, तेथे वसिष्ठ इ. सर्व त्याला दिसले. त्यांना बघून राम अतित्वरेने पित्याजवळ आला. पित्याच्या चरणास वंदन केले. दशरथ राजाही रामाला आलिंगन देण्यासाठी उभा राहिला. ‘रामा’ अशी हाक देत आपले बाहू पसरले आणि दु:खावेग असह्य होऊन राजा खाली कोसळला. ‘हाय, हाय’, असे म्हणत रामाने त्याला चटकन उचलून आपल्या मांडीवर घेतले.
राजाला मूर्च्छित झालेला पाहून तेथे असलेल्या सर्व स्त्रिया रडू लागल्या. रडण्याचा आवाज ऐकून वसिष्ठही आत आले. रामाने विचारले ‘‘महाराजांना आज एवढे दु:खी होण्याचे कारण काय?’’ त्यावर कैकेयी म्हणाली ‘‘हे रामा, ह्या सर्वाचे कारण तूच आहेस. राजाचे हे दु:ख शमन करण्यासाठी तुला एक छोटेसे काम करावे लागेल. ते त्यांच्या हिताचेच आहे. तू तर सत्यप्रतिज्ञ आहेस. महाराजही सत्यप्रतिज्ञ ठरतील असे कर.’’ कैकेयी म्हणते ‘‘पूर्वी एकदा संतुष्ट मनाने महाराजांनी मला दोन वर दिले होते. त्याची पूर्तता करणे हे तुझ्याच अधिन आहे, तुला हे सांगताना मला संकोच वाटतो आहे. प्रतिज्ञाबद्ध झालेल्या पित्याला तूच यातून वाचवू शकतो. हेच करणे योग्य आहे. पुत्र शब्दाचा अर्थ असा आहे की, पुत्र पुन्नामक नरकापासून पित्याचे रक्षण करतो.’’
कैकेयीचे हे भाषण रामाला शूलप्रहाराप्रमाणे वाटले. राम व्यथित झाला आणि कैकेयीला म्हणाला, ‘‘तू आज मला असे का सांगत आहेस? पित्यासाठी मी माझे जीवित, प्राणही अर्पण करीन किंवा एखादे विषही प्राशन करीन. सीतेचा त्याग करीन, कौसल्येचाही त्याग करीन, राज्यत्यागसुद्धा मी आत्ताच करतो. पित्याची अनुज्ञा न मिळता जो आपल्या पित्याचे कार्य करतो तोच खरा सुपुत्र होय. सांगितल्यानंतर जो पित्याचे काम करतो त्याला मध्यम पुत्र म्हणतात. तर सांगूनही जो पित्याचे काम करीत नाही तो पुत्र नव्हे तर तो केवळ मातापित्याचा मल असे त्याला म्हणतात. म्हणून माझा पिता मला जे काही सांगेल ते सर्व कार्य करायला मी तयार आहे. निश्चितपणे मी ते करणार आहे.’’
राम हा दुटप्पी बोलत नाही, रामाची अशी प्रतिज्ञा कैकेयीनी ऐकली त्यानंतर तिने बोलण्यास सुरवात केली, ‘‘रामा, तुझ्या अभिषेकासाठी म्हणून जी ही सामग्री गोळा केली आहे, सिद्ध केली आहे, त्याच सामग्रीने माझ्या प्रिय भरताला अभिषेक केला जावा. हे कार्य एका वराने करावयाचे आणि दुसऱ्या वराने हे रामा, तू वल्कले नेसून, जटा धारण करुन पित्याच्या आज्ञेने आजच वनाला निघून जावे. तेथे मुनि जसे कंदमुळं भक्षण करतात त्याप्रमाणे अन्न खाऊन चौदा वर्षे वनात रहावे. हेच ते वडिलांचे कार्य आजच तुला करावयाचे आहे. हे रघुनंदना! तुला हे सांगताना महाराजांना संकोच वाटत आहे.’’
असे कैकेयीने म्हटल्यानंतर श्रीराम म्हणतात, ‘‘भरताला राज्य करु दे, मी दण्डकारण्यात जातो. परंतु महाराज आज माझ्याशी काहीच बोलत नाहीत, याचे कारण मला कळत नाही.’’
हे रामाचे भाषण ऐकून, राम आपल्या समोरच उभा आहे असे पाहून तो दु:खित झालेला दशरथ राजा दु:खानेच म्हणाला, ‘‘हे रामा, मी स्त्रीकडून जिंकला गेलो आहे. माझ्या मनाला भ्रम झाला म्हणून मी भलत्याच मार्गाने चाललो आहे. मला बंदिवान करुन तू ह्या राज्याचा स्वीकार कर. असे करताना तुला कोणतेही पाप लागणार नाही. असत्याचा दोष तुला लागणार नाही’’, असे बोलून तो विलाप करु लागला.
‘‘हे रामा! हे जगन्नाथा! अरे माझ्या प्राणवल्लभा, प्राणप्रिया रामा, मला टाकून तू घोर अरण्यात जाणे तुला योग्य वाटते काय?’’ असे म्हणून रामाला दृढ आलिंगन देऊन तो मुक्तकंठाने रडू लागला. रामाने आपल्या पित्याचे डोळे पुसले. त्यानंतर तो नीतिनिपुण राम राजाचे हळूहळू सांत्वन करीत राजाला आश्वासन देत म्हणाला, ‘‘यात आपण दु:ख करण्याचे काहीच कारण नाही. माझा धाकटा भाऊ राज्य करु देत. मी आपली प्रतिज्ञा पूर्ण करीत आपल्या राजधानीला परत येईन. अहो महाराज, राजसुखापेक्षा कोटीगुणांनी अधिक सौख्य मला वनात राहूनही मिळेल आणि आपल्या सत्याचे पालनही होईल. याशिवाय देवकार्यही घडेल. कैकेयीला माझा कठीण वनवास आवडत असेल किंवा तो इष्ट वाटत आहे. आताच वनात जावे अशी माझी इच्छा आहे. माता कैकेयीचा हृदय संतापही त्यामुळे शांत होईल. माझ्या अभिषेकासाठी जमविलेले सामानही ठेवून द्यावे. माझ्या मातेला आणि सीतेला आश्वासन देऊन सीतेची समजून घालून मी येतो. नंतर आपल्या चरणांना वंदन करुन मी सुखाने वनाला जाईन.’’ असे बोलून रामाने पित्याला प्रदक्षिणा घातली. माता कौसल्येला भेटण्यासाठी गेला. यावेळी माता कौसल्या रामासाठी म्हणून विष्णुची पूजा करीत होती. तिने ब्राह्मणांकडून होम करुन घेतला. त्यांना धन दिले. मौन धारण करुन एकाग्रमनाने विष्णुचे चिंतन करीत होती. सर्वांतर्यामी, अद्वितीय अशा पूर्ण ज्ञानरुपी प्रकाशाने परिपूर्ण भरलेला, सर्व भेदभावांपासून दूर असणारा, नित्य आनंदस्वरुप अशा त्या विष्णुला हृदयकमलामध्ये ठेवून त्याचे ध्यान करीत बसलेल्या कौसल्येला राम आपल्या समोर उभा आहे हे दिसलेच नाही.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अयोध्याकाण्डे तृतीयः सर्गः।